PMC Solid Waste Management | मार्टिन ल्यूथर किंग जुनियर ते अल्बर्ट आइनस्टाइन; महापालिका आयुक्तांनी सफाई कर्मचाऱ्यांना दिले वैचारिक पाठबळ!

‘स्वच्छ संवाद’ मेळाव्यात मार्टिन ल्यूथर किंग आणि अल्बर्ट आइनस्टाइन यांच्या विचारांचा दाखला देत आयुक्त नवल किशोर राम यांनी सफाई कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.

Homeadministrative

PMC Solid Waste Management | मार्टिन ल्यूथर किंग जुनियर ते अल्बर्ट आइनस्टाइन; महापालिका आयुक्तांनी सफाई कर्मचाऱ्यांना दिले वैचारिक पाठबळ!

Ganesh Kumar Mule Oct 21, 2026 8:15 PM

Departmental Examination | PMC Pune | लेखनिकी संवर्गासाठी घेण्यात येणाऱ्या विभागीय परीक्षचे तिन्ही पेपर लेखी घेण्यात यावे
Assistant Commissioner | PMC | सहायक आयुक्त पदाच्या नेमणुकीच्या पद्धतीत बदल | वर्ग 3 मधील कर्मचारी देखील परीक्षेद्वारे होणार सहायक आयुक्त
PMC Disaster Management | Rishikesh Balgude | पुणे महापालिकेच्या आपत्कालीन यंत्रणा राम भरोसे! | यंत्रणा सुधारण्याची ऋषिकेश बालगुडे यांची मागणी

PMC Solid Waste Management | मार्टिन ल्यूथर किंग जुनियर ते अल्बर्ट आइनस्टाइन; महापालिका आयुक्तांनी सफाई कर्मचाऱ्यांना दिले वैचारिक पाठबळ!

|  पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांचा सफाई सेवकांशी संवाद; कर्मचाऱ्यांच्या समस्या ऐकून घेत कामात बदल घडविण्याचे आवाहन

 

Naval Kishore Ram IAS – The Karbhari News Service | मार्टिन ल्यूथर किंग यांच्या कणखरपणाच्या विचारांपासून ते अल्बर्ट आइनस्टाइन यांच्या समानतेच्या तत्त्वज्ञानापर्यंतचा दाखला देत पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी सफाई कर्मचाऱ्यांना कामाची प्रेरणा दिली. “कचरा उचलणारा कर्मचारी असो वा विद्यापीठाचा अध्यक्ष, प्रत्येकाशी समानतेने वागले पाहिजे. कुणी छोटा अथवा मोठा नाही; प्रत्येकाचा सन्मान व्हायला हवा,” असा स्पष्ट संदेश देत त्यांनी कर्मचाऱ्यांचा स्वाभिमान आणि कामातील शिस्त या दोन्हींना महत्त्व दिले. निमित्त होते पुणे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने आयोजित केलेल्या ‘स्वच्छ संवाद – एकजूट कर्मचाऱ्यांची, ओळख स्वच्छ पुण्याची’ या संवाद मेळाव्याचे. या वेळी कर्मचाऱ्यांच्या समस्या ऐकून घेतानाच आयुक्तांनी स्वच्छ पुण्यासाठी जबाबदारीने काम करण्याचे आणि शहराच्या स्वच्छतेची मालकी स्वीकारण्याचे आवाहन केले.

पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने बुधवारी (२१ ऑक्टोबर) **‘स्वच्छ संवाद – एकजूट कर्मचाऱ्यांची, ओळख स्वच्छ पुण्याची’** या संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात आयुक्तांनी सफाई सेवकांशी थेट संवाद साधत त्यांच्या दैनंदिन कामातील अडचणी, समस्या आणि अपेक्षा जाणून घेतल्या. कर्मचाऱ्यांनीही कंटेनर, वाहने, ठेकेदारांकडून होणारी अडवणूक, बदल्यांच्या धमक्या, सुट्ट्या आणि कामासाठी आवश्यक सुविधांचा अभाव अशा अनेक प्रश्नांना वाचा फोडली.

या कार्यक्रमासाठी प्रजित नायर, अतिरिक्त महापालिका आयुक्त (इ), ओमप्रकाश दिवटे, अतिरिक्त महापालिका आयुक्त (वि), अनिरुद्ध पावसकर, शहर अभियंता, संतोष वारुळे, उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन,  आशा राऊत, मा.उपायुक्त, परिमंडळ क्र. १, अविनाश सकपाळ, उपायुक्त, परिमंडळ क्र.२, विजयकुमार थोरात, उपायुक्त, परिमंडळ क्र.३, अरविंद माळी, उपायुक्त, परिमंडळ क्र.४, माधव जगताप, उपायुक्त, परिमंडळ क्र.५, निखिल मोरे, उपायुक्त, भूसंपादन व व्यवस्थापन, सोमनाथ बनकर, मा.उपायुक्त, अतिक्रमण/अनधिकृत बांधकाम निर्मुलन विभाग)  गणेश सोनुने, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, सर्व क्षेत्रिय कार्यालयाकडील महापालिका सहाय्यक आयुक्त, तसेच सर्व क्षेत्रिय कार्यालयाकडील सर्व वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, आरोग्य निरीक्षक, मोकादम व प्रातिनिधिक स्वरूपात प्रत्येक क्षेत्रिय कार्यालयाकडील सफाई सेवक इ. उपस्थित होते.

| ‘आपण सगळे समान आहोत; कुणालाही अपमान करण्याचा अधिकार नाही’

आयुक्त नवल किशोर राम यांनी प्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आइनस्टाइन यांच्या विचारांचा दाखला देत प्रत्येक व्यक्तीला समानतेने वागविण्याचे महत्त्व स्पष्ट केले. स्वच्छता कर्मचारी असो किंवा उच्च पदावरील व्यक्ती, प्रत्येकाचा आदर केला गेला पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.

महापालिकेत कोणताही कर्मचारी दुय्यम दर्जाचा नाही. एकमेकांमध्ये अंतर ठेवण्याऐवजी प्रशासन आणि कर्मचारी यांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे. कोणालाही दुसऱ्याचा अपमान करण्याचा अधिकार नाही, असे सांगत आयुक्तांनी कर्मचाऱ्यांना सन्मानाने काम करण्याचे वातावरण निर्माण करण्याचा संदेश दिला.

मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियर यांच्या विचारांचा संदर्भ देत त्यांनी आव्हानात्मक परिस्थितीत आणि वादाच्या प्रसंगी व्यक्तीच्या कणखरपणाची परीक्षा होत असल्याचे सांगितले. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत आपल्या कामाला प्राधान्य द्यावे आणि ते प्रामाणिकपणे पार पाडावे, असे आवाहन त्यांनी केले. ( “The ultimate measure of a man is not where he stands in moments of convenience and comfort, but where he stands at times of challenge and controversy.” – Martin Luther King Jr.)

 

| ‘इंदूरला जायची वेळ का यावी? पुण्यात काय कमी आहे?’

पुण्यात स्वच्छतेसाठी इंदूरसारख्या शहराचे उदाहरण देण्याची वेळ का यावी, असा सवाल आयुक्तांनी उपस्थित केला. पुण्यात चांगली व्यवस्था उभी करण्याची क्षमता आहे; मात्र त्यासाठी केवळ नेहमीच्या पद्धतीने काम करून चालणार नाही. चिकित्सक विचार करून कामाच्या पद्धतीत बदल घडविण्याची गरज आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

प्रत्येक विभागाने आपल्या जबाबदाऱ्या ओळखून एकत्रितपणे काम केले पाहिजे. स्वच्छतेची जबाबदारी केवळ घनकचरा विभागाची नसून इतर विभागांनीही त्यात सक्रिय सहभाग घ्यायला हवा. शहराच्या स्वच्छतेची मालकी आपण स्वीकारत नाही, तोपर्यंत अपेक्षित बदल घडणार नाहीत, असे आयुक्त म्हणाले.

“१६ हजार कोटींचे बजेट असलेली महापालिका शहराला स्वच्छतागृहांची पुरेशी सुविधा देऊ शकत नसेल, तर त्याचा विचार करायला हवा,” अशा शब्दांत त्यांनी शहरातील स्वच्छता व्यवस्थेतील त्रुटींवरही लक्ष वेधले. घनकचरा विभागाला आणखी २५० ते ३०० कोटी रुपयांच्या अतिरिक्त बजेटची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.

| सफाई सेवकांच्या तक्रारींचा पाढा; कंटेनरपासून बदल्यांपर्यंत प्रश्न

संवाद मेळाव्यात सफाई सेवक आणि आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी आपल्या अडचणी स्पष्टपणे मांडल्या. काम करण्याची तयारी असूनही आवश्यक सुविधा मिळत नसल्याची खंत कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.

कंटेनर उपलब्ध होत नाहीत, मागणी करूनही वेळेवर कचरा वाहतूक करणारी गाडी मिळत नाही, अशा तक्रारी कर्मचाऱ्यांनी केल्या. काही ठिकाणी नगरसेवकांकडून कर्मचाऱ्यांना त्रास दिला जात असल्याचा आरोपही करण्यात आला. ठेकेदार मुकादमांचे ऐकत नसल्याने काम करताना अडचणी येतात, असेही सांगण्यात आले.

बदल्यांची धमकी दिली जाते, सामाजिक आणि राजकीय हस्तक्षेप होतो, तसेच येरवड्यासारख्या भागात बदली करण्याबाबतही दबाव आणला जात असल्याच्या तक्रारी मांडण्यात आल्या. एखादी चूक झाल्यास थेट कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी त्यांची बाजू समजून घ्यावी, अशी अपेक्षाही व्यक्त झाली.

यावर आयुक्तांनी बदल्यांच्या विषयावर कर्मचाऱ्यांना आश्वस्त करत अनावश्यक भीती बाळगू नये, असे सांगितले. कर्मचाऱ्यांनी कोणत्याही दबावाखाली न राहता आपले काम जबाबदारीने करावे. काही अडचण आल्यास प्रशासन त्यावर तोडगा काढण्यासाठी तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 पीएफ, सुट्ट्या, प्रोत्साहन भत्ता आणि महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा

मुकादम वैजनाथ गायकवाड यांनी कंत्राटदारांकडून भविष्य निर्वाह निधी (पीएफ) संदर्भातील लाभ मिळत नसल्याची तक्रार मांडली. महिला कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी सुरक्षा मिळावी, अशी मागणी आरोग्य निरीक्षकांनी केली. कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्यांचा प्रश्न अद्याप प्रलंबित असल्याचेही निदर्शनास आणून देण्यात आले.

कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता द्यावा, कामकाजासाठी स्वतंत्र ॲप तयार करावे आणि त्याद्वारे कामाचे नियोजन व देखरेख करावी, अशी मागणीही करण्यात आली. योग्य सुविधा आणि स्पष्ट कार्यपद्धती दिल्यास कर्मचारी चांगले काम करून दाखवतील, असा विश्वास कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला.

महिलांची कामे महिलांना देण्याची गरज, आरोग्य कोठ्यांची सुधारणा, झोपडपट्टी भागांत रात्रीच्या पाळीत कर्मचारी उपलब्ध करून देणे आणि स्वच्छ सहकारी संस्थांना अधिक अनुदान देणे, असे मुद्देही चर्चेत आले. कायमस्वरूपी कर्मचारी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली; त्याचवेळी कायम सेवकांची भरती करता येत नसल्याने कंत्राटी कर्मचाऱ्यांचीही आवश्यकता असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.

कुत्री आणि मांजरी यांच्याशी संबंधित कामे सफाई कर्मचाऱ्यांकडे सोपवू नयेत, अशी मागणीही कर्मचाऱ्यांनी केली.

रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांवर नियंत्रणाची गरज

रस्त्यावर नागरिकांकडून कचरा टाकला जात असल्याने कर्मचाऱ्यांना वारंवार तक्रारींचा सामना करावा लागत असल्याचे विभागातील कर्मचाऱ्यांनी सांगितले. गायरान जमिनीवर कचरा टाकणे आणि गोठ्यांमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांबाबतही उपाययोजना करण्याची मागणी झाली.

व्यावसायिक कचरा संकलन व्यवस्थेत अधिक शिस्त आणण्याची गरज असल्याचे कर्मचाऱ्यांनी निदर्शनास आणले. व्यावसायिकांकडून निर्माण होणारा कचरा योग्य पद्धतीने संकलित केला जावा आणि तो रस्त्यावर येणार नाही, यासाठी स्पष्ट नियम व प्रभावी व्यवस्था असावी, अशी भूमिका मांडण्यात आली.

शौचालये आणि कचरा प्रक्रिया प्रकल्पांच्या स्वच्छतेकडेही लक्ष देण्याची गरज व्यक्त करण्यात आली. केवळ कर्मचाऱ्यांनी स्वच्छता करून उपयोग नाही, तर नागरिकांचेही प्रबोधन होणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले.

‘घोड्यासारखे काम करा; गाढवासारखे नव्हे!’

कामाच्या पद्धतीत बदल घडवून आणण्याचे आवाहन करताना आयुक्तांनी प्रमाणित कार्यपद्धती अर्थात एसओपीचे पालन करण्यावर भर दिला. प्रत्येक काम योग्य नियोजनाने आणि जबाबदारीने केले, तर स्वच्छता व्यवस्थेत चांगले परिणाम दिसतील, असे त्यांनी सांगितले.

“आपल्याला घोड्यासारखे काम करायचे आहे; गाढवासारखे काम करायचे नाही,” अशा शब्दांत त्यांनी कामात दिशा, नियोजन आणि परिणामकारकता महत्त्वाची असल्याचे अधोरेखित केले. केवळ काम करत राहण्यापेक्षा ते योग्य पद्धतीने आणि अधिक चांगल्या परिणामांसाठी करणे आवश्यक आहे, असा संदेश त्यांनी दिला.

कर्मचाऱ्यांनी नागरिकांना सामोरे जावे, त्यांच्या तक्रारी ऐकून घ्याव्यात आणि शहरात स्वच्छतेचे संदेश पोहोचवावेत, असेही आयुक्तांनी सांगितले. “कुणी काही बोलले, तर माझे नाव सांगा. तुमची समस्या सोडविण्यासाठी मी तयार आहे,” असे आश्वासन त्यांनी कर्मचाऱ्यांना दिले.

उल्लेखनीय काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सन्मान

या मेळाव्यात विविध क्षेत्रीय कार्यालयांमध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, आरोग्य निरीक्षक, मुकादम आणि सफाई सेवकांचा प्रातिनिधिक स्वरूपात सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. महापालिका आयुक्तांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमानंतर त्यांनी सफाई सेवकांसोबत स्नेहभोजनही केले.

प्रशासन आणि सफाई सेवक यांच्यातील संवाद वाढविणे, कर्मचाऱ्यांना त्यांच्या समस्या मोकळेपणाने मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि स्वच्छ पुण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.

स्वच्छ पुण्याची जबाबदारी केवळ सफाई सेवकांची नाही; प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि नागरिक या सर्वांनी ती सामूहिकपणे स्वीकारली, तरच शहराच्या स्वच्छतेत अपेक्षित बदल घडू शकतो, हा संदेश या संवाद मेळाव्यातून पुढे आला.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0