Pune PMC News | PMC च्या शाळांमधील विद्यार्थ्यांना गणवेश, पुस्तकांसाठी थेट बँक खात्यात पैसे | महिला बाल कल्याण समितीसमोर 10.80 कोटींच्या DBT योजनेचा प्रस्ताव
PMC Schools Students – (The Karbhari News Service) – सन 2026-27 या शैक्षणिक वर्षात पुणे महानगरपालिकेच्या माध्यमिक शिक्षण विभागाअंतर्गत येणाऱ्या विद्यार्थ्यांना गणवेश, पुस्तके आणि इतर साहित्यासाठी दिली जाणारी मदत यंदा थेट लाभार्थीच्या बँक खात्यात वर्ग करण्यात येणार आहे. या DBT प्रणालीसाठीचा 10 कोटी 80 लाख रुपयांचा प्रस्ताव महिला व बालकल्याण समितीसमोर मांडण्यात आला आहे. (PMC Women and Child Welfare Committee)
राज्य शासनाच्या आदेशानुसार विविध कल्याणकारी योजनांचा लाभ थेट बँक खात्यात जमा करण्याच्या धोरणानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.
माध्यमिक शिक्षण विभागाने सादर केलेल्या प्रस्तावानुसार खालील 3 योजनांसाठी DBT राबवण्यात येणार आहे:
1. *मनपा माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांसाठी मोफत गणवेश*: 4 कोटी रुपये
2. *राजीव गांधी अकॅडमी ऑफ ई-लर्निंग इंग्लिश स्कूल*: 6 कोटी रुपये
यामध्ये देखभाल, दुरुस्ती, गणवेश, पुस्तके, भोजन आणि तदनुषंगिक कामांचा खर्च समाविष्ट आहे.
3. *क्रीडानिकेतन*: 80 लाख रुपये
यामध्ये भोजन, गणवेश आणि क्रीडा साहित्याचा समावेश आहे.
एकूण अंदाजपत्रकीय तरतूद: *10 कोटी 80 लाख रुपये*
प्रस्तावात नमूद केल्याप्रमाणे DBT प्रणालीअंतर्गत पुढील बाबी करण्याची मान्यता मागितली आहे:
1. *दर कायम*: मध्यवर्ती भांडार विभागाने सन 2025-26 साठी निश्चित केलेले साहित्याचे दरच 2026-27 साठीही कायम ठेवण्यात येणार आहेत.
2. *थेट खात्यात जमा*: विद्यार्थी/पालकांच्या आधारकार्डशी लिंक असलेल्या राष्ट्रीयीकृत/को-ऑपरेटिव्ह/शेड्युल्ड बँकेच्या खात्यात रक्कम जमा केली जाईल.
3. *वसतिगृहातील विद्यार्थी*: ज्या विद्यार्थ्यांकडे बँक खाते उघडण्यासाठी आवश्यक कागदपत्रे नाहीत, त्यांची रक्कम पालक म्हणून संबंधित वसतिगृह किंवा सामाजिक संस्थेच्या खात्यावर जमा करण्यात येईल.
4. *पॅकेज कायम*: 2025-26 मध्ये तयार करण्यात आले इयत्तानिहाय पॅकेज 2026-27 साठीसाठीही कायम ठेवण्यात येणार आहे.
2018-19 पासून DBT योजनेअंतर्गत साहित्य खरेदीची निविदा प्रक्रिया मध्यवर्ती भांडार विभागामार्फत राबवली जात होती. मात्र आता थेट लाभार्थ्यांना पैसे देऊन त्यांना हवे ते साहित्य खरेदी करण्याचे स्वातंत्र्य देण्यात येणार आहे.

COMMENTS