उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते उद्या ‘म्हाडा’च्या 4 हजार 222 घरांसाठी सोडत
पुणे : पुणे म्हाडाच्या वतीने तब्बल 4 हजार 222 घरांसाठी सोडत जाहीर केली असून, यासाठी तब्बल 65 हजार 180 लोकांनी अर्ज केले आहेत. यापैकी नक्की कोणाला घरांची लाॅटरी लागणार हे शुक्रवार (दि.7) रोजी स्पष्ट होणारा आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर म्हाडाच्या घरांच्या सोडतीचा जाहीर कार्यक्रम रद्द केला असून, उपमुख्यमंत्री तथा पालक मंत्री अजित पवार मुंबईत मंत्रालयातून आपल्या कार्यालयातून ऑनलाईन पध्दतीनेच ही सोडत जाहीर करणार असल्याची माहिती पुणे म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन माने-पाटील यांनी दिली.
गेल्या काही दिवसांत पुणे शहर आणि जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. यामुळेच शासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यात पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू केले आहेत. यामुळेच पुणे म्हाडाच्या साडेचार हजार घरांची लाॅटरी ऑनलाईन काढण्यात येणार आहे.
कोरोनाच्या संकटात समाजातील गरीब व सर्वसामान्य कुटुंबाचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुणे म्हाडाच्या वतीने दीड वर्षांत हजारो घरांची तीन वेळा सोडत जाहीर करत नवीन विक्रम केला. म्हाडाचे मुख्य अधिकारी नितीन माने-पाटील यांनी पुढाकार घेऊन खाजगी व मोठ्या बांधकाम व्यावसायिकांकडून 20 टक्क्यांतील फ्लॅट उपलब्ध करून घेतले. यामुळे शहरातील नामांकित व मोठ्या बिल्डरांच्या प्रकल्पांमध्ये देखील सर्वसामान्य व गरीब कुटुंबातील लोकांना घरे मिळू लागली आहेत.
पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ (म्हाडा) पुणे अंतर्गत ८ वी ऑनलाईन सोडत असून, म्हाडाच्या विविध योजनतील २८२३ सदनिका व २०% सर्वसमावेशक योजनअंतर्गत १३९९ सदनिका असे एकूण ४२२२ नवीन सदनिकांच्या सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज नोंदनीचा शुभारंभाचा कार्यक्रम उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले होते. सदर सोडतीमधील ४२२२ सदनिकांसाठी आतापर्यंत 65 हजार 180 इतके विक्रमी अर्ज प्राप्त झाले आहेत. म्हाडा’च्या सोडतीकडे लोकांचे लक्ष लागले आहे. शुक्रवारी संध्याकाळपर्यंत घराची लाॅटरी लागलेल्या लोकांना अधिकृत एसएमएस पाठवून माहिती देण्यात येणार आहे.
COMMENTS