चंद्रकांत पाटील जिथे दिसतील, तिथे घेराव घालणार
| पुणे राष्ट्रवादीचा इशारा
खासदार सुप्रियाताई सुळे यांच्याबाबत बेताल वक्तव्य करणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या प्रकरणी त्वरित माफी मागावी अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला भगिनी चंद्रकांत पाटील जिथे दिसतील, तिथे घेराव घालतील, असा इशारा पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शुक्रवारी देण्यात आला.
चंद्रकांत पाटील यांनी सुप्रियाताईंबाबत केलेल्या वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे सारसबाग येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यासमोर निषेध नोंदविण्यात आला. या वेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात घोषणा दिल्या. तसेच, पाटील यांच्या पुतळ्याला जोडेमार आंदोलनही करण्यात आले. या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रदीप देशमुख, मृणाल वाणी, रुपाली पाटील, संतोष नांगरे व इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
‘महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहरातील कोथरूड मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत असलेले चंद्रकांत पाटील हे पुण्याची व महाराष्ट्राची संस्कृती बिघडवण्याचे काम करीत आहेत. सुप्रियाताई यांच्यासारख्या लोकप्रतिनिधींविरोधात व समस्त महिला वर्गाविरोधात त्यांनी केलेले वक्तव्य हे निषेधार्ह आणि तितकेच लाजीरवाणे आहे. ‘घरी जा, स्वयंपाक करा, मसणात जा’ ही त्यांची वक्तव्ये महिलांनी चूल व मूल इतक्यापुरतेच मर्यादित राहावे, त्यांना समाजकारणात व राजकारणात वाव नसावा, या मानसिकतेचे प्रदर्शन करणारे आहे. यातून चंद्रकांत पाटील व भाजपची मनुवादी वृत्ती दिसून येत आहे. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात अशा प्रकारची वृत्ती लादू पाहणाऱ्या चंद्रकांत पाटील यांचा आम्ही निषेध करतो. चंद्रकांत पाटील यांनी त्यांनी केलेल्या वक्तव्याप्रकरणी त्वरित माफी मागावी अन्यथा ते जिथे दिसतील तिथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला – भगिनी त्यांना घेराव घालतील. त्यासाठी चंद्रकांत पाटील तयार राहावेत,’ असा इशारा शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिला.
COMMENTS