Shrinath Bhimale on PMC Shahari Garib Yojana | पुण्यासाठी  कॅन्सर हॉस्पिटल, आयव्हीएफ सुविधा, मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलच्या घोषणा | शहरी गरीब योजनेचे नामकरण आता स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार शहरी गरीब योजना 

Homeadministrative

Shrinath Bhimale on PMC Shahari Garib Yojana | पुण्यासाठी  कॅन्सर हॉस्पिटल, आयव्हीएफ सुविधा, मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलच्या घोषणा | शहरी गरीब योजनेचे नामकरण आता स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार शहरी गरीब योजना 

Ganesh Kumar Mule Mar 24, 2026 6:24 PM

PMC Dialysis Center | पुणे महापालिकेने शुल्क वेळेत न दिल्याने डायलिसिस सेवेवर परिणाम | लायन्स क्लबचे स्पष्टीकरण
PMC Shahari Garib Yojana | पुणे महापालिकेच्या शहरी गरीब योजनेचे कुठल्याही परिस्थितीत खाजगीकरण नाही!
PMC Birth Death Certificate | पुणेकरांना आता ईमेल वर देखील मिळू शकेल जन्म-मृत्यू प्रमाणपत्र! | महापालिकेने उपलब्ध करून दिली सुविधा!

Shrinath Bhimale on PMC Shahari Garib Yojana | पुण्यासाठी  कॅन्सर हॉस्पिटल, आयव्हीएफ सुविधा, मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलच्या घोषणा | शहरी गरीब योजनेचे नामकरण आता स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार शहरी गरीब योजना

PMC Standing Committee – (The Karbhari News Service) – शहरातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम, आधुनिक आणि सर्वसामान्यांना परवडणारी करण्यावर भर देत पुणे महानगरपालिकेच्या २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात “निरोगी पुणे” या संकल्पनेअंतर्गत विविध महत्त्वाकांक्षी उपक्रमांची घोषणा करण्यात आली. (PMC Budget 2026-27)

स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी मुख्य सभेसमोर सादर केलेल्या या अंदाजपत्रकात आरोग्य सेवांसाठी मोठी तरतूद करण्यात आली असून विद्यमान सुविधांचे सक्षमीकरण आणि नव्या सेवा सुरू करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. शहरी गरीब योजनेचे नामकरण आता स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार शहरी गरीब योजना असे करण्यात आले आहे. तसेच योजनेचा फेर आढावा घेण्यात येणार असल्याचे भिमाले यांनी सांगितले.

महापालिकेचे ५३ बाह्य रुग्ण विभाग, २० प्रसूतिगृहे, ४०० खाटांचे सर्वसाधारण रुग्णालय आणि संसर्गजन्य आजारांचे रुग्णालय कार्यरत आहेत. दररोज सरासरी १२ हजार बाह्यरुग्ण व ३०० आंतररुग्ण उपचार घेत असून दरवर्षी सुमारे ३० लाख नागरिकांना आरोग्य सेवा मिळते. दरवर्षी ८५०० प्रसूती महापालिकेच्या प्रसूतिगृहांमध्ये होतात. या सर्व सेवा विनामूल्य उपलब्ध असून शहरी गरीब औषधे व अंशदायी वैद्यकीय साह्य योजनांसाठी सुमारे १५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर कमला नेहरू आणि अण्णासाहेब मगर रुग्णालयांचे आधुनिकीकरण व विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

शहरातील आरोग्य सुविधांना बळकटी देण्यासाठी सहा प्रसूतिगृहे आणि पाच रुग्णालये मल्टीस्पेशालिटी रुग्णालयांमध्ये विकसित करण्यात येणार असून आयसीयू, एनआयसीयू आणि अत्याधुनिक नर्सिंग सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. वारजे येथे १० हजार चौरस मीटरहून अधिक जागेवर ३५० खाटांचे मल्टीस्पेशालिटी रुग्णालय उभारण्याचे काम प्रगतीपथावर आहे.

कर्करोग उपचारासाठी बाणेर येथे सार्वजनिक-खासगी भागीदारीत महापालिकेचे पहिले कॅन्सर रुग्णालय सुरू होणार असून येथे लिनियर एक्सलेरेटरद्वारे रेडिओथेरपीसारखे उपचार ‘सीजीएचएस’ दरात उपलब्ध होतील. तसेच गंगाधाम परिसरात एमआरआय व सिटी-स्कॅन केंद्र उभारण्यात येणार असून त्यामुळे महागड्या निदान चाचण्या कमी दरात उपलब्ध होतील. या सर्व उपाययोजनांमुळे पुणेकरांना स्वस्त व दर्जेदार आरोग्य सेवा शहरातच उपलब्ध होणार आहेत.

प्रसूतिगृहांमध्ये ‘आयव्हीएफ’ उपचार सेवा
महापालिकेच्या प्रसूतिगृहांमध्ये आयव्हीएफ उपचार सेवा सुरू करण्यात येणार असून वंध्यत्वावरील आधुनिक उपचार गरजू कुटुंबांना परवडणाऱ्या दरात मिळणार आहेत.
—-
कर्करोग, डायलिसिस उपचारांसाठी आर्थिक साह्य मर्यादेत वाढ
कर्करोग आणि मूत्रपिंडाच्या आजारांसाठी डायलिसिस उपचारांवरील आर्थिक सहाय्य मर्यादा ३ लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे. पं. दीनदयाळ उपाध्याय अपघात विमा योजनेची फेररचना करून ती अधिक सक्षमपणे राबविण्यात येणार आहे.
—-
वैद्यकीय महाविद्यालयाचा विस्तार
भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयातून यंदा एमबीबीएसची पहिली बॅच बाहेर पडणार असून पदव्युत्तर शिक्षण, जेरियाट्रिक केअर सेंटर, आयव्हीएफ सुविधा आणि दिव्यांग मुलांसाठी विशेष देखभाल युनिट सुरू करण्याचे नियोजन आहे. नायडू रुग्णालय परिसरात विद्यार्थी वसतिगृह व कर्मचारी निवासासाठी १४ मजली इमारत उभारण्यात येणार आहे.
—-
———

देशातील पहिली वायू नियंत्रण यंत्रणा, ‘लेक सिटी’ संकल्पना आणि ५० लाख वृक्षलागवड”

पुणे : वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर अधिक स्वच्छ, हरित आणि पर्यावरणपूरक करण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या सन २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात महत्त्वाकांक्षी उपक्रमांची घोषणा करण्यात आली आहे.

स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी सादर केलेल्या अंदाजपत्रकात पर्यावरण संवर्धनासाठी प्रथमच स्वतंत्र आर्थिक तरतूद करण्यात आली असून आधुनिक तंत्रज्ञान आणि लोकसहभाग यावर भर देण्यात आला आहे.

शहरातील वाढत्या वायू प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी देशातील पहिली अत्याधुनिक वायू प्रदूषण नियंत्रण यंत्रणा सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर उभारण्यात येणार आहे. या यंत्रणेद्वारे हवेचा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) सातत्याने मोजला जाऊन प्रदूषणाच्या पातळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना तत्काळ राबविता येणार आहेत.

पुण्याला ‘लेक सिटी’ म्हणून विकसित करण्यासाठी पहिल्या टप्प्यात पाषाण, मॉडेल कॉलनी आणि जांभुळवाडी येथील तलावांचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. तलाव परिसरात पर्यावरण संवर्धन, जैवविविधतेचे संरक्षण आणि नागरिकांसाठी आकर्षक सार्वजनिक जागांची निर्मिती केली जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात मांगडेवाडी, कात्रज, धायरी आणि लोहगाव परिसरात हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे.

पर्यावरण संवर्धनासाठी लोकसहभाग वाढविण्याच्या दृष्टीने नदी संवर्धन महोत्सव, संवाद-परिषद, प्रशिक्षण आणि जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. तसेच शहरातील टेकड्यांच्या संरक्षणासाठी राज्य वन विभागाच्या सहकार्याने संयुक्त वन व्यवस्थापन प्रकल्प राबविण्यात येणार असून त्यामध्ये संरक्षक भिंती, वृक्षारोपण, पाणीसाठा आणि सुरक्षाव्यवस्था यांचा समावेश असेल.

पुणे महानगरपालिकेच्या वतीने लोकसहभागातून एका वर्षात तब्बल ५० लाख झाडे लावण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तसेच ‘शहरी जलयुक्त शिवार’ योजनेअंतर्गत वेताळ टेकडी, पाचगाव पर्वती, वारजे, गंगाधाम, हडपसर, धानोरी आदी भागांमध्ये पाणी साठवण आणि भूजल पातळी वाढविण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात येणार आहेत.

या सर्व उपक्रमांमुळे पुणेकरांना अधिक स्वच्छ हवा, हरित परिसर आणि पर्यावरणपूरक जीवनमान मिळण्यास मदत होणार आहे. तलावांचे सुशोभीकरण आणि वृक्षलागवडीमुळे शहरातील तापमान नियंत्रणात राहून जैवविविधतेला चालना मिळेल, तर जलयुक्त शिवार योजनेमुळे पाणीटंचाई कमी होण्यास मदत होणार आहे. परिणामी, पुणे शहर अधिक टिकाऊ आणि पर्यावरणस्नेही बनण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकणार आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: