महापालिकेत विविध प्रकल्पात भाजपकडून भ्रष्टाचार : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
: लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल
पुणे : शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शिष्टमंडळाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक राजेश बनसोडे यांची भेट घेतली. सत्ताधारी भाजपच्या कार्यकाळात पुणे महानगरपालिकेच्या अनेक प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. याबाबत प्रसारमाध्यमे व अनेक सामाजिक संस्था यांनी देखील वारंवार लाचलुचपत विभागाकडे व मा.आयुक्त पुणे महानगरपालिका यांच्याकडे तक्रार केलेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने या भ्रष्टाचाराच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली. अशी माहिती शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली.
तक्रारीत नमूद विषय खालीलप्रमाणे –
विषय क्र.१)
पुणे महानगरपालिकेच्या २४/७ समान पाणीपुरवठा योजना मध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता व यामध्ये खासगी ठेकेदाराच्या आर्थिक हिताच्या दृष्टीने अनेक ठिकाणी बदल करून सदर योजनेची किंमत आणि अनियमितपणे वाढवण्यात आली आहे.
विषय क्र.२)
पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून बाणेर व वारजे येथे महानगरपालिकेच्या प्रचलित नियमाप्रमाणे प्रक्रिया न करता अनियमित पद्धतीने काही व्यक्ती व संस्था यांच्या आर्थिक हिताचा विचार करून बाणेर व वारजे येथे एक हजार कोटी रुपये कर्ज घेऊन हॉस्पिटल उभे करण्याची प्रक्रिया करण्याचे प्रयत्न चालू आहे. यामध्ये देखील मोठे आर्थिक हितसंबंध असल्याची शक्यता आहे.याचीही सखोल चौकशी करण्यात यावी.
विषय क्र.३)
पुणे शहरातील पुणेकरांच्या हक्काच्या 350 अँमिनिटी स्पेसेस या खासगी बांधकाम व्यावसायिकांच्या आर्थिक फायद्यासाठी देण्याचा प्रयत्न करण्यात आला यामध्ये देखील मोठा भ्रष्टाचार झाला असण्याची शक्यता आहे याची देखील आपल्या विभागामार्फत सखोल चौकशी करण्यात यावी.
विषय क्र.४)
‘जायका’ प्रकल्पांतर्गत उभारण्यात नव्याने उभारण्यात येणाऱ्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या उभारणीमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक अनियमितता दिसून आले आहे काही खाजगी ठेकेदार कंपनीच्या विशेष विचार करून मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे निदर्शनास येते यामुळे पुणेकरांचे आर्थिक नुकसान झाले आहे याची आपल्या विभागामार्फत सखोल चौकशी करण्यात यावी.
विषय क्र.५)
१६ फेब्रुवारी २०२२ रोजी पुणे महानगरपालिकेच्या शिक्षण समिती या बैठकीमध्ये खाजगी बांधकाम व्यावसायिक व सत्ताधारी यांच्या हितासाठी नियमबाह्य पद्धतीने आरक्षित असलेल्या प्राथमिक शाळा उभारणीचा प्रस्ताव नियम डावलून मान्य करण्यात आला या प्रस्तावामध्ये खाजगी बांधकाम व्यावसायिकाचा पुरेपूर आर्थिक हितसंबंध आहे असे प्रथमदर्शनी दिसून येते यामुळे या प्रकरणाची आपले विभागामार्फत सखोल चौकशी करण्यात यावी.
विषय क्र.६)
समाविष्ट गावांचा ड्रेनेज लाईन टाकणे या ३९३ कोटीचे निविदेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते या निविदेबाबत अनेक व्यक्ती व संस्था यांनी न्यायालयाने देखील दाद मागितली आहे व तक्रार दाखल केलेली आहे या निविदा प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार व आर्थिक हितसंबंध असल्यामुळे भ्रष्टाचार झाला असल्याचे निदर्शनास येते याची आपल्या विभागामार्फत सखोल चौकशी करण्यात यावी.
तरी वरील सर्व नमूद केलेल्या १ ते ६ विषयांची निविदा किंमत सुमारे सहा हजार कोटी रुपये आहे. यामध्ये मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याने त्या संबंधित प्रकरणाची पुणेकरांच्या व महानगरपालिकेच्या आर्थिक हितासाठी ताबडतोब चौकशी करावी. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शिष्टमंडळाने केली. यावेळी माजी आ. जयदेवराव गायकवाड, माजी महापौर अंकुश आण्णा काकडे, माजी शहराध्यक्ष रविंद्र आण्णा माळवदकर, नगरसेवक सुभाष जगताप, नगरसेवक बाबुराव चांदेरे, प्रदेश प्रतिनिधी . प्रदीप देशमुख, समन्वयक महेश हांडे उपस्थित होते.
COMMENTS