Pune PMC Action on Illegal Hoardings | पुण्यात बॅनरबाजी करणाऱ्यांनो सावधान! आता थेट FIR | नाव आणि फोटो असलेल्यांनाही कारवाईचा फटका
परवानगीशिवाय बॅनर, फ्लेक्स, पोस्टर लावणाऱ्यांवर कठोर कारवाई
होर्डिंग हटविण्याचा खर्चही वसूल होणार, नाव-पद झळकवणाऱ्यांनाही कारवाईचा इशारा
Pune PMC Illegal Hoardings – The Karbhari News Service – शहरातील अनधिकृत होर्डिंग, बॅनर, फ्लेक्स आणि पोस्टरबाजीला आळा घालण्यासाठी पुणे महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाने कठोर भूमिका घेतली आहे. सार्वजनिक तसेच खासगी मालमत्तांवर परवानगीशिवाय जाहिराती लावणाऱ्यांविरोधात आता थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशारा महापालिकेने दिला आहे. विशेष म्हणजे, अनधिकृत जाहिरातींवर स्वतःचे नाव, छायाचित्र किंवा पदनाम प्रसिद्ध करणाऱ्या व्यक्तींनाही कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. महापालिकेने यासंदर्भात सार्वजनिक जाहिरात सूचना प्रसिद्ध केली आहे. अशी माहिती उपायुक्त संदीप कदम यांनी दिली. (PMC Sky Sign Department)
महापालिकेने सर्व राजकीय पक्ष, सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक संस्था, मंडळे, जाहिरातदार, मुद्रक आणि कार्यक्रम आयोजकांना या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे. यापुढे अनधिकृत जाहिरातबाजी केल्यास केवळ बॅनर काढून टाकण्यापुरती कारवाई मर्यादित राहणार नसून संबंधितांवर फौजदारी कारवाईही केली जाणार असल्याचे या सूचनेतून स्पष्ट झाले आहे.
तीन महिन्यांपर्यंत कारावास किंवा दोन हजार रुपयांपर्यंत दंड
त्यानुसार, रस्ते, पदपथ, चौक, दुभाजक, विद्युत खांब, झाडे, पूल, भिंती तसेच अन्य सार्वजनिक किंवा खासगी मालमत्तांवर महापालिकेच्या पूर्वपरवानगीशिवाय होर्डिंग, बॅनर, फ्लेक्स, पोस्टर, झेंडे, कमानी, कटआउट किंवा जाहिराती लावणे हा महाराष्ट्र मालमत्तेच्या विरूपणास प्रतिबंध अधिनियम १९९५ च्या कलम ३ अन्वये दंडनीय अपराध आहे. या गुन्ह्यासाठी तीन महिन्यांपर्यंत कारावास किंवा दोन हजार रुपयांपर्यंत दंड अथवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.
अनधिकृत होर्डिंग लावणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे
मुंबई उच्च न्यायालयाच्या ३१ डिसेंबर २०१९ रोजीच्या निकालाचा तसेच त्यानंतरच्या आदेशांचा संदर्भ देत महापालिकेने अनधिकृत होर्डिंग आणि बॅनर उभारणाऱ्यांविरोधात कठोर अंमलबजावणी करण्याचे स्पष्ट केले आहे. होर्डिंग किंवा बॅनरवर ज्यांचे नाव, छायाचित्र अथवा पदनाम प्रसिद्ध केले आहे, अशा व्यक्तींविरोधातही फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश असल्याचे सूचनेत नमूद करण्यात आले आहे.
होर्डिंग हटविण्याचा खर्च संबंधितांकडून वसूल
अनधिकृत होर्डिंग, बॅनर, फ्लेक्स आणि पोस्टर आढळल्यास ते तात्काळ काढून टाकण्यात येतील. हे साहित्य हटविण्यासाठी आलेला संपूर्ण खर्च संबंधितांकडून वसूल केला जाणार आहे. तसेच जाहिरात शुल्क आणि दंडाची रक्कमही वसूल करण्याची कारवाई केली जाणार आहे.
प्रिंटर आणि जाहिरातदारांवरही कारवाई
जाहिरातींची छपाई करणाऱ्या मुद्रकांनी प्रत्येक छापील होर्डिंग, बॅनर किंवा पोस्टरवर स्वतःचे नाव आणि पत्ता स्पष्टपणे नमूद करणे बंधनकारक आहे. असे तपशील नसलेल्या जाहिराती छापल्यास संबंधित मुद्रकांवरही कारवाई होऊ शकते. अनधिकृत जाहिरात प्रसिद्ध करणाऱ्या मुद्रकांविरोधात प्रथम माहिती अहवाल (FIR) दाखल करण्याची तरतूदही सूचनेत स्पष्ट करण्यात आली आहे.
परवानगीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन
नियमानुसार होर्डिंग, बॅनर आणि जाहिराती लावण्यासाठी पुणे महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. यासाठी महापालिकेच्या www.pmc.gov.in किंवा services.pmc.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. तसेच संबंधित क्षेत्रीय कार्यालयातही अर्ज सादर करता येईल.
- अनधिकृत होर्डिंग्ज, बॅनरची तक्रार आता ऑनलाइन करता येणार!
पुणे महापालिकेने अनधिकृत होर्डिंग्ज, बॅनर आणि जाहिरातींबाबत नागरिकांना तक्रार करण्यासाठी विशेष व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे. यासाठी नागरिकांनी bhauflexkadha.pmc.gov.in या संकेतस्थळावर किंवा PMC Care क्रमांकावर तक्रार नोंदवावी, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
यामुळे शहरातील अनधिकृत जाहिरात फलकांवर लक्ष ठेवण्यास आणि त्याबाबत प्रशासनाला माहिती देण्यास नागरिकांनाही सहभागी होता येणार आहे.
महापालिका आयुक्त यांच्या सूचनेनुसार ही जाहिरात सूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. यानुसार शहरातील सर्व राजकीय पक्ष, सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक संस्था, मंडळे, जाहिरातदार, मुद्रक आणि कार्यक्रम आयोजकांनी या नियमांचे काटेकोर पालन करावे.
– संदीप कदम, उपायुक्त.
परिपत्रक खाली पहा.

COMMENTS