विराट कोहलीनं कसोटी कर्णधारपद सोडलं
: भावनिक पत्र लिहून मन मोकळं केलं!
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पराभवानंतर विराट कोहलीने ( Virat Kohli) भारतीय संघाच्या कसोटी संघाचे कर्णधारपद सोडले.भारतीय संघानं या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली होती, परंतु पुढील दोन्ही कसोटींत आफ्रिकेनं दमदार कमबॅक करून मालिका २-१ अशी जिंकली. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी विराट कोहलीने ट्वेंटी-२० संघाचे नेतृत्वपद सोडण्याची घोषणा केली. त्यानंतर BCCI ने वन डे संघाच्या कर्णधारपदावरून त्याची हकालपट्टी केली आणि आज त्यानं कसोटी संघाचेही नेतृत्व सोडले. विराटच्या नेतृत्वाखाली भारतानं प्रथमच ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात कसोटी मालिकेत पराभूत करण्याचा पराक्रम केला. कसोटी क्रिकेटमधील भारताचा हा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. विराटच्या नेतृत्वाखाली भारतानं सर्वाधिक ४० ( ६८ सामन्यांपैकी) कसोटी सामने जिंकले.
”७ वर्ष सर्वांच्या अथक मेहनतीनं संघाला योग्य दिशा दाखवली. मी पूर्ण प्रामाणिकपणे माझे काम केले आणि त्यात कोणतीच कसर सोडली नाही. प्रवासात कुठेतरी थांबा घ्यावा लागतो आणि कसोटी संघाचा कर्णधार म्हणून माझ्यासाठी तो क्षण आला आहे. या प्रवासात अनेक चढ-उतार आले, परंतु आम्ही प्रयत्न करण्यात कुठेही थांबलो नाही आणि स्वतःवरील विश्वास कायम ठेवला. नेहमी १२० टक्के देण्यावर माझा विश्वास होता आणि ते मी दिले. जेव्हा मी तसं करण्यात अपयशी ठरलो, तेव्हा मला हे माहीत होतं हे योग्य नाही. माझ्या मनात कोणतीची शंका नाही आणि माझ्या संघाची मी प्रतारणा करू शकत नाही,”असे विराटनं लिहिलं.
तो पुढे म्हणाला,”एवढा प्रदीर्घ काळ मला संघाचे नेतृत्व सांभाळण्याची संधी दिल्याबद्दल मी BCCIचे आभार मानू इच्छितो. या जबाबदारीच्या पहिल्या दिवसापासून मी जे ध्येय डोळ्यासमोर ठेवलं होतं, ते पूर्ण करण्यासाठी संघातील प्रत्येक सहकाऱ्यांनी योगदान दिले आणि कोणत्याही कठीण प्रसंगी ते डगमगले नाही. तुमच्यामुळे हा प्रवास सुंदर आणि अविस्मरणीय झाला. रवी भाई आणि संपूर्ण यंत्रणा या यशामागचं इंजिन होते. अखेरचं पण, महेंद्रसिंग धोनीचे मनापासून आभार, त्यानं कर्णधार म्हणून माझ्यावर विश्वास दाखवला आणि भारतीय क्रिकेटला पुढे नेण्यासाठी मी योग्य व्यक्ती असल्याचा विश्वास त्यानं दाखवला.”
— Virat Kohli (@imVkohli) January 15, 2022
COMMENTS