PMC Accident Insurance Scheme | अपघातात मृत्यू झालेल्या महापालिका कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला २५ लाखांची मदत
| अपघाती विमा योजनेतून आतापर्यंत २७ जणांना ३ कोटींचे अर्थसाहाय्य
PMC Employees Welfare – The Karbhari News Service – पुणे महानगरपालिकेच्या कायम आस्थापनेवरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या समूह वैयक्तिक अपघात विमा योजनेअंतर्गत आणखी एका कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला २५ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे. अपघातात मृत्यू झालेल्या महापालिका सेवकाच्या पत्नीला या विम्याचा धनादेश प्रदान करण्यात आला. या योजनेअंतर्गत आतापर्यंत २७ सेवकांच्या वारसांना एकूण ३ कोटी ५ लाख ८५ हजार रुपयांची मदत देण्यात आली आहे. अशी माहिती मुख्य कामगार अधिकारी नितीन केंजळे यांनी दिली. (PMC Labour Welfare Department)
पुणे महानगरपालिकेकडून महाराष्ट्र शासनाच्या धर्तीवर सन २०१६ पासून कायम आस्थापनेवरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी समूह वैयक्तिक अपघात विमा योजना राबविण्यात येत आहे. कामगार कल्याण विभागामार्फत या योजनेची अंमलबजावणी केली जाते. सेवेत असताना कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांना या योजनेतून आर्थिक मदत मिळते.
महापालिकेच्या परवाना व आकाशचिन्ह विभागात शिपाई म्हणून कार्यरत असलेले कै. कुंडलिक बबन वेडे यांचा २२ नोव्हेंबर २०२५ रोजी अपघात झाला होता. या अपघातानंतर १ एप्रिल २०२६ रोजी त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात कुटुंबाला आर्थिक आधार मिळावा, यासाठी समूह वैयक्तिक अपघात विमा योजनेतून २५ लाख रुपयांची मदत मंजूर करण्यात आली.
बुधवार, १८ नोव्हेंबर रोजी अतिरिक्त महापालिका आयुक्त (इस्टेट) प्रजित नायर यांच्या हस्ते कै. कुंडलिक वेडे यांच्या पत्नी प्रमिला वेडे यांना २५ लाख रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला. यावेळी कामगार कल्याण विभागाचे खातेप्रमुख तथा मुख्य कामगार अधिकारी नितीन केंजळे उपस्थित होते.
महापालिकेच्या या योजनेमुळे अपघाती मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना कठीण प्रसंगी आर्थिक आधार मिळत आहे. विमा मदतीचा धनादेश स्वीकारताना संबंधित कर्मचाऱ्याच्या वारसांनी या आर्थिक मदतीबद्दल पुणे महानगरपालिकेचे आभार मानले.
महापालिकेच्या कायम कर्मचाऱ्यांसाठी राबविण्यात येणारी ही योजना संकटाच्या काळात त्यांच्या कुटुंबीयांसाठी महत्त्वपूर्ण ठरत आहे. आतापर्यंत २७ सेवकांच्या वारसांना ३ कोटी ५ लाख ८५ हजार रुपयांचे अर्थसाहाय्य वितरित करण्यात आले आहे.

COMMENTS