Merged 23 Villages DP | शहराच्या नियोजनाला गती देणाऱ्या महत्त्वपूर्ण प्रस्तावास शहर सुधारणा समितीची मान्यता
Smita Vaste BJP – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेच्या शहर सुधारणा समितीच्या आज झालेल्या बैठकीत शहराच्या भविष्यातील नियोजनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या प्रस्तावास एकमताने मान्यता देण्यात आली. या प्रस्तावामुळे पुणे महानगरपालिका हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या २३ गावांसाठी विकास आराखडा (Development Plan) तयार करण्याच्या प्रक्रियेला अधिकृतपणे प्रारंभ होणार आहे. (PMC City Improvement Committee)
महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ मधील तरतुदींनुसार विकास आराखडा तयार करण्याचा इरादा जाहीर करण्यात येणार असून, या प्रक्रियेसाठी आवश्यक नगररचना अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यासही समितीने मान्यता दिली आहे. त्यानुसार पुणे महानगरपालिकेच्या नगररचना विभागातील अनिरुद्ध पावसकर (एम.ई. टाउन प्लॅनिंग), शहर अभियंता यांची नगररचना अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे.
या निर्णयामुळे नव्याने समाविष्ट गावांचा नियोजनबद्ध, संतुलित आणि शाश्वत विकास करण्यासाठी आवश्यक असलेली प्रक्रिया वेगाने सुरू होईल. रस्ते, पायाभूत सुविधा, सार्वजनिक सुविधा, हरित क्षेत्रे आणि नागरिकांच्या भविष्यातील गरजा लक्षात घेऊन नियोजनबद्ध विकासाचा मार्ग मोकळा होणार आहे.या विषयाच्या पाठपुरावा आणि मंजुरी प्रक्रियेत शहर सुधारणा समितीच्या अध्यक्षा स्मिता वस्ते यांचे विशेष योगदान राहिले.
२३ गावं कोणती?
याबाबत शहर सुधारणा समितीच्या अध्यक्षा स्मिता वस्ते यांनी सांगितले की, “पुण्याच्या सर्वांगीण आणि नियोजनबद्ध विकासासाठी हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे. नव्याने समाविष्ट झालेल्या २३ गावांचा विकास शास्त्रोक्त आणि नागरिककेंद्री पद्धतीने व्हावा, यासाठी विकास आराखडा तयार करणे आवश्यक होते. शहर सुधारणा समितीने या प्रस्तावास मान्यता देऊन शहराच्या भविष्यातील विकासाला दिशा देणारा महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. नागरिकांच्या अपेक्षा आणि भविष्यातील गरजा लक्षात घेऊन नियोजनबद्ध, सक्षम आणि सर्वसमावेशक विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”
शहराच्या दीर्घकालीन विकासाच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा ठरणार असून, पुण्याच्या नियोजनबद्ध विस्ताराला आणि सुयोग्य नागरी विकासाला यामुळे मोठी चालना मिळणार आहे.

COMMENTS