Pashan Lake : Vandana Chavan : पाषाण तलाव परिसरासाठी मास्टर प्लॅन तयार करावा : खासदार वंदना चव्हाण 

HomeपुणेPMC

Pashan Lake : Vandana Chavan : पाषाण तलाव परिसरासाठी मास्टर प्लॅन तयार करावा : खासदार वंदना चव्हाण 

Ganesh Kumar Mule Jan 24, 2022 12:38 PM

Pune River Pollution | नद्यांच्या प्रदूषणामुळे पुणेकरांचे आरोग्य धोक्यात! | मिळकत धारकांना स्वतःचा STP प्रकल्प करणे बंधनकारक करण्याची मागणी 
Dr Ramesh Shelar PMC | डॉ रमेश शेलार यांना राज्यपालांच्या हस्ते गोल्ड मेडल देऊन केले जाणार सन्मानित!
Dry Mist Based Fountain System | पुणे महापालिकेत नुकतीच उदघाटन केलेली ड्राय मिस्ट बेस्ड फाऊंटन सिस्टीम काय आहे?

पाषाण तलाव परिसरासाठी मास्टर प्लॅन तयार करावा : खासदार वंदना चव्हाण

पुणे :  खासदार वंदना चव्हाण यांनी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार यांच्यासह पाषाण तलाव परीसरात भेट देऊन पाहणी केली. तेथील जॉगिंग ट्रॅकची झालेली दुरवस्था, तलावातील जलपर्णी या विषयी कॅप्टन सुरेंद्र बिरजे, श्यामला देसाई, पुष्कर कुलकर्णी, समिर उत्तरकर व स्थानिक मोहल्ला कमिटी सदस्य यांच्यासोबत चर्चा केली. या तलावातील जलपर्णी काढल्यानंतर ती तलाव परिसरात न टाकता इतरत्र न्यावी, जॉंगिंग ट्रॅकची स्वच्छता करण्यात यावी, माहिती फलक बसविण्यात यावेत, सुरक्षारक्षक नेमावेत, याठिकाणी  क्रॉंकीटकरणची कामे करण्यात येउ नये अशा सूचना त्यांनी प्रशासनाला केल्या.

अनधिकृत काम थांबवावे

शहराचा विकास होत असताना अनेक बांधकाम व्यावसायिकांनी नाले व नैसर्गिक जलस्त्रोत बुजवली आहेत किंवा राडारोडा टाकला आहे. महानगरपालिकेने सर्व नैसर्गिक जलस्त्रोतांचे यापूर्वी मॅपिंग केलेले असून नागरिकांच्या माहितीसाठी ते सार्वजनिक करावेत व या पद्धतिने होणारे अनधिकृत काम थांबवावे अशी सूचना खासदार चव्हाण यांनी केली.
पाषाण तलावातील वाढत असलेल्या प्रदूषणामुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्याला व तेथील जैवविविधतेला धोका निर्माण झाला आहे. याबाबत लवकरात लवकर उपाययोजना करावी. या परीसरात अनेक ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा व नाल्यात राडारोडा, व कचरा टाकला जातो त्यावर कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.
पाषाण तलावाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध असून तेथे जर नियोजनबध्द काम केले तर शहरातील मोठे पर्यटन केंद्र म्हणून हा भाग विकसित होईल, याठिकाणी अनेक पक्षी आहेत त्यांना याचा त्रास होणार नाही अशा पध्दतीने येथे काम करण्यात यावे, येथील तलाव परिसरातील सर्व जागेचा एकत्र मास्टर प्लॅन तयार करावा व त्या परिसराचा विकास करण्यात यावा अशी मागणी खासदार वंदना चव्हाण यांनी केली.
येणाऱ्या काळात या विकासकामासाठी निधी उपलब्ध करुन देउ असे यावेळी अतिरीक्त आयुक्त कुणाल खेमनार यांनी सांगितले.
यावेळी मुख्य उद्यान अधिक्षक अशोक घोरपडे, औंध बाणेरचे सहाय्यक आयुक्त संदिप खलाटे, माजी नगरसेवक प्रमोद निम्हण, रोहीणी चिमटे, वृक्ष प्राधिकरण सभासद मनोज पाचपुते, नितिन जाधव, संतोष डोख उपस्थित होते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0