अतिक्रमण कारवाई सुरु : पहिली कारवाई रास्ता पेठेतील भाजी मंडई वर
पुणे : महापालिका आयुक्तांनी अतिक्रमण कारवाई करण्याचे आदेश महापालिका प्रशासनाला दिले आहेत. त्यानुसार अतिक्रमण विभागाने देखील कारवाईचे नियोजन केले आहे. कालच्या आदेशानुसार तात्काळ आज अतिक्रमण विभागाने कारवाईस सुरुवात केली आहे. सुरुवातीलाच रास्ता पेठेतील भाजी मंडई वर कारवाई करण्यात आली आहे. यात 20 हजार चौरस फुटाचे बांधकाम काढण्यात आले आहे. अशी माहिती उपायुक्त माधव जगताप यांनी दिली.
: 20 हजार चौरस फुटाचे बांधकाम काढण्यात आले
महात्मा फुले मंडई अंतर्गत रास्ता पेठ भाजी मंडई येथे असलेले बांधकाम काढण्याची कारवाई मंडई विभागामार्फत करण्यात आली. यामध्ये वीस हजार चौरस फुटाचे बांधकाम काढण्यात आलेले आहे. यासाठी अब्बास अली मंदृपकर. अश्विनी भागवत, त्र्यंबक भागवत इत्यादी अधिकारी उपस्थित होते. सदरची कारवाई बऱ्याच वर्षापासून प्रलंबित होती. या जागी मंडई विभागामार्फत बीओटी तत्त्वावर मंडईचे बांधकाम करण्यात येणार आहे. ही कारवाई माधव जगताप, उपायुक्त, अतिक्रमण अनधिकृत बांधकाम निर्मूलन यांचे नियंत्रणाखाली करण्यात आली.
: प्रशासनाने कारवाईचे केले नियोजन
पुणे महानगरपालिकेच्या सर्व क्षेत्रिय कार्यालयांचे हद्दीमधील जास्त रहदारी व वाहनांची वर्दळ असणारे रस्ते व चौक, तसेच संवेदनशील भागातील तक्रारी येणारी ठिकाणे इ. भागात आढळून येणारी सर्व प्रकारची अनधिकृत कञ्ची,पक्की बांधकामे / फेरीवाले स्टॉल / हातगाडी, अनधिकृत बोर्ड / बॅनर, तसेच रस्त्यांलगतच्या खाजगी मिळकतीचे फ्रंट मार्जिन मधील अनधिकृत व्यवसायिकांची अतिक्रमणे/कञ्ची,पक्की बांधकामे यांचेवर संबंधित विभागांचेसह सलगपणे माहे १६ मार्च २०२२ पासून सयुंक्तपणे खालील तक्त्यात नमूद केलेनुसार दररोज पूर्व नियोजनाद्वारे प्रभावीपणे कारवाया करावयाच्या आहेत. अशा कारवाया परवाना आकाशचिन्ह विभाग, बांधकाम विकास विभाग, पथ विभाग, इ. विभागांनी सयुंक्त पद्धतीने करावयाच्या असून आवश्यकतेनुसार स्थानिक पोलीस विभागाची मदत घेवून कराव्यात. सर्व सयुंक्त कारवाया ह्या संबंधित क्षेत्रिय कार्यालयाचे परिमंडळ मा. उप आयुक्त यांचे नियंत्रणाखाली व संबंधित महापालिका सहाय्यक आयुक्त, कार्यकारी अभियंता (परिमंडळ) यांचे उपस्थितीमध्ये करावयाच्या आहेत. संयुक्त कारवाईचेवेळी संबंधित क्षेत्रिय कार्यालयांकडील बांधकाम विकास विभागाकडील कार्यकारी अभियंता, उप अभियंता, कनिष्ठ अभियंता, क्षेत्रिय अतिक्रमण निरीक्षक, अतिक्रमण निरीक्षक, आकाशचिन्ह परवाना निरीक्षक व आरोग्य निरीक्षक इत्यादीनी उपस्थित राहून त्यांचे विभागाशी संबंधित सर्व प्रकारची अतिक्रमणे काढून रस्ते, चौक अतिक्रमणमुक्त करावयाचे आहेत. वरीलप्रमाणे होणाऱ्या कारवायांचे चित्रीकरण करणे, जप्त माल योग्य पद्धतीने जवळच्या अतिक्रमण गोडाऊनमध्ये रितसर जमा करून अशा जप्त मालाच्या दैनंदिन नोंदी घोले रोड जे प्लॉट येथील अतिक्रमण गोडाऊनमधील नोंद रजिस्टरमध्ये रोजचे रोज करणे बंधनकारक राहील. अशा कारवायांचे सर्व तपशिलासह फोटो व्हॉटसअॅप वरील encroachment removal dept ग्रुपवर वेळचेवेळी अपलोड करावेत. वरीलप्रमाणे केलेल्या कारवायांचा लेखी साप्ताहिकअहवाल संबंधित मा. उप आयुक्त यांचे स्वाक्षरीने मा. महापालिका आयुक्त यांचे निदर्शनास आणणेकरिता या कार्यालयाकडे आठवड्याच्या प्रत्येक सोमवारी दुपारी १२ वाजेपर्यंत पाठविण्यात यावा.
COMMENTS