Carbon Neutral Pune : कार्बन न्यूट्रल पुण्याचे उद्दिष्ट गाठण्यासाठी त्रिसूत्रीवर भर द्या : पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

HomeपुणेPolitical

Carbon Neutral Pune : कार्बन न्यूट्रल पुण्याचे उद्दिष्ट गाठण्यासाठी त्रिसूत्रीवर भर द्या : पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

Ganesh Kumar Mule Dec 16, 2021 3:22 PM

Pune Metro Service in Ganesh Utsav | गणेशोत्सव काळात मेट्रोची प्रवासी सेवा मध्यरात्रीपर्यंत | गणेशोत्सवातील वेळापत्रक जाणून घ्या 
PMC Anniversary Exhibition Award | पुणे महापालिकेच्या 42 व्या फळे, फुले व भाजीपाला प्रदर्शनात हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पो. लि. ला प्रथम पारितोषिक! 
MP Girish Bapat | पुणं पोरकं झालं | खासदार बापट यांच्या निधनाने व्यक्त झालेल्या प्रतिक्रिया

कार्बन न्यूट्रल पुण्याचे उद्दिष्ट गाठण्यासाठी त्रिसूत्रीवर भर द्या

: पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

   पुणे – कार्बन न्यूट्रल पुणेचे उद्दिष्ट गाठण्यासाठी नाविन्यता (इनोव्हेशन), निधीची उपलब्धता आणि जनजागृती या त्रिसूत्रीवर भर द्यावा, असे प्रतिपदान राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले.

            महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रीकल्चर येथे पुणे इंटरनॅशनल सेंटरद्वारा आयोजित ‘कार्बन न्यूट्रल पुणे-२०३०’ कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला पीआयसीचे अध्यक्ष डॉ.रघुनाथ माशेलकर, परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड   मनपा आयुक्त राजेश पाटील, पुणे महानगर विकास प्राधिकरण आयुक्त राहुल दिवसे,  पीआयसीचे ट्रस्टी प्रा.प्रशांत गिरबने, प्रा.अमिताव मलिक, संचालक अभय वैद्य आदी उपस्थित होते.

           ठाकरे म्हणाले,पर्यावरणपूरक नव्या संकल्पना  आणण्याची गरज आहे. शासन अशा कल्पनांना प्रोत्साहन देईल. विद्युत वाहनांसोबत इतरही पर्यावरणस्नेही पर्यायांचा विचार करावा लागेल. कार्बन न्यूट्रलसाठी परिपूर्ण प्रस्ताव आल्यास निधीसाठी आंतरराष्ट्रीय संस्थांशी संपर्क साधता येईल. पर्यावरण संवर्धनाच्या कामासाठी स्थानिक वित्तीय संस्थांचीही मदत घ्यावी.

      कार्बन न्यूट्रलचे महत्व सोप्या पद्धतीने आणि तेवढ्याच प्रभावीपणे नागरिकांपर्यंत पोहोचवावे लागेल. लोकप्रतिनिधींनादेखील या कार्यात सहभागी करून घेण्यात येणार आहे. क्रेडाई, महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स यासारख्या मोठ्या संस्थांनाही सहभागी करून घ्यावे लागेल. चळवळीचे स्वरूप आल्याशिवाय उद्दिष्ट गाठता येणार नसल्याने उपक्रमाचे नियोजन करताना लोकसहभागही वाढविणे गरजेचे आहे. कार्बन न्यूट्रलचे उद्दिष्ट वेगाने गाठण्याची महत्वाकांक्षा आणि त्यादिशेने प्रयत्न सुरू ठेवल्यास महाराष्ट्र जगासमोर आदर्श प्रस्थापित करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.  कार्बन न्यूट्रल पुणे साठी पुणे इंटरनॅशनलसारख्या संस्थांनी आणि महापालिकांनी पुढाकार घ्यावा, शासनातर्फे आवश्यक सर्व सहकार्य करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.

            कार्बन न्यूट्रलिटीसाठी निश्चित केलेले उद्दिष्ट गाठण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज आहे. राज्यात त्यासाठी महाराष्ट्र पर्यावरण बदल परिषदेची स्थापना करण्यात आली आहे. असे करणारे महाराष्ट्र देशातील एकमात्र राज्य आहे. पर्यावरण रक्षणाचे प्रयत्न केवळ एका विभागाकडून अपेक्षित नसून त्यासाठी सर्वांचे सहकार्य लागणार आहे. प्रत्येक आठवड्यात पर्यावरण संदर्भातील मुद्द्यांवर चर्चा होण्याच्या दृष्टीने जूनपर्यंत कार्यपद्धती निश्चित करण्यात येईल असेही श्री.ठाकरे यांनी सांगितले.

           .माशेलकर म्हणाले, माझी वसुंधरा अभियान ही एक क्रांतिकारी कल्पना आहे. कार्बन न्यूट्रल उद्दिष्टासाठी हे अभियान उपयुक्त ठरेल.  पुणे हे बुद्धिमत्ता आणि तंत्रज्ञानाचे शहर आहे. त्यामुळे इथे नव्या कल्पना निश्चितपणे पुढे येतील. कामाचा वेग, व्यापकता आणि निरंतरता असणे उद्दिष्ट गाठण्यासाठी आवश्यक आहे. भारतासाठी भारतात निर्माण झालेले नवे सृजन उपयुक्त ठरेल, त्यादृष्टीने प्रयत्न करावे लागतील.

            विक्रम कुमार म्हणाले, पुणे महानगरपालिका ५०० नवी विद्युत बसेस घेत आहे. सौर ऊर्जेसाठी १६० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. विद्युत वाहनांचा उपयोग वाढविण्यात येत आहे. कार्बन न्यूट्रलिटीसाठी स्वतंत्र कक्ष तयार करण्यात येणार आहे.

   पाटील म्हणाले, गेल्या काही महिन्यापासून कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. महापालिकेच्या आस्थापनांमध्ये सौर ऊर्जेचा उपयोग करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येत आहे.

दिवसे म्हणाले, कार्बन न्यूट्रल टाऊनशीपबाबत नियोजन करण्यात येत आहे. जैव विविधता उद्यान स्थापित करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. कार्बन न्यूट्रलिटीसाठी आवश्यक माहितीचे संकलनही करण्यात आले आहे.

            प्रा.गिरबने आणि प्रा.मलिक यांनीदेखील यावेळी विचार व्यक्त केले.ईईसीसीचे सिद्धार्थ भागवत यांनी सादारीकरणाद्वारे कार्बन न्यूट्रलिटीबाबत करण्यात येणाऱ्या प्रयत्नांची माहिती दिली.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0