जिल्ह्यातील सर्व जलतरण तलाव, खुली मैदाने, पर्यटनाच्या ठिकाणी असलेले सर्व दुकाने, हॉटेल्स आज पासून खुली
पुणे : कोरोना ओमायक्रॉन व्हेरियंट प्रसार मोठा आहे. परंतु, तो गंभीर नसल्याचे मागील १५ दिवसांतील आकडेवारीनुसार सिद्ध झाले आहे. सरकारी अथवा खासगी रुग्णालयात रुग्ण दाखल होण्याचे प्रमाण अत्यंत नगण्य आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील सर्व जलतरण तलाव, खुली मैदाने, पर्यटनाच्या ठिकाणी असलेले सर्व दुकाने, हॉटेल्स व पर्यटन स्थळे सोमवार (दि. २४) पासून खुली करण्यात येत आहे, असे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी रविवारी सायंकाळी जाहीर केले. तसेच या आदेशानुसार लागू असलेले कलम १४४ रद्द करण्यात आले आहे.
कोरोना ओमायक्रॉन व्हेरियंटच्या प्रसाराच्या अनुषंगाने जिल्हा स्तरावरील सर्व विभाग प्रमुख व टास्क फोर्स यांची बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच घेण्यात आली. ओमायक्रॉन व्हेरियंटचा वाढता प्रादुर्भाव असूनही रुग्णाचे रुग्णालयात दाखल होऊन उपचार घेण्याचे प्रमाण फार कमी आहे. पुणे जिल्ह्यात लावण्यात आलेले निर्बंध टप्याटप्याने कमी करण्याचे या बैठकीत सर्वानुमते ठरवले. त्यानुसार पुणे जिल्ह्यातील जलतरण तलाव, खुली मैदाने, पर्यटनाच्या ठिकाणी असलेले सर्व दुकाने, हॉटेल्स व पर्यटन स्थळे सोमवार (दि. २४) पासून खुली करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे डॉ. देशमुख यांनी सांगितले.
पुणे जिल्हा ग्रामीण कार्यक्षेत्रातील सर्व ग्रामपंचायत, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत कार्यक्षेत्रात कोविड-१९ वर नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्या करण्यासाठी सक्षम प्राधिकारी म्हणून जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना अधिकार देण्यात आले आहे. तर पुणे व खडकी छावणी परिषद कार्यक्षेत्राचा समावेश पुणे महापालिका क्षेत्रात तर देहूरोड छावणी परिषद कार्यक्षेत्राचा समावेश पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात होत आहे. त्यामुळे तेथील निर्णय घेण्याचे अधिकार दोन्ही महापालिका आयुक्तांना देण्यात आले आहेत.
खेळाडूंना वेगवेगळ्या स्पर्धांचा सराव करता येणार
राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंच्या स्पर्धात्मक सरावासाठी पुणे जिल्ह्यातील ग्रामीण कार्यक्षेत्रातील सर्व जलतरण तलाव सुरू करण्यात येत आहेत. तसेच फौजदारी दंड प्रक्रीया संहिता १९७३ चे कलम १४४(१)(३) अन्वये देण्यात आलेला आदेश या आदेशान्वये रद्द करण्यात येत आहे.
कोरोना नियमांचे पालन बंधनकारक
मास्कचा वापर, सोशल डिस्टसिंग, लसीकरणाचे दोन डोस पूर्ण, सॅनिटायझेशन या बाबतच्या नियमांचे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालन करणे बंधनकारक आहे, असे डॉ. देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.
COMMENTS