Pune Ganesh Utsav 2026 | पुणे महापालिकेचे गणेश मंडळांसाठी 12 महत्त्वाचे निर्णय
Pune PMC News – (The Karbhari News Service) – आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेत आज गणेश मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक यांच्यासोबत बैठक आयोजित करण्यात आली. उत्सवाची पूर्वतयारी, नियोजन आणि नागरिकांच्या विविध मागण्यांबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. (Pune Ganesh Mandal)
या बैठकीला महापौर मंजुषा दीपक नागपुरे, उप महापौर परशुराम वाडेकर, स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले, सभागृह नेते गणेश बिडकर, विरोधी पक्षनेते निलेश निकम, पक्षनेते रामचंद्र कदम, पक्षनेते सोपान चव्हाण, पक्षनेते नितीन गावडे, महापालिका आयुक्त नवल किशोर राम, धीरज घाटे, पोलीस सह आयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त संजय पाटील, पत्रकार, महापालिकेचे अधिकारी आणि विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीत मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी ध्वनिक्षेपक आणि साऊंड सिस्टीमची नियमावली, वाहतूक नियोजन, एक खिडकी योजना, गणेश विसर्जनाची वेळ वाढवणे, मंडळांना आवश्यक परवानग्या आणि सुविधा याबाबत विविध सूचना आणि मागण्या मांडल्या. गणेशोत्सव काळात नागरिकांना आणि गणेश मंडळांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी प्रशासनाने समन्वयाने काम करावे, अशी मागणी करण्यात आली.

यावर महापौर मंजुषा दीपक नागपुरे यांनी गणेशोत्सवाच्या नियोजनाबाबत महत्त्वाचे निर्णय आणि आश्वासने दिली.
बैठकीतील प्रमुख 12 निर्णय आणि आश्वासने:
1. गणेशोत्सव हा राज्योत्सव म्हणून साजरा करण्याच्या दृष्टीने विशेष डॉक्युमेंट्री तयार करण्यात येणार आहे.
2. गणेश मंडळांना विविध परवानग्या आणि आवश्यक प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी एक खिडकी योजना राबवण्यात येणार आहे.
3. शहरातील प्रत्येक गणेश मंडळाची माहिती डिजिटल मॅपिंगद्वारे वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
4. गणेशोत्सवादरम्यान गर्दीचे योग्य नियोजन आणि नियंत्रण करण्यासाठी पोलिस प्रशासनाला आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.
5. गणेशोत्सवापूर्वी शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याची कार्यवाही पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले.
6. भाविक आणि नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी सार्वजनिक स्वच्छतागृहांची संख्या वाढवण्याचे आदेश देण्यात आले.
7. महिला भाविकांच्या सुविधेसाठी हिरकणी कक्ष स्थापन करण्यात येणार आहे.
8. गणेशोत्सवाच्या काळात मंडळांना आवश्यक जाहिरात आणि प्रसिद्धी संदर्भात आकाशचिन्ह विभागामार्फत कोणतेही शुल्क आकारू नये याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली.
9. शहरात ड्रग्समुक्त पुणे अभियान राबवण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.
10. गणेश मंडळांच्या स्थानिक पातळीवरील तक्रारींचे तातडीने निराकरण व्हावे यासाठी प्रत्येक प्रभागासाठी एका नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येणार आहे.
11. गणेशोत्सवाच्या काळात मेट्रोच्या तिकीट विक्रीदरम्यान नागरिकांना अडचण येऊ नये यासाठी नेटवर्कची योग्य व्यवस्था करण्याचे निर्देश मेट्रो प्रशासनाला देण्यात आले.
12. गणेशोत्सव काळात खाद्यपदार्थांच्या विक्रीसाठी आणि स्टॉलसाठी कोणतेही शुल्क आकारू नये याबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली.

गणेशोत्सव हा पुण्याच्या सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनातील महत्त्वाचा उत्सव असून तो अधिक सुरक्षित, शिस्तबद्ध आणि पर्यावरणपूरक पद्धतीने पार पाडण्यासाठी पुणे महानगरपालिका, पोलिस प्रशासन, गणेश मंडळे आणि नागरिकांनी समन्वयाने काम करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले.
गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी मांडलेल्या सूचना आणि मागण्यांचा सकारात्मक विचार करून आवश्यक उपाययोजना करण्याचे आश्वासन प्रशासनाच्या वतीने देण्यात आले. त्यामुळे आगामी गणेशोत्सवाच्या नियोजनाला अधिक गती मिळणार असून नागरिक आणि गणेश मंडळांना आवश्यक सुविधा वेळेत उपलब्ध करून देण्यावर महानगरपालिकेचा भर राहणार आहे.

COMMENTS