महापालिकेच्या शाळांमध्ये आता व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा
: राजीव गांधी ई लर्निंग स्कूल व शामराव श्रीपत बराटे शाळा यामधून होणार सुरुवात
: महिला बाल कल्याण समितीची मान्यता
याबाबतचा प्रस्ताव विरोधी पक्ष नेत्या दीपाली धुमाळ (Deepali Dhumal) आणि काँग्रेस गटनेते आबा बागूल (Aba Bagul) यांनी महिला बाल कल्याण समिती समोर दिला होता. त्यानुसार पुणे महापालिकेच्या शाळांमध्ये प्रामुख्याने गोरगरीब व दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील विदयार्थी शिक्षण घेतात. अशा कुटुंबातील विदयार्थ्यांना इतर खाजगी शाळांप्रमाणे सेवा सुविधा व शिक्षणाचा दर्जा देण्याबाबत प्रामाणिक प्रयत्न महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून नेहमीच केला जातो. विदयार्थ्यांच्या दृष्टीने त्यांच्या भविष्यातील यशस्वी कारकीर्दीसाठी शालांत / माध्यमिक म्हणजेच इयत्ता १० वीच्या परीक्षेच्या टप्पा महत्वाचा असतो, किंबहुना यशस्वी कारकीर्द घडण्यासाठी महत्वाचा मानला जातो. इयत्ता ७ वी ते १० वी या शैक्षणिक टप्प्यात विदयार्थ्यांच्या शारिरिक वाढीसोबत मानसिक व वैचारिक धारणांमध्ये दिर्घ परिणाम करणारे बदल होत असतात. खाजगी शाळांमध्ये जाणारे बहुतांशी विदयार्थी हे समाजाच्या मध्यम / उच्च मध्यम वर्गाचे प्रतिनिधीत्व करतात. अशा विदयार्थ्यांना खाजगी शाळांमधून तसेच त्यांच्या कुटुंबामधून अथवा विविध उपलब्ध साधनांद्वारे व्यक्तिमत्व विकासाचे मार्गदर्शन उपलब्ध होते. पुणे मनपाच्या विविध शाळांमधील इयत्ता ७ वी ते १० वी या इयत्तांमधील विदयार्थ्यांना त्यांचे व्यक्तिमत्व विकासासाठी शिक्षणेतर उपक्रम महापालिकेच्या माध्यमातून राबविणे हे अतिशय हितावह व दूरगामी सामाजिक परिणाम करणारे ठरेल. गेली अदमासे २ वर्षे कोविड प्रादुर्भावामुळे विदयार्थ्यांचे शालेय शिक्षण प्रत्यक्ष तासिकांद्वारे होवू शकलेले नाही. याचा थेट परिणाम मुलांच्या मानसिक आरोग्यावर देखील झालेला आहे हे नाकारता येणार नाही. सबब पुणे महानगरपालिकेच्या शाळांमध्ये कौशल्य प्रशिक्षण अंतर्गत विदयार्थ्यांसाठी व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा सुरू करावी. याची सुरूवात प्रायोगिक तत्वावर राजीव गांधी ई लर्निंग स्कूल व शामराव श्रीपत बराटे शाळा, दिगंबरवाडी येथून करण्यात यावी. या प्रस्तावाला समितीने मान्यता दिली आहे.
COMMENTS