Unorganised Workers | असंघटित कामगारांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचवण्यासाठी विशेष प्रयत्न करा; नितीन केंजळे यांचे आवाहन
|दत्तोपंत ठेंगडी राष्ट्रीय श्रमिक शिक्षा व विकास बोर्डाच्या प्रादेशिक सल्लागार समितीची बैठक संपन्न; कामगार शिक्षणाच्या विविध मुद्द्यांवर चर्चा
Nitin Kenjale PMC – The Karbhari News Service – असंघटित कामगारांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी सर्व सदस्यांनी विशेष प्रयत्न करावेत, असे आवाहन पुणे महानगरपालिकेचे मुख्य कामगार अधिकारी तथा दत्तोपंत ठेंगडी राष्ट्रीय श्रमिक शिक्षा व विकास बोर्डाच्या पुणे विभागाच्या प्रादेशिक सल्लागार समितीचे अध्यक्ष नितीन केंजळे यांनी केले. (Pune News)
केंद्रीय श्रम व रोजगार मंत्रालयाच्या दत्तोपंत ठेंगडी राष्ट्रीय श्रमिक शिक्षा व विकास बोर्डाच्या पुणे विभागाच्या प्रादेशिक सल्लागार समितीची बैठक २३ ऑक्टोबर २०२६ रोजी औंध येथील महाराजा सयाजीराव गायकवाड भवनातील प्रादेशिक संचालनालयाच्या कार्यालयात पार पडली. या बैठकीत कामगार शिक्षणाच्या विविध उपक्रमांचा आढावा घेण्यासह आगामी कार्यक्रम, त्यांच्या अंमलबजावणीतील अडचणी आणि कार्यालयीन सुविधांबाबत चर्चा करण्यात आली.
| नितीन केंजळे यांचे अध्यक्षपदी स्वागत
प्रादेशिक सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी नितीन केंजळे यांची नुकतीच नियुक्ती झाली आहे. या नियुक्तीनिमित्त पुणे विभागाच्या प्रादेशिक संचालिका अरुणा विष्णू वाघ यांनी समितीच्या वतीने त्यांचे स्वागत केले.
बैठकीत बोर्डामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती देण्यात आली. तसेच या कार्यक्रमांमध्ये आवश्यक बदल करण्याबाबत सदस्यांनी सूचना मांडल्या. बोर्डाच्या नव्या नियमानुसार कार्यक्रमांचे आयोजन श्रमिकमित्रांच्या मदतीने करण्याच्या निर्णयाचे सदस्यांनी स्वागत केले. मात्र, श्रमिकमित्रांना देण्यात येणाऱ्या मानधनात वाढ करण्यात यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

| कार्यक्रमांचे उद्दिष्ट आणि अडचणींचा आढावा
बैठकीदरम्यान पुणे विभागाच्या प्रादेशिक संचालिका अरुणा विष्णू वाघ यांनी आर्थिक वर्ष २०२६-२७ मधील उद्दिष्टे आणि साध्य झालेल्या कामगिरीची माहिती सादर केली. चालू आर्थिक वर्षात विविध कार्यक्रमांचे आयोजन करताना आलेल्या अडचणी आणि आव्हानांवरही चर्चा करण्यात आली. कामगार शिक्षणाच्या उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सदस्यांनी विविध सूचना मांडल्या.
| कोल्हापूर कार्यालय पुन्हा सुरू करण्याची मागणी
कोल्हापूर येथील उपक्षेत्रीय कार्यालय पुन्हा सुरू करण्याचा मुद्दा बैठकीत उपस्थित करण्यात आला. त्यासाठी आवश्यक जागेची व्यवस्था करण्यासाठी राज्य गुणवंत कामगार संघटनेचे अध्यक्ष सुरेश केसरकर विशेष प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच पुणे येथील प्रादेशिक कार्यालयासाठी कामगार कार्यालयाच्या नवीन इमारतीमध्ये जागा उपलब्ध करून देण्याबाबत शिफारस करण्यात यावी, अशी सूचना भारतीय मजदूर संघाचे अध्यक्ष अर्जुन चव्हाण यांनी केली.
| कामगारांपर्यंत योजना पोहोचवण्यावर भर
समितीचे अध्यक्ष नितीन केंजळे यांनी सर्व सदस्यांनी बोर्डाच्या कामकाजात सातत्याने योगदान द्यावे, असे आवाहन केले. असंघटित कामगारांना विविध शासकीय योजनांचा जास्तीत जास्त लाभ मिळावा आणि या योजना त्यांच्यापर्यंत प्रभावीपणे पोहोचाव्यात, यासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले. बैठकीत योग्य सूचना आणि सहकार्य दिल्याबद्दल त्यांनी सर्व सदस्यांचे आभार मानले.
बैठकीला पुणे महानगरपालिकेचे मुख्य समाज विकास अधिकारी रामदास चव्हाण, भारतीय मजदूर संघाचे अध्यक्ष अर्जुन चव्हाण, हिंद मजदूर सभेचे सचिव प्रकाश शिंदे, राज्य गुणवंत कामगार संघटनेचे अध्यक्ष सुरेश केसरकर, कोल्हापूर जिल्हा साखर कामगार संघटनेचे अध्यक्ष सर्जेराव हळदकर, एम.ई.एस. युनियनचे सचिव सोमलिंग येळवंते, लघु उद्योग संघटना महासंघाचे कार्यकारी सदस्य अरविंद शिराळकर, युनिकपाथ अॅग्रोटुरिझमचे संचालक दत्तात्रय शेळके तसेच बोर्डाच्या कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.
बैठकीचा समारोप प्रादेशिक संचालिका अरुणा वाघ यांच्या आभारप्रदर्शनाने झाला.

COMMENTS