PMC Schools | पुणे महापालिकेचा आदर्श शाळा उपक्रम; चार परिमंडळांतील शाळांचा होणार विकास | ३४ कोटींच्या कामांना मंजुरी
स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांची माहिती
PMC Standing Committee – The Karbhari News Service – पुणे महापालिकेच्या चार परिमंडळांतील शाळा आदर्श करण्यासाठी ३४ कोटी ६४ लाख रुपयांची विकासकामे हाती घेण्यात येणार आहेत. या शाळांमध्ये पायाभूत सुविधा विकसित केल्या जाणार आहेत. विद्यार्थ्यांना अधिक चांगले शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून दिले जाणार आहे. या कामांच्या निविदांना स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली. (Shrinath Bhimale PMC)
महापालिकेच्या शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी आदर्श शाळा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत शाळांमधील पायाभूत सुविधा सुधारण्यावर भर देण्यात आला आहे. त्यासाठी भवन विभागाने परिमंडळ क्रमांक एक, दोन, चार आणि पाचमधील शाळांच्या विकासकामांचे तीन स्वतंत्र प्रस्ताव सादर केले होते. त्यांना स्थायी समितीने मान्यता दिली.
परिमंडळ क्रमांक दोनमधील शाळांसाठी आठ कोटी ६१ लाख ५० हजार रुपयांची कामे मंजूर करण्यात आली आहेत. या कामासाठी १० कोटी १२ लाख ९७ हजार रुपयांचे पूर्वगणनपत्र तयार करण्यात आले होते. साईप्रभा कन्स्ट्रक्शनची दहा टक्के कमी दराची निविदा स्वीकारण्यात आली आहे. या कामासाठी आठ निविदा प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी दोन पात्र ठरल्या.
परिमंडळ क्रमांक चार आणि पाचमधील शाळांसाठी ११ कोटी ८७ लाख २८ हजार रुपयांची कामे करण्यात येणार आहेत. त्यासाठी १५ कोटी पाच लाख ९७ हजार रुपयांचे पूर्वगणनपत्र तयार करण्यात आले होते. गजानन कन्स्ट्रक्शनची निविदा स्वीकारण्यात आली आहे. पाच निविदांपैकी दोन पात्र ठरल्या.
परिमंडळ क्रमांक एकमधील शाळांसाठी १४ कोटी १५ लाख ३२ हजार रुपयांची कामे मंजूर करण्यात आली आहेत. त्यासाठी १५ कोटी ९३ लाख ३३ हजार रुपयांचे पूर्वगणनपत्र तयार करण्यात आले होते. काकड अभियंता आणि कंत्राटदार यांची ११.२१ टक्के कमी दराची निविदा स्वीकारण्यात आली आहे. पाच निविदांपैकी एक निविदा पात्र ठरली.
तीनही कामांसाठी एकूण १८ निविदा प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी पाच पात्र ठरल्या. कमी दराच्या निविदांमुळे महापालिकेच्या खर्चात बचत होणार आहे. या विकासकामांमुळे शाळांमधील पायाभूत सुविधा अधिक सक्षम होतील. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी पोषक वातावरण उपलब्ध होईल, असे भिमाले यांनी सांगितले.
| दृष्टिक्षेपात विकासकामे
– *परिमंडळ क्रमांक १ :* १४ कोटी १५ लाख ३२ हजार रुपये
– *परिमंडळ क्रमांक २ :* ८ कोटी ६१ लाख ५० हजार रुपये
– *परिमंडळ क्रमांक ४ व ५ :* ११ कोटी ८७ लाख २८ हजार रुपये
– *एकूण खर्च :* ३४ कोटी ६४ लाख १० हजार रुपये

COMMENTS