Pune Grand Cycle Tour | PGCT मार्गावरील रस्ते, पदपथांची कामे रखडली! अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी घेतला आढावा
Pune PMC News – The Karbhari News Service – पुणे ग्रँड सायकल टूर (PGCT) स्पर्धेच्या अनुषंगाने पॅकेज क्रमांक ४ अंतर्गत येणाऱ्या रस्त्यांची आणि विविध विकासकामांची अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) ओमप्रकाश दिवटे यांनी शुक्रवारी (६ नोव्हेंबर) सकाळी पाहणी केली. यावेळी PGCT मार्गावरील रस्त्यांची दुरवस्था, अपूर्ण पदपथ, पाणीपुरवठा व ड्रेनेज विभागाने खोदलेले युटिलिटी ट्रेंचेस तसेच अन्य युटिलिटी सेवांची प्रलंबित कामे आढळून आली. ही सर्व कामे तातडीने आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश दिवटे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. (Pune Municipal Corporation – PMC)
या पाहणीवेळी अधीक्षक अभियंता रोहिदास गव्हाणे, पुणे महापालिकेच्या अभियंता पथकातील उपअभियंता व कनिष्ठ अभियंता, Pavetech Consultants चे प्रतिनिधी तसेच संबंधित कंत्राटदार आणि त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
फातिमानगर जंक्शनवरील रस्त्याची पातळी सुधारा
फातिमानगर जंक्शन येथे रस्त्याच्या पृष्ठभागाची पाहणी करताना आवश्यक त्या ठिकाणी दुरुस्ती करून रस्त्याची पातळी समतल करण्याचे निर्देश देण्यात आले. रस्त्यावर उंच-सखलपणा राहणार नाही आणि वाहनचालकांना सुरक्षित व सुखकर प्रवास करता येईल, याची दक्षता घेण्यास सांगण्यात आले. कंत्राटदाराने रस्ता विभाग आणि Pavetech Consultants यांच्या देखरेखीखाली ही कामे पूर्ण करावीत, असे निर्देश देण्यात आले.
बी. टी. कवडे रोडवरील खोदकामांची सविस्तर नोंद ठेवण्याचे आदेश
बी. टी. कवडे रोडवर पाणीपुरवठा आणि ड्रेनेज विभागामार्फत करण्यात आलेल्या युटिलिटी ट्रेंचेसच्या कामाबाबतही दिवटे यांनी सूचना दिल्या. या विभागांनी खोदलेल्या ट्रेंचेसची सविस्तर नोंद तयार करावी. कोणत्या ठिकाणी खोदकाम करण्यात आले आहे आणि त्या ठिकाणांची सद्यस्थिती काय आहे, याची माहिती संकलित करून संबंधित विभागांना कळवावी. त्यानुसार आवश्यक दुरुस्ती आणि पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
रेल्वे ब्रिज परिसरातील अपूर्ण पदपथांची कामे पूर्ण करा
बी. टी. कवडे रोडवरील रेल्वे ब्रिज परिसरासह PGCT मार्गावरील इतर रस्त्यांवरील पदपथांच्या कामांचीही पाहणी करण्यात आली. काही ठिकाणी पदपथांची कामे अर्धवट राहिल्याने त्यांची सद्यस्थिती तपासून अपूर्ण कामांची ठिकाणे आणि तपशील निश्चित करण्यास सांगण्यात आले. उर्वरित पदपथांची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित कंत्राटदार, रस्ता विभाग आणि सल्लागारांना देण्यात आले.
इतर युटिलिटी विभागांशी समन्वय साधण्याच्या सूचना
PGCT पॅकेजमधील संपूर्ण मार्गावर असलेल्या इतर युटिलिटी सेवांच्या कामांचाही आढावा घेण्यात आला. संबंधित युटिलिटी विभाग आणि एजन्सी यांच्याशी समन्वय साधून प्रलंबित कामांची माहिती घ्यावी. भविष्यात या सेवांसाठी पुन्हा रस्ते खोदण्याची वेळ येऊ नये आणि रस्त्यांच्या कामात कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, याची दक्षता घेण्यास सांगण्यात आले.
कामात हलगर्जीपणा खपवून घेणार नाही
स्थळ पाहणीदरम्यान देण्यात आलेल्या सर्व निर्देशांनुसार संबंधित यंत्रणांनी तातडीने कार्यवाही करावी. सर्व कामे गुणवत्तापूर्ण पद्धतीने आणि निर्धारित मुदतीत पूर्ण करावीत. कामांमध्ये कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.
पुणे महापालिकेच्या अभियंता पथकाने आणि Pavetech Consultants यांनी संबंधित युटिलिटी विभागांशी नियमित समन्वय साधून कामांचा पाठपुरावा करावा. कंत्राटदारांनी आवश्यक दुरुस्ती आणि प्रलंबित कामांना प्राधान्य द्यावे. तसेच पाहणीदरम्यान उपस्थित करण्यात आलेल्या सर्व मुद्द्यांवर केलेल्या कार्यवाहीचा अहवाल संबंधित अधिकाऱ्यांकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले.
पुणे ग्रँड सायकल टूरच्या पार्श्वभूमीवर शहरातील संबंधित मार्गांची कामे वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून हा आढावा घेण्यात आला.

COMMENTS