Pune BJP On PMC Election | ‘पुणेकरांशी संवाद साधून निवडणुकीसाठी वचननामा तयार करणार’ | मुरलीधर मोहोळ यांच्या अध्यक्षतेखालील कोअर कमिटीत निर्णय
| मुरलीधर मोहोळ यांच्या नेतृत्वात लढणार निवडणूक : मंत्री चंद्रकांत पाटील
PMC Election 2025 – (The Karbhari News Service) – ‘आगामी महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षातर्फे वचननामा तयार केला जात आहे. त्यासाठी पक्षाचे कार्यकर्ते घरोघर जाऊन पुण्याच्या पुढील २५-५० वर्षातील विकास व भविष्याबाबत पुणेकरांचे मत जाणून घेतील. त्यातून हा वचनमाना तयार केला जाईल, अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी रविवारी दिली. तर ही निवडणूक मोहोळ यांच्या नेतृत्वात लढणार असल्याची घोषणा कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. (Pune News)
लवकरच महापालिका निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका निवडणुकीसाठीच्या पुणे शहर कोअर कमिटीची बैठक रविवारी मोहोळ यांच्या अध्यक्षतेखाली झाली. राज्याचे कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील, पश्चिम महाराष्ट्राचे संघटन मंत्री मकरंद देशपांडे, शहराध्यक्ष धीरज घाटे, माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, ज्येष्ठ नेते दिलीप कांबळे, खासदार मेधा कुलकर्णी, निवडणूक प्रमुख गणेश बिडकर, आमदार भिमराव तापकीर, आमदार सुनिल कांबळे, आमदार सिद्धार्थ शिरोळे, आमदार योगेश टिळेकर, श्रीनाथ भिमाले यांच्यासह विस्तारित कोअर कमिटीचे सदस्य उपस्थित होते.
‘महापालिका निवडणुकांच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या नियमित प्रक्रियेचा भाग म्हणून ही प्राथमिक बैठक झाली. भाजपची यंत्रणा बाराही महिने कार्यरत असते. परंतु, निवडणुकीच्या दृष्टीने शहर पातळीवर आणखी काय करता येईल, याचे प्राथमिक नियोजन या बैठकीत झाले. पक्षाच्या कार्यकर्त्यांची मोठी संख्या पाहता इच्छुकांची संख्या अधिक असण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजपासून दोन दिवस शहर कार्यालयात अर्ज मागवले जातील. हे अर्ज प्रदेश कार्यालयाकडे पाठवले जातील. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार कोअर कमिटी चर्चा करून पुढील निर्णय घेईल,’ असे मोहोळ म्हणाले.
‘भाजपचा वचननामा तयार करण्याचे कामही सुरू झाले आहे. त्यासाठी प्रत्येक प्रभागात कार्यकर्ते घरोघर जातील, पुणेकरांशी चर्चा करतील. पुढील २५-५० वर्षातील पुण्याचे भवितव्य, पुण्याच्या विकासाबाबत पुणेकरांच्या अपेक्षा जाणून घेतील. यात सर्वसामान्यांच्या अपेक्षांबरोबरच विविध विषयातील तज्ज्ञांशीही संवाद साधून त्यांचे मतही विचारात घेतले जाईल. त्यावर आधारित वचननामा तयार केला जाईल. पुढील पाच वर्षात आम्ही त्याची १०० टक्के अंमलबजावणी करू,’ असे मोहोळ म्हणाले. याशिवाय शहराध्यक्षांच्या स्तरावर प्रमुख पदाधिकाऱ्यांसह प्रत्येक प्रभागात संघटनात्मक बैठका घेण्यात येतील. कार्यकर्त्यांशी चर्चा करून त्यांच्या भावनाही जाणून घेतल्या जातील.
‘आम्ही महायुतीचे घटक आहोत. ‘युतीधर्म’ पाळा, अशी भूमिका आमच्या नेत्यांनी मांडली आहे. स्थानिक परिस्थिती पाहून सामंजस्याने जिथे शक्य असेल तिथे महायुती म्हणून निवडणूक लढू जिथे शक्य नाही तिथे मैत्रीपूर्ण लढाई होईल. वरिष्ठांच्या आदेशानुसार पुढील भूमिका स्पष्ट केली जाईल,’असे मोहोळ यांनी नमूद केले.
अन्य पक्षातील माजी नगरसेवकांना, नेत्यांना प्रवेश देण्याबाबत प्रवेशाचे धोरण ठरेल, तेव्हा चर्चा होईल. एकमताने पक्षप्रवेशाबाबत निर्णय घेतला जाईल. जिथे संबंधित कार्यकर्त्यांना प्रवेश दिल्याने पक्षाची ताकद वाढेल, तिथे प्रवेश दिला जाईल. माात्र, जिथे भाजपचा कार्यकर्ता, संघटना सक्षम असेल तिथे कार्यकर्त्यांनाच प्राधान्य राहील, असेही मोहोळ यांनी स्पष्ट केले.
मतदारयादीतील त्रुटी, गोंधळ यावर भारतीय जनता पक्ष गांभीर्याने काम करत आहे. मतदार यादीतील चुका सुधारल्या गेल्याच पाहिजेत. परंतु, त्यावर राजकारण करता कामा नये, असेही मोहोळ यांनी सांगितले.

COMMENTS