World Environment Day PMC | ५ जून ते १४ ऑगस्टपर्यंत स्थानिक जातींची रोपे फक्त ५ रुपयांत उपलब्ध
“हरित पुणे, समृद्ध पुणे” मोहिमेचा शुभारंभ; पर्यावरण दिनी रोपे विक्री व बीज संकलन केंद्र सुरू
छत्रपती संभाजीराजे उद्यानात वनमहोत्सव उपक्रमाचे उद्घाटन
Pune PMC News – (The Karbhari News Service) – जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पुणे महानगरपालिकेच्या उद्यान वृक्ष प्राधिकरण विभागातर्फे “वनमहोत्सव वृक्षारोपण आणि बीज संकलन केंद्र” उपक्रमाचा शुभारंभ शुक्रवारी छत्रपती संभाजीराजे उद्यान, जंगली महाराज रस्ता येथे पार पडला. (Pune Municipal Corporation – PMC)
“हरित पुणे, समृद्ध पुणे” या मोहिमेअंतर्गत शहरात मोठ्या प्रमाणावर स्थानिक वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) ओमप्रकाश दिवटे यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी १०.३० वाजता झाले. यावेळी सह महापालिका आयुक्त तथा सदस्य सचिव, वृक्ष प्राधिकरण डॉ. अशोक घोरपडे, मुख्य अभियंता राजेश बनकर, उद्यान अधीक्षक संतोषकुमार कांबळे, प्रिती प्रसाद, स्नेहल हरपळे, नवचैतन्य हास्ययोग परिवाराचे मकरंद टिल्लू, अॅड. राजेंद्र आगरवाल यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
पावसाळी हंगामात शहरात वृक्ष लागवड वाढावी यासाठी इच्छुक वृक्षप्रेमी, नागरिक आणि स्वयंसेवी संस्थांना दिवटे यांच्या हस्ते रोपांचे वाटप करण्यात आले. त्याचवेळी छत्रपती संभाजीराजे उद्यानात ‘बेल’ प्रजातीचे वृक्षरोपणही करण्यात आले.

५ रुपयांत स्थानिक रोपे, बीज संकलन केंद्र सुरू
पुणे महानगरपालिका हद्दीत वृक्ष लागवडीसाठी ५ जून ते १४ ऑगस्ट २०२६ या कालावधीत एक ते दीड वर्षांची स्थानिक जातींची रोपे फक्त ५ रुपये प्रति रोप या सवलतीच्या दरात वाटप करण्यात येणार आहेत. नागरिकांनी आपल्याकडे उपलब्ध असलेल्या वृक्ष, फळझाडांच्या बिया, बीजगोळे बीज संकलन केंद्रात जमा करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. याच कालावधीत घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत तयार केलेले सेंद्रिय खतही नागरिकांसाठी उपलब्ध असेल. रोपे वाटप आणि बीज संकलन केंद्र छ. संभाजीराजे उद्यानातील रोपवाटिका, जंगली महाराज रस्ता, बालगंधर्व रंगमंदिर शेजारी, शिवाजीनगर येथे सकाळी ८ ते सायंकाळी ४ या वेळेत सुरू राहील. रविवार आणि शासकीय सुट्टी वगळून हा उपक्रम सुरू राहणार आहे.
संपूर्ण पुणे शहरात १५ क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत आणि विविध उद्यानांमध्ये खासदार, आमदार, नगरसेवक, स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. नदी पुनर्जीवन प्रकल्पांतर्गतही शहर अभियंत्यांच्या उपस्थितीत वृक्ष लागवड झाली. अधिक माहितीसाठी सहाय्यक उद्यान अधीक्षक रत्नाकर करडे – ९६८९३८५२३ किंवा वृक्ष निरीक्षक रविंद्र कांबळे – ८३०८४१५२५ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पुणे महानगरपालिकेने केले आहे.

COMMENTS