पुणे विमानतळाबाबत शरद पवारांनी दिली ‘ही’ महत्वाची माहिती
पुणे : जिल्ह्यातील नियोजीत विमानतळासंदर्भात या पंधरवड्यात संबंधितांशी चर्चा करून हा प्रश्न मार्गी लागेल अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. बारामती तालुक्यातील सुपे येथील विद्या प्रतिष्ठानच्या शैक्षणिक संकुलाच्या इमारत पाहणीच्या वेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
पवार म्हणाले – विमान तळासंदर्भात जागा निश्चित झाल्या, पण संरक्षण खात्याने हरकत घेतली. त्यामुळे हा प्रश्न प्रलंबीत राहिला आहे. पुढील पंधरा दिवसात मी स्वतः, खासदार सुप्रिया सुळे आणि राज्य सरकारचे प्रतिनिधी मिळून संरक्षण विभागातील संबंधित अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेणार आहोत. संरक्षण खात्याचे पुण्यात एक विभाग आहे. त्यांची विमाने रोज सकाळी सरावासाठी या भागातून जात असतात. शेवटी त्यांची भूमिका काय आहे हे समजून घ्यावी लागेल. आणि त्यानंतरच विमानतळा संदर्भातील मार्ग काढला जाईल.आंतरराष्ट्रीय स्तरावरील विमानतळ नेमके कोठे होणार हा प्रश्न अद्यापही गुलदस्त्यात आहे. चाकणला होणार, पुरंदर तालुक्यात होणार का बारामती,दौंड व पुरंदर तालुक्यांच्या सिमेवरील गावांत होणार याबाबत परिसरात उलट-सुलट चर्चा चालू आहे.
पवार यांनी येत्या पंधरवड्यात हा प्रश्न मार्गी लागणार असल्याचे सुतोवाच केल्याने होणाऱ्या बैठकीकडे लक्ष वेधले आहे. बारामती, दौंड व पुरंदर तालुक्यांच्या लगतच्या गावांसाठी सुपे हे मध्यवर्ती बाजार पेठेचे गाव असल्याने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्ष घातले आहे. गावात विद्या प्रतिष्ठानचे मोठे शैक्षणिक संकुल उभारले जात आहे. त्या बरोबरच उपजिल्हा रूग्णालय, मोठी बाजार पेठ होऊ घातली आहे. याबाबत त्यांना विचारले असता. ते म्हणाले – हा विषय अजित पवारांचा आहे. आणि विमानतळाचा प्रश्न माझ्याशी संबधित आहे, असा खुलासा केला.
COMMENTS