Pune Grand Tour  | पुणे ग्रँड टूरसाठी १३५.७५ किमी मार्ग सज्ज करण्याची तयारी; महापालिकेची यंत्रणा कामाला

Pune Grand Tour 2027 साठी पुणे महापालिकेची तयारी वेगात. ४ पॅकेजमध्ये १३५.७५ किमीचा मार्ग, रस्ते विकास आणि सेवा वाहिन्यांच्या कामांचा आढावा.

Homeadministrative

Pune Grand Tour  | पुणे ग्रँड टूरसाठी १३५.७५ किमी मार्ग सज्ज करण्याची तयारी; महापालिकेची यंत्रणा कामाला

Ganesh Kumar Mule Oct 07, 2026 8:09 PM

Voter List | मतदार यादीत नाव नोंदणीसह इतर तपशील अद्यावत करण्याचे आवाहन
Parbhani Violence | संविधानाची विटंबना करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा |  रिपब्लिकन पक्षाची मागणी
Maharashtra CM Eknath Shinde | स्वच्छ माझा महाराष्ट्र अभियान राज्यभर राबवणार | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

Pune Grand Tour  | पुणे ग्रँड टूरसाठी १३५.७५ किमी मार्ग सज्ज करण्याची तयारी; महापालिकेची यंत्रणा कामाला

| चार पॅकेजमध्ये सायकल स्पर्धेचा मार्ग; रस्ते, सेवा वाहिन्या आणि वाहतूक व्यवस्थेच्या कामांचा आढावा

 

PMC Road Department – (The Karbhari News Service) – जानेवारी २०२७ मध्ये पुण्यात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेने स्पर्धेच्या मार्गाची तयारी वेगाने सुरू केली आहे. महापालिका कार्यक्षेत्रातील तब्बल १३५.७५ किलोमीटरचा मार्ग चार पॅकेजमध्ये निश्चित करण्यात आला असून, या मार्गावर आंतरराष्ट्रीय मानकांनुसार रस्ते तयार करण्याबरोबरच विविध सेवा वाहिन्यांची कामे आणि वाहतूक व्यवस्थेचे नियोजन केले जात आहे. (Pune Municipal corporation – PMC)

स्पर्धेच्या मार्गावर सध्या सुमारे ५८ किलोमीटर रस्ते विकसित झालेले असून, उर्वरित सुमारे ७८ किलोमीटर रस्ते नव्याने विकसित करण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या पथ विभागासह विविध विभाग आणि सेवा वाहिनी संस्थांची यंत्रणा कामाला लागली आहे.

चार पॅकेजमध्ये १३५.७५ किमीचा मार्ग

पुणे ग्रँड टूरचा महापालिका कार्यक्षेत्रातील मार्ग चार पॅकेजमध्ये विभागण्यात आला आहे.

पॅकेज १ – २५.४४ किमी
राजीव गांधी नदीवरील पुलापासून औंध, बाणेर, पाषाण, युनिव्हर्सिटी, रेंजहिल्स या मार्गाचा समावेश आहे.

पॅकेज २ – ३७.०२ किमी
रेंजहिल्स, सेनापती बापट रोड, कोथरूड, कर्वेनगर, सिंहगड रोड, पर्वती, सारसबाग आणि लालबहादूर शास्त्री मार्ग या परिसरातून हा मार्ग जाणार आहे.

पॅकेज ३ – ४४.५७ किमी
लालबहादूर शास्त्री मार्ग, अलका टॉकीज चौक, टिळक रोड, बाजीराव रोड, शिवाजी रोड, शिवदर्शन, गंगाधाम, कोंढवा, भवानी पेठ, येवलेवाडी, कॅम्प, रेसकोर्स आणि भेरोबानाला या मार्गाचा यात समावेश आहे.

पॅकेज ४ – २८.७२ किमी
भेरोबा नाला, बी.टी. कवडे रोड, मगरपट्टा, मुंढवा, नॉर्थमन रोड, विधानभवन, शनिवारवाडा, मनपा भवन, एफ.सी. रोड आणि बालगंधर्व या मार्गाचा समावेश आहे.

या चारही पॅकेजची एकूण लांबी १३५.७५ किलोमीटर आहे.

२६ आणि ३१ जानेवारीला महत्त्वाचे टप्पे

सुधारित प्रेस नोटनुसार, २६ जानेवारी २०२७ रोजी स्टेज १ अंतर्गत लेडीज क्लब ते नांदेडसिटी दरम्यानच्या सुमारे १६ किलोमीटरच्या मार्गावर सायकल स्पर्धा होणार आहे.

त्यानंतर ३१ जानेवारी २०२७ रोजी स्टेज ६ अंतर्गत राजीव गांधी पूल ते बालगंधर्व या मार्गावर स्पर्धा होणार आहे.

या दोन्ही टप्प्यांच्या पार्श्वभूमीवर मार्गावरील रस्त्यांची स्थिती, वाहतूक व्यवस्था आणि विविध सेवा वाहिन्यांची कामे वेळेत पूर्ण करण्यावर महापालिकेचा भर आहे.

विविध विभाग आणि सेवा संस्थांमध्ये समन्वय

या तयारीच्या अनुषंगाने ६ ऑक्टोबर २०२६ रोजी पुणे महापालिकेच्या मुख्य इमारतीत बैठक घेण्यात आली. या बैठकीला शहर अभियंता, अतिरिक्त पोलीस आयुक्त (वाहतूक) मनोज पाटील, महापालिकेचे मुख्य अभियंता (पथ) राजेश बनकर यांच्यासह विविध खातेप्रमुख आणि संबंधित आस्थापनांचे अधिकारी उपस्थित होते.

सायकल स्पर्धेच्या मार्गावर आंतरराष्ट्रीय मानकांनुसार रस्ते तयार करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या.

MNGL, MSDCLसह महापालिकेच्या विभागांची कामे

स्पर्धेच्या मार्गावर विविध सेवा वाहिन्यांसाठी आवश्यक असलेल्या कामांचाही आढावा घेण्यात आला. यामध्ये MNGL, MSDCL, Dinesh Engineering, CCTV Allied Company यांच्यासह महापालिकेचे पाणीपुरवठा, ड्रेनेज आणि विद्युत विभाग सहभागी आहेत.

स्पर्धेच्या मार्गावर भविष्यात पुन्हा रस्ते खोदण्याची वेळ येऊ नये आणि स्पर्धेपूर्वी रस्त्यांची स्थिती चांगली राहावी, यासाठी संबंधित सेवा वाहिन्यांची कामे समन्वयाने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

मुख्य चौकांतील कामांना शनिवार-रविवारचे नियोजन

स्पर्धेच्या मार्गावरील विविध सेवा वाहिन्यांसाठी आवश्यक खोदकामाची कामे वाहतूक विभागाशी समन्वय साधून करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. विशेषतः मुख्य चौकांमधील रस्ता क्रॉसिंगची कामे शनिवार आणि रविवार या दिवशी करण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे.

महापालिकेने निश्चित केलेल्या SOPनुसार ही कामे ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

स्पर्धेपूर्वी रस्ते दर्जेदार करण्याचे आव्हान

पुणे ग्रँड टूर ही आंतरराष्ट्रीय दर्जाची सायकल स्पर्धा असल्याने स्पर्धेचा मार्ग दर्जेदार आणि सुरक्षित ठेवणे महापालिकेसाठी महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे रस्ते विकासासोबतच सेवा वाहिन्यांची कामे, रस्ता क्रॉसिंग, वाहतूक नियंत्रण आणि विविध विभागांमधील समन्वय यावर विशेष लक्ष दिले जात आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: