Pune Twin City | पुण्याला मिळणार रशियन ‘जुळे शहर’! | रशियन शहराशी पुण्याचा करार झाला तर काय बदलेल?
| शिक्षक-विद्यार्थ्यांची अदलाबदल, बालकांच्या क्रीडा स्पर्धा, उद्योगांच्या भेटी
| येकातेरिनबर्गशी ५ वर्षांच्या सामंजस्य कराराचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर
PMC Standing Committee – The Karbhari News Service – पुणे महापालिका आणि रशियातील येकातेरिनबर्ग (Yekaterinburg) शहर यांच्यात ‘जुळ्या शहरांचा करार’ (Twin City Arrangement) करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीमार्फत मुख्य सभेच्या मान्यतेसाठी ठेवला आहे. त्यासाठीच्या सामंजस्य कराराच्या (MoU) मसुद्यानुसार दोन्ही शहरे शहरी विकास, शिक्षण, उद्योग, संस्कृती, क्रीडा आणि पर्यटन क्षेत्रांत सहकार्य करतील. करार सुरुवातीला पाच वर्षांसाठी असेल. कोणत्याही पक्षावर स्वतंत्र आर्थिक दायित्व येणार नाही, असेही प्रस्तावत म्हटले आहे.
पुणे हे शैक्षणिक, औद्योगिक, माहिती तंत्रज्ञान, संशोधन आणि सांस्कृतिक केंद्र म्हणून विकसित झाले आहे, असे पत्रात म्हटले आहे. पायाभूत सुविधा, दर्जेदार नागरी सेवा, शाश्वत शहरी विकास, पर्यावरण संवर्धन, तांत्रिक नवनवीन कल्पना आणि प्रशासकीय कार्यक्षमता यासाठी पालिका विविध उपक्रम राबवत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर इतर शहरांशी सहकार्य केल्यास प्रगत कार्यपद्धती, तांत्रिक ज्ञान आणि अनुभवांची देवाणघेवाण होते, तसेच शहराच्या विकासाला चालना मिळते आणि सांस्कृतिक व शैक्षणिक संबंध दृढ होतात, असा पालिकेचा युक्तिवाद आहे.
पुणे आणि येकातेरिनबर्ग यांच्यात जुळ्या शहरांचा करार करण्याचा प्रस्ताव मिळाला होता. त्याला आयुक्तांनी तत्त्वतः सहमती दर्शवली. त्यानंतर भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून मिळालेला करारमसुदा राज्याच्या राजशिष्टाचार विभागाच्या २८ जुलै २०२६ च्या पत्रानुसार पालिकेकडे अभिप्रायासाठी आला. मसुदा कायदेशीर तपासणीसाठी विधी विभागाकडे गेला आणि विधी विभागाने सुचवलेले बदल सामंजस्य करारात करण्यात आले आहेत.
कोणत्या क्षेत्रांत सहकार्य होणार?
शहरी विकास व प्रशासन : नागरी सेवा, विकासात्मक उपक्रम आणि प्रशासकीय कामकाजाबाबत माहिती व अनुभवांची देवाणघेवाण.
उद्योग व गुंतवणूक : दोन्ही शहरांतील उद्योग आणि आर्थिक संस्थांमधील संपर्क वाढवून, लागू कायद्यांनुसार गुंतवणूक आणि संयुक्त प्रकल्पांना प्रोत्साहन.
शिक्षण व विज्ञान : शाळा आणि उच्च शिक्षण संस्थांमधील विद्यार्थी, शिक्षक आणि तज्ज्ञांची देवाणघेवाण, तसेच शैक्षणिक कार्यक्रम, परिषदा आणि कार्यशाळा.
संस्कृती : दोन्ही शहरांची संस्कृती, इतिहास आणि परंपरा यांची ओळख वाढवणारे सांस्कृतिक कार्यक्रम.
क्रीडा, युवक विकास व पर्यटन : बालकांसाठी क्रीडा स्पर्धा आणि पर्यटन क्षेत्रातील सहकार्य.
भेटी व बैठका : परस्पर हिताच्या विषयांवर माहितीची देवाणघेवाण, बैठका आणि शिष्टमंडळांच्या भेटी.
कराराची अंमलबजावणी प्रभावी व्हावी यासाठी दोन्ही शहरे परस्पर सहमतीने दोन वर्षांचा संयुक्त कृती आराखडा तयार करतील.
प्रस्तावनुसार या करारामुळे कोणत्याही पक्षकारावर स्वतंत्रपणे आर्थिक दायित्व येणार नाही. मात्र दोन्ही पक्ष आपापल्या क्षमता आणि उपलब्ध संसाधनांनुसार संयुक्त प्रकल्पांसाठी आवश्यक सहकार्य व समर्थन देतील. भविष्यात एखादा विशिष्ट उपक्रम किंवा प्रकल्प राबवायचा झाल्यास त्यासाठी स्वतंत्र प्रशासकीय व आर्थिक मान्यता, निधीची उपलब्धता आणि लागू नियमांनुसार पुढील कार्यवाही करावी लागेल.
दोन्ही पक्षकारांनी अंमलबजावणीसाठी आवश्यक अंतर्गत प्रक्रिया पूर्ण केल्याबाबत लेखी अधिसूचना दिल्यानंतर, शेवटची अधिसूचना मिळाल्याच्या तारखेपासून करार लागू होईल. प्रारंभिक कालावधी पाच वर्षांचा आहे. गरजेनुसार त्यात सुधारणा, पूरक तरतुदी किंवा समाप्तीची कार्यवाही करता येईल. अंमलबजावणी परस्पर सहमतीने आणि संबंधित देशांतील लागू कायदे व नियमांच्या अधीन राहून होईल.
आयुक्तांनी स्थायी समितीमार्फत मुख्य सभेची मान्यता मागितली आहे. दोन्ही ठिकाणी मंजुरी मिळाल्यास आणि दोन्ही शहरांची अंतर्गत प्रक्रिया पूर्ण झाल्यावर करार लागू होईल. त्यानंतर दोन वर्षांचा संयुक्त कृती आराखडा तयार होणार आहे.

COMMENTS