पौड रोड च्या अतिक्रमण कारवाई वरून महापालिका प्रशासन संशयाच्या भोवऱ्यात
: काही सोसायट्या वगळून केली कारवाई
पुणे : महापालिका प्रशासनाच्या अतिक्रमण कारवाई बद्दल कौतुक होत असतानाच बुधवारी झालेल्या पौड रोड च्या अतिक्रमण कारवाई वरून मात्र महापालिका प्रशासन संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे. भुसारी कॉलनी परिसरातील कारवाई करताना काही सोसायट्या वगळून कारवाई करण्यात आली. संबंधित सोसायट्यांना नोटीस दिल्या असताना देखील त्यांच्यावर कारवाई झाली नाही. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
: नोटिसा देऊनही कारवाई नाही
महापालिका प्रशासनाकडून शहरात अतिक्रमण मोहीम हाती घेण्यात आली आहे. यामध्ये अतिक्रमण आणि बांधकाम विभाग एकत्र मिळून कारवाई करत आहेत. प्रशासनाकडून साईड मार्जिन, फुटपाथ वर कारवाई करण्यात येत आहे. त्याआधी नागरिकांना अतिक्रमण काढून घेण्यासाठी नोटीस दिल्या जातात. नागरिकांनी स्वतः हुन काढून नाही घेतले तर कारवाई केली जाते. त्यानुसार पौड रोड वरील नवीन हद्द परिसर म्हणजेच भुसारी कॉलनीतील अनधिकृत बांधकाम असणाऱ्या सर्व सोसायट्यांना मार्च महिन्यात नोटिसा देण्यात आल्या होत्या. यामध्ये कलाग्राम/नाट्यचित्र को ऑप हाऊसिंग सोसायटी चा समावेश होता. सोसायटीतील बऱ्याच नागरिकांना नोटीस देण्यात आल्या होत्या. मात्र नागरिकांनी अतिक्रमण काढले नाही. त्यामुळे आज सकाळ पासून कारवाईस सुरुवात करण्यात आली. मात्र महापालिका प्रशासनाकडून कारवाई करताना कॉलनीतील कलाग्राम/नाट्यचित्र सोसायटी सोडून कारवाई करण्यात आली. परिसरातील स्वप्न साकार सोसायटीच्या दुकानावरील बोर्ड वर देखील कारवाई करण्यात आली. मात्र नाट्यचित्र सोसायटी तशीच सोडून दिली. यामुळे मात्र नागरिकांमध्ये रोष आहे. प्रशासनाच्या कामकाजाबाबत परिसरातील नागरिक उलट सुलट चर्चा करत होते.
कायदा सर्वांना समान आहे. अनधिकृत काम करणाऱ्या सर्वांना नोटिसा देण्यात आल्या होत्या. त्यानुसार कारवाई केली गेली. मग फक्त नाट्यचित्र/कलाग्राम सोसायटीवरच कारवाई का केली नाही. प्रशासनाच्या या भूमिकेबाबत आमच्या मनात संभ्रम आहे. प्रशासनाने याबाबत खुलासा करावा.
COMMENTS