Vidhan Parishad Election | पुणे विधानपरिषद निवडणूक २०२६: ७ उमेदवार रिंगणात | राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांत ‘कलगीतुरा’
| भाजपकडून ‘भाजप व अपक्ष’ नोंद
MLC Election – (The Karbhari News Service) – पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून महाराष्ट्र विधानपरिषदेच्या एका जागेसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी राजकीय वातावरण तापले आहे. एकूण ७ उमेदवारांचे नामनिर्देशन अर्ज वैध ठरल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. सुनील विजय टिंगरे व विक्रम संजय काकडे या दोन्ही नेत्यांनी एकाच पक्षाकडून उमेदवारी अर्ज भरल्याने पक्षाची अधिकृत भूमिका काय, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. (Pune Breaking News)
निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी गजानन पाटील यांनी दि. ०१ जून रोजी नामनिर्देशित उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली.

रिंगणात कोण-कोण?
उमेश महादेव म्हेत्रे (अपक्ष) – दौंड तालुका
तुषार गजानन कामठे (राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार) – पिंपळे निलख
प्रदीप विद्याधर कंद (भारतीय जनता पार्टी व अपक्ष) – लोणीकंद, हवेली
रणजीत सखाराम जरे (अपक्ष) – चाकण, खेड
विक्रम संजय काकडे (नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी) – एरंडवणे, पुणे
श्रीकांत विश्वनाथ पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार) – बोपोडी, पुणे
सुनिल विजय टिंगरे (नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी) – टिंगरेनगर, पुणे
राष्ट्रवादीत ‘एक जागा, दोन दावेदार’
या निवडणुकीत नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी व नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार या दोन्ही गटांनी प्रत्येकी दोन उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. शरद पवार गटाकडून तुषार कामठे व श्रीकांत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

मात्र अजित पवार गटात मोठा पेच निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून विक्रम काकडे व सुनिल टिंगरे या दोघांनीही पक्षाचे चिन्ह व ‘अधिकृत उमेदवार’ म्हणून अर्ज दाखल केला आहे. सुनील टिंगरे हे विद्यमान आमदार असून त्यांनी पक्षश्रेष्ठींकडून आपल्याला उमेदवारी निश्चित झाल्याचा दावा केला आहे. दुसरीकडे, विक्रम काकडे यांनीही वरिष्ठांच्या आशीर्वादाने अर्ज भरल्याचे सांगितले. पक्षाच्या एकाच गटातून दोन उमेदवारांमुळे ‘काकडे विरुद्ध टिंगरे’ असा संघर्ष उफाळून आला आहे.
भाजपची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात
प्रदीप विद्याधर कंद यांनी ‘भारतीय जनता पार्टी व अपक्ष’ म्हणून अर्ज भरला आहे. भाजपने अद्याप अधिकृत उमेदवार जाहीर केलेला नाही. कंद यांना पक्षाचा पाठिंबा आहे की ते अपक्ष म्हणून लढणार, याबाबत संभ्रम आहे.
दोन अपक्षही मैदानात
उमेश म्हेत्रे व रणजीत जरे हे दोन उमेदवार अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत.
पुढे काय?
पुणे स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांचे सदस्य मतदान करतात. अर्ज माघारीची अंतिम तारीख, मतदान व मतमोजणीच्या तारखा लवकरच जाहीर होणार आहेत. उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया ०१ जून रोजी पूर्ण झाली. मात्र राष्ट्रवादीतील अंतर्गत बंडाळी व भाजपच्या भूमिकेमुळे ही निवडणूक चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट आहे. पक्षश्रेष्ठी हा वाद कसा मिटवतात, यावरच निवडणुकीचे गणित अवलंबून राहील.

COMMENTS