Pune PMC Budget | समाविष्ट गावांच्या विकासाला गती; पाणी, रस्ते, आरोग्य आणि उद्यानांवर भर | मिसिंग लिंक, रस्ते दत्तक योजना | भूसंपादनाकरिता ४०० कोटी रुपयांची तरतूद

Homeadministrative

Pune PMC Budget | समाविष्ट गावांच्या विकासाला गती; पाणी, रस्ते, आरोग्य आणि उद्यानांवर भर | मिसिंग लिंक, रस्ते दत्तक योजना | भूसंपादनाकरिता ४०० कोटी रुपयांची तरतूद

Ganesh Kumar Mule Mar 24, 2026 7:36 PM

MSRTC | एसटीच्या ताफ्यात येणार पाच हजार इलेक्ट्रिक आणि दोन हजार डिझेल बसगाड्या | एसटी अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याच्या दरात वाढ
Sandeep Khardekar | महाविकास आघाडीने राज्यात अराजक सदृश परिस्थिती निर्माण न करता उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करावे | भाजपा प्रदेश प्रवक्ता संदीप खर्डेकर यांचे आवाहन
24*7 Water Project | समान पाणीपुरवठा योजनेची कामे निर्धारित वेळेतच पूर्ण करा – पालकमंत्री पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला पुणे शहरातील पाणी पुरवठ्याबाबत आढावा

Pune PMC Budget | समाविष्ट गावांच्या विकासाला गती; पाणी, रस्ते, आरोग्य आणि उद्यानांवर भर | मिसिंग लिंक, रस्ते दत्तक योजना

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) –  महानगरपालिकेत समाविष्ट झालेल्या गावांच्या सर्वांगीण विकासासाठी महापालिकेच्या २०२६-२७ च्या अंदाजपत्रकात पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, आरोग्य सेवा आणि हरित क्षेत्र विकासावर विशेष भर देण्यात आला आहे. नियोजनबद्ध विकास आराखड्याद्वारे समाविष्ट गावांना शहराच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली. (PMC Budget 2026-27)

समाविष्ट २३ गावांसाठी विकास आराखड्याचा इरादा जाहीर करून एका वर्षाच्या आत प्रारूप आराखडा तयार करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. या आराखड्यात रस्ते, पाणीपुरवठा, उद्याने, रुग्णालये आणि शाळांसाठी आवश्यक आरक्षणे निश्चित करून त्यांची अंमलबजावणी करण्यात येईल.

नव्याने समाविष्ट ३४ गावांमध्ये समान पाणीपुरवठा योजना राबविण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात बावधन बुद्रुक, सूस, म्हाळुंगे, लोहगाव आणि वाघोली या भागांमध्ये २८ साठवण टाक्यांची उभारणी करण्यात येणार आहे.

मलनिस्सारण व्यवस्थेसाठी अमृत-२ योजनेअंतर्गत सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला असून, या वर्षात अत्यावश्यक मलवाहिन्यांचे जाळे उभारण्याचे नियोजन आहे. तसेच ११ गावांमध्ये ५० किलोमीटर लांबीच्या मलवाहिन्या टाकण्यात येणार असून, सांडपाणी शुद्धीकरणासाठी आवश्यक केंद्रांची उभारणी केली जाईल.

सांडपाणी थेट नाले व नद्यांमध्ये जाण्यापासून रोखण्यासाठी एमबीबीआर तंत्रज्ञानावर आधारित विकेंद्रित सांडपाणी प्रक्रिया प्रणाली उभारण्यात येणार आहे. आंबिल ओढा, माणिक नाला आणि नागझरी नाल्यावर प्रायोगिक तत्त्वावर प्रक्रिया प्रकल्प सुरू करण्यात येतील.

नागरिकांना प्राथमिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आयुष्मान आरोग्य मंदिरांची संख्या वाढविण्यात येणार आहे. सध्या २७ केंद्रे कार्यान्वित असून, पुढील वर्षात त्यात वाढ होणार आहे.

समाविष्ट गावांमध्ये रस्ते आणि पदपथांचा विकास करण्यासाठी ३२ गावांमध्ये प्रत्येकी एक रस्ता तयार करण्यात येणार असून, त्यासोबत जागतिक दर्जाचे पदपथ उभारले जाणार आहेत.

तसेच उद्यानांसाठी आरक्षित जागा ताब्यात घेऊन विविध थीम पार्क विकसित करण्यात येणार आहेत. यामुळे हरित क्षेत्र वाढण्यासोबतच नागरिकांना विरंगुळा, व्यायाम आणि सार्वजनिक जागांचा लाभ मिळणार आहे.
——-

मिसिंग लिंक, रस्ते दत्तक योजना आणि खड्डेमुक्त रस्ते मोहिम; रस्ते विकासाला गती

पुणे : शहरातील वाहतूक सुलभ करण्यासाठी आणि पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी महापालिकेच्या २०२६-२७ च्या अंदाजपत्रकात रस्ते विकासावर विशेष भर देण्यात आला आहे. मिसिंग लिंक प्रकल्प, रस्ते दत्तक योजना, हेरिटेज रस्ते आणि खड्डेमुक्त रस्ते मोहिम अशा विविध उपक्रमांची घोषणा करण्यात आली असल्याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली.

विकास आराखड्यातील ३२ मिसिंग लिंकपैकी १२ रस्त्यांची कामे सध्या प्रगतीपथावर असून, ती पूर्ण झाल्यानंतर सुमारे ६५ किलोमीटर रस्ते नागरिकांसाठी खुले होणार आहेत. या कामांसाठी भूसंपादनाकरिता ४०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यावर्षी १२ नवीन रस्त्यांची कामे हाती घेण्यात येणार असून, उर्वरित प्रकल्प पुढील तीन वर्षांत टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

शहरातील प्रमुख रस्त्यांची गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी ‘रस्ते दत्तक योजना’ राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत ३५ प्रमुख रस्त्यांच्या देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी सीएसआरअंतर्गत कॉर्पोरेट कंपन्या, संस्था आणि विकसकांना देण्यात येणार आहे, ज्यामुळे संस्थात्मक सहभागातून रस्त्यांची गुणवत्ता सुधारण्यास मदत होणार आहे.
पश्चिम बाह्यवळण मार्गावरील वाकड ते कात्रजदरम्यान सेवा रस्ते विकसित करण्यासाठी भूसंपादन टप्प्याटप्प्याने केले जाणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून सेवा रस्ते उभारले जाणार असून, नवले पुलाजवळील वाहतूक कोंडी आणि अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात येणार आहेत.
शहराच्या पश्चिम आणि पूर्व भागाला जोडणारा शिवणे-खराडी रस्ता प्राधान्याने विकसित केला जाणार आहे. तसेच कात्रज-कोंढवा रस्त्याचे ५० मीटर रुंदीकरणाचे काम प्रगतीपथावर असून, पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मध्यवर्ती पुण्यातील लक्ष्मी रस्ता, थोरले बाजीराव रस्ता आणि छत्रपती शिवाजी रस्ता यांना हेरिटेज स्वरूप देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात लक्ष्मी रस्त्यावरील गणपती चौक ते कुंटे चौक या भागातील काम सुरू होणार आहे.

जुना विमानतळ रस्ता नागपूर चाळ ते ५०९ चौकदरम्यान रुंद करण्यात येणार असून, सीएसआरच्या माध्यमातून त्याचे सुशोभीकरण केले जाईल.

पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी शहरातील पदपथ अतिक्रमणमुक्त करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. ‘एक रस्ता-एक एकक’ या संकल्पनेनुसार अर्बन स्ट्रीट गाइडलाइन्सप्रमाणे अडथळाविरहित, स्वच्छ आणि सुरक्षित पदपथ उपलब्ध करून दिले जातील.

तसेच रस्त्यांवरील चेंबर समपातळीत आणणे, खड्डेमुक्त रस्त्यांची अंमलबजावणी आणि इंडियन रोड काँग्रेसच्या निकषांनुसार गतिरोधक उभारणे यासाठी निश्चित कार्यपद्धती (एसओपी) तयार करण्यात येणार आहे.
—-

समान पाणीपुरवठा योजनेला गती; कार्यक्षम सांडपाणी व्यवस्थापन

पुणे : शहरातील नागरिकांना समान व पुरेसा पाणीपुरवठा करण्याबरोबरच सांडपाणी व्यवस्थापन अधिक कार्यक्षम करण्यासाठी महापालिकेच्या २०२६-२७ च्या अंदाजपत्रकात महत्त्वाचे निर्णय जाहीर करण्यात आले आहेत. समान पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्यासह अत्याधुनिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यावर भर देण्यात आला असल्याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली.

पुणे शहराची २०४७ सालची वाढती गरज लक्षात घेऊन समान पाणीपुरवठा योजना या आर्थिक वर्षात पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. शहरातील नियोजित १४१ पाणीपुरवठा झोनपैकी ७५ झोन लवकरच कार्यान्वित होणार असून, त्यामुळे शहरभर पाणीपुरवठ्यात समतोल साधण्यास मदत होणार आहे.

सांडपाणी व्यवस्थापनाच्या क्षेत्रातही महापालिकेने मोठी झेप घेत भारतातील पहिला ‘झिरो स्लज’ सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचे नियोजन केले आहे. अॅक्टिव्ह मॅग्नेटिक टर्बो ब्लोअर तंत्रज्ञानावर आधारित हा प्रकल्प अधिक ऊर्जा कार्यक्षम ठरणार असून, जल व ध्वनी प्रदूषणात घट होण्यास मदत होईल. सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर राबविण्यात येणारा हा प्रकल्प पुण्याला आधुनिक सांडपाणी व्यवस्थापनात देशात अग्रस्थानी नेणारा ठरेल.

मुळा-मुठा नदीत जाणारे विनाप्रक्रिया सांडपाणी रोखण्यासाठी ‘परम’ प्रकल्प अंतिम टप्प्यात असून, सध्याच्या ४७७ एमएलडी क्षमतेत ३९६ एमएलडीची भर पडणार आहे. यासोबतच खासगी सोसायट्यांमधील सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प २४x७ सुरू राहण्यासाठी सेंट्रल मॉनिटरिंग सिस्टीम विकसित करण्यात येत आहे.

यावर्षी सुमारे १०० किलोमीटर लांबीच्या मलवाहिन्यांचे जाळे उभारण्याचे नियोजन असून, त्यामुळे सांडपाण्याचे शाश्वत व्यवस्थापन आणि नदी प्रदूषण नियंत्रण अधिक प्रभावीपणे साध्य होणार आहे.
—–

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: