Sunil Shinde RMS | शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न ५ सप्टेंबरपर्यंत सोडवा; अन्यथा उपोषण — कामगार नेते सुनील शिंदे
Pune News – (The Karbhari News Service) – मॉर्डन एज्युकेशन सोसायटी संस्थेअंतर्गत येणाऱ्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पुणे येथील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवावेत. हे प्रश्न ५ सप्टेंबरपर्यंत मार्गी न लागल्यास उपोषण करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा कामगार नेते व नगरसेवक सुनील शिंदे यांनी दिला.
शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी २४ ऑगस्ट रोजी वाडिया कॉलेजच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ इशारा सभा घेण्यात आली. वारंवार निवेदने देऊन तसेच व्यवस्थापनाशी प्रत्यक्ष भेटी घेऊनही प्रश्न सुटत नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.
कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अद्याप सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनश्रेणी लागू करण्यात आलेली नाही. तसेच औद्योगिक न्यायालय, पुणे यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना मागील कालावधीतील वेतनातील फरकासह सेवेत कायम करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र न्यायालयाच्या आदेशानुसार देय असलेली मागील वेतनातील फरकाची रक्कम अद्याप कर्मचाऱ्यांना मिळालेली नाही.
याशिवाय कंत्राटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न मा. कामगार न्यायालय, पुणे येथे प्रलंबित आहे. या सर्व प्रश्नांबाबत राष्ट्रीय मजदूर संघटनेशी (RMS) सामोपचाराने चर्चा करून प्रश्न सोडविण्याचे आश्वासन व्यवस्थापनाकडून वारंवार देण्यात येत असले, तरी प्रत्यक्षात अद्याप ठोस कार्यवाही झालेली नाही.
या पार्श्वभूमीवर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी २१ ऑगस्ट रोजी काळ्या फिती लावून आंदोलन केले. त्यानंतर २४ ऑगस्ट रोजी वाडिया कॉलेजच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ इशारा सभा घेण्यात आली.
इशारा सभेनंतर कामगार नेते व नगरसेवक सुनील शिंदे यांच्या नेतृत्वाखाली वाडिया कॉलेजच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने वाडिया कॉलेजचे ट्रस्टी प्रा. चांडक यांची भेट घेऊन प्रलंबित प्रश्नांवर चर्चा केली. या बैठकीत व्यवस्थापनाने वरील सर्व प्रश्न एका आठवड्यात सोडविण्याचे आश्वासन दिले.
“कर्मचाऱ्यांच्या न्याय्य हक्कांबाबत आता अधिक विलंब सहन केला जाणार नाही. व्यवस्थापनाने दिलेल्या आश्वासनानुसार ५ सप्टेंबरपर्यंत सर्व प्रश्न मार्गी लावावेत. अन्यथा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी उपोषणासह तीव्र आंदोलन करण्यात येईल,” असा इशारा सुनील शिंदे यांनी दिला.
या वेळी शिष्टमंडळात संघटनेचे पदाधिकारी सुनील काटे, ज्ञानेश्वर उघडे आणि लक्ष्मण परांडे उपस्थित होते.

COMMENTS