आरोग्य प्रमुख डॉ भारती यांना मुदतवाढ
:राज्य सरकारकडून 4 ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढीचा आदेश
पुणे : महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ आशिष भारती यांचा महापालिकेतील प्रति नियुक्ती वरील कालावधी 4 ऑक्टोबर 2021 लाच संपला होता. त्यावर डॉ भारती यांनी सरकारकडे कालावधी वाढवून मागितला होता. त्यावर बरेच दिवस निर्णय झाला नव्हता. अखेर सरकारने डॉ भारती यांना 4 ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्याबाबतचे आदेश नुकतेच जारी करण्यात आले आहेत. दरम्यान डॉ भारती यांच्या मुदतवाढी ला जोरदार विरोध होत होता. सरकारचे आदेश डावलत आपल्याच विभागात आपल्या पत्नीला नोकरी दिल्याचा त्यांच्यावर आरोप केला जात होता. शिवाय त्यांच्या कालावधीत आरोग्य विभागात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप देखील आप पार्टीने केला आहे.
: काय आहे शासन आदेश :-
डॉ. आशिष हिरालाल भारती, सहायक संचालक, आरोग्य सेवा (कु.क.) पुणे यांच्या सेवा संदर्भाधी दि.३०.०९.२०२० च्या शासन आदेशान्वये पुणे महानगरपालिकेच्या अधिपत्याखालील आरोग्य वैद्यकीय अधिकारी पदावर प्रतिनियुक्तीने एक वर्षाच्या कालावधीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. डॉ.आशिष भारती यांचा प्रतिनियुक्तीचा कालावधी दि.०४.१०.२०२१ रोजी संपुष्टात आला आहे.
२. आता, या शासन आदेशान्वये डॉ. आशिष भारती यांना पुणे महानगरपालिकेच्या अधिपत्याखालील आरोग्य वैद्यकीय अधिकारी या पदावरील प्रतिनियुक्तीस दि.०५.१०.२०२१ पासून पुढे एक वर्ष म्हणजेच दि.०४.१०.२०- पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.
: आरोग्य विभागातील भरती प्रक्रियेत होणारी वशिलेबाजी, विलंब याची चौकशी व्हावी : आम आदमी पक्ष
डॉ अभिजीत मोरे, आप प्रवक्ते याच्या म्हणण्यानुसार आरोग्य विभाग प्रमुख डॉ आशिष भारती यांच्या पत्नी डॉ योगिता रामचंद्र गोसावी या मानसोपचार तज्ञ आहेत. त्यांच्या संवर्गाची प्रारुप यादी दिनांक १७/१२/२०२० रोजी जावक क्रमांक अतिमआ/साप्रवि/आस्था/६४८३ अन्वये प्रसिद्ध करण्यात आली. या संवर्गाची अंतिम यादी दिनांक २०/०४/२०२१ रोजी जावक क्रमांक अतिमआ/ आस्था/साप्रवि/४८८ अन्वये प्रसिद्ध करण्यात आली आणि नेमणूक पत्र देण्यात आले. आरोग्य प्रमुखांच्या पत्नी असलेल्या संवर्गाच्या नेमणुका करण्यासाठी आरोग्य प्रमुखांनी दाखवलेली तत्परता इतर संवर्गासाठी का दाखवली गेली नाही?
कोविड संकटकाळात असून देखील आणि योग्य पात्रता असलेले डॉक्टर पुणे मनपात सेवा देण्यासाठी तयार असताना, छाननीमध्ये ते पात्र होऊन प्रारुप यादी प्रसिद्ध होऊन वर्ष ते दीड वर्षे होऊन देखील अंतिम यादी का जाहीर केली जात नाही? भ्रष्टाचार, आर्थिक देवाणघेवाण करण्यासाठी आणि राजकीय लागेबांधे असणाऱ्या उमेदवारांना घेण्यासाठीच ही प्रक्रिया मुद्दाम रखडवली गेली आहे. पुणे शहरातील सार्वजनिक रुग्णालये, दवाखाने यांच्या दुर्दशेसाठी महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजपा कारणीभूत आहे. त्यांचा अधिकाऱ्यांवर वचक नाही. त्यांचे सर्व लक्ष ठेकेदारी, कमिशनबाजी, भ्रष्टाचार याकडेच लागले असून त्यामुळे सामान्य जनतेचे मात्र मरण आहे.
आम आदमी पक्ष मागणी करत आहे की- आरोग्य विभागातील भरती प्रक्रियेत होणारी वशिलेबाजी, विलंब याची चौकशी व्हावी आणि पात्र डॉक्टरांना विनाविलंब नेमणूक पत्र देण्यात यावे.
COMMENTS