Sonia Gandhi Birthday | सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त ‘सेवा, कर्तव्य, त्याग सप्ताह’ | आ. सतेज पाटील यांच्या हस्ते उदघाटन
| दुष्काळी भागातील पशुधनासाठी १० ट्रक चारा देणार
Mohan Joshi Congress – The Karbhari News Service – काँग्रेसच्या नेत्या खासदार सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक २ ते ९ डिसेंबर ‘सेवा, कर्तव्य आणि त्याग सप्ताह’ नावीन्यपूर्ण उपक्रमांद्वारे साजरा करण्यात येणार आहे. यंदा सप्ताहाचे २१वे वर्ष आहे, अशी माहिती सप्ताहाचे निमंत्रक अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे सचिव, माजी आमदार मोहन जोशी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. (Pune News)
उदघाटन समारंभ
सप्ताहाचे उदघाटन बुधवारी (दि.२ डिसेंबर) सायंकाळी ५ वाजता नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात होणार आहे. माजी मंत्री आणि विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते उदघाटन होईल.
याप्रसंगी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार, प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष शिवराज मोरे, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष आमदार साजिद खान, पुणे शहर काँग्रेस (पूर्व) अध्यक्ष प्रशांत जगताप, पुणे शहर काँग्रेस (पश्चिम) अध्यक्षा दीप्ती चवधरी, महापालिकेतील काँग्रेसचे गटनेते चंदूशेठ कदम उपस्थित राहणार आहेत.
दुष्काळग्रस्त भागासाठी दहा ट्रक चारा
राज्यातील दुष्काळी परिस्थितीची जाणीव ठेवून गुरुवारी (दि.३ डिसेंबर) दुष्काळग्रस्त भागातील पशुधनासाठी दहा ट्रक चारा रवाना करण्यात येईल. ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार असून, माजी मंत्री आमदार विश्वजित कदम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
पृथ्वीराज चव्हाण यांची प्रकट मुलाखत
आदरणीय नेत्या सोनियाजी गांधी यांच्या ‘बिलाँगिंग : अ जर्नी ऑफ लव्ह’ या पुस्तकाच्या निमित्ताने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची विशेष प्रकट मुलाखत आयोजित करण्यात आली आहे. ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा हे त्यांची मुलाखत घेतील. सोनियाजी गांधी यांचा जीवनप्रवास, सामाजिक व राजकीय वाटचाल आणि भारतीय राजकारणातील त्यांचे योगदान यावर या मुलाखतीतून प्रकाश टाकला जाईल.
कर्तृत्ववान एकल महिलांना ‘सोनिया गांधी स्त्री शक्ती गौरव पुरस्कार’
चिकाटी, स्वाभिमान, जिद्द आणि अथक कष्ट यांच्या बळावर आयुष्यातील अनेक आव्हानांना सामोरे जात स्वतःचे अस्तित्व निर्माण करणाऱ्या आणि एकट्याने संपूर्ण कुटुंबाचा संसार समर्थपणे उभा करणाऱ्या महिलांचा प्रवास खरोखरच कौतुकास्पद आणि प्रेरणादायी आहे.
विविध क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या अशा एकल महिलांच्या संघर्षाचा, स्वावलंबनाचा आणि आत्मसन्मानाचा विशेष सन्मान ‘सोनिया गांधी स्त्री शक्ती गौरव पुरस्कार’ देऊन या सप्ताहात करण्यात येणार आहे.
नागरी सेवा कर्मचाऱ्यांचा सन्मान
शहराच्या नागरी सेवा सुरळीत ठेवण्यासाठी कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा ‘अर्बन इनिशिएटिव्ह’ अंतर्गत विशेष गौरव करण्यात येणार आहे. स्वच्छता, विद्युत, पाणीपुरवठा, मलनिस्सारण, आरोग्य, उद्यान तसेच स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांचा सत्कार करून त्यांना कार्योपयोगी साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे.
देवदासी महिलांच्या संघर्षाचा गौरव
देवदासी प्रथेतून बाहेर पडून समाजाच्या मुख्य प्रवाहात आलेल्या आणि स्वच्छतेचे काम अंगीकारून स्वावलंबी जीवन जगणाऱ्या महिलांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. तसेच देवदासींच्या मुलींचे संगोपन करणाऱ्या आश्रमातील मुलींना शैक्षणिक साहित्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येणार आहे.
महिला, विद्यार्थी आणि गरजूंसाठी उपक्रम
महिला बचत गटांचे मेळावे, महिला उद्योजकांना व्यवसाय व आर्थिक मार्गदर्शन, सुकन्या समृद्धी योजना कार्ड वाटप, रोजगार व स्वयंरोजगार मेळावे, विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा, करिअर मार्गदर्शन, शैक्षणिक साहित्य वाटप यासह मोफत आरोग्य तपासणी, नेत्र व दंत तपासणी शिबिरे, रक्तदान शिबिरे, ब्लँकेट, फळ व धान्य वाटप, अनाथ मुलांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, दिव्यांग व्यक्तींसाठी विशेष उपक्रम, संविधान जागरण आणि सामाजिक प्रबोधनाचे कार्यक्रम शहराच्या विविध भागांत होणार आहेत, अशी माहिती मोहन जोशी यांनी दिली.
दोन दशकांची परंपरा
गेल्या दोन दशकांत या सप्ताहाच्या माध्यमातून महिला उद्योजकांचा सन्मान, सोनिया शक्ती शिष्यवृत्ती, दिव्यांग मुलांसाठी आनंदोत्सव, महिला पत्रकारांसाठी आरोग्य शिबिरे, तृतीयपंथीयांचा सन्मान, रोजगार मेळावे, क्रीडा व चित्रकला स्पर्धा, छायाचित्र प्रदर्शने आणि विविध सामाजिक विषयांवरील परिसंवाद आयोजित करण्यात आले आहेत.
केवळ वाढदिवस साजरा न करता समाजातील विविध घटकांच्या सेवा, कर्तव्य आणि त्यागाची जाणीव ठेवून त्यांना मदतीचा हात देणे, हाच सप्ताहाच्या आयोजनामागील प्रमुख उद्देश असल्याचे मोहन जोशी यांनी सांगितले.
पुणेकरांनी सप्ताहातील समाजोपयोगी उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहनही मोहन जोशी यांनी केले.

COMMENTS