सानुग्रह मदतीसाठी महापालिकेच्या तक्रार निवारण समितीकडे अपील करा
: महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांचे नागरिकांना आवाहन
पुणे : कोव्हीड-१९ ने मृत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना सानुग्रह मदत देण्यासाठी ऑनलाईन प्रणालीद्वारे पुणे महानगरपालिकेकडे अर्ज मागवण्यात आले आहेत. त्यातील काही अर्ज नामंजूर झाले आहेत. ज्या अर्जदारांना त्यांचा अर्ज नामंजूर केल्याबाबत संदेश आला असेल किंवा ऑनलाईन प्रणालीमध्ये अर्ज नाकारल्याचे दिसत असेल त्या सर्व अर्जदारांनी ऑनलाईन प्रणालीमध्ये ‘Appeal to GRC’ हा पर्याय निवडून तक्रार निवारण समिती (GRC) कडे अपील करण्याचे आवाहन आयुक्त विक्रम कुमार यांनी केले आहे.
: वारसांना ५०,०००/- सानुग्रह मदत देण्याचे निर्देश
महाराष्ट्र शासनाद्वारे कोव्हीड-१९ ने मृत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना ५०,०००/- सानुग्रह मदत देण्याचे निर्देश दिले असुन त्यानुषंगाने ऑनलाईन प्रणालीद्वारे प्राप्त अर्जाचे निराकरण करण्याचे काम पुणे मनपामार्फत सुरु आहे. कोव्हीड – १९ ने मृत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना सानुग्रह मदत वितरीत करणेसाठी प्राप्त झालेल्या अर्जाच्या अनुषंगाने अर्जदारांकडून प्राप्त तक्रारींचे निवारण करण्यासाठी महानगरपालिका क्षेत्रात तक्रार निवारण समिती स्थापन करण्यात आली आहे. कोव्हीड-१९ ने मृत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना सानुग्रह मदत देण्यासाठी ऑनलाईन प्रणालीद्वारे पुणे महानगरपालिकेकडे आतापर्यंत एकूण १४,३८३ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी ८७७१ अर्ज मंजूर व २६०६ अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत. ज्या अर्जदारांना त्यांचा अर्ज नामंजूर केल्याबाबत संदेश आला असेल किंवा ऑनलाईन प्रणालीमध्ये अर्ज नाकारल्याचे दिसत असेल त्या सर्व अर्जदारांनी ऑनलाईन प्रणालीमध्ये ‘Appeal to GRC’ हा पर्याय निवडून तक्रार निवारण समिती (GRC) कडे अपील करण्याचे आवाहन महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी केले आहे.
—
COMMENTS