Pune Helmet News | शासकीय कार्यालयात येताना आता हेल्मेट सक्तीचे | विना हेल्मेट दुचाकी वाहन चालविणाऱ्यावर कारवाई करण्यासाठी आता रस्ता सुरक्षा पथक!
| उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचे आदेश
Pune RTO – (The Kabhari News Service) – शासकीय कार्यालयात येताना आता कर्मचारी, अधिकारी आणि नागरिक यांना हेल्मेट सक्तीचे असणार आहे. त्यासाठी रस्ता सुरक्षा पथक नियुक्त करण्यात आले आहेत. यामध्ये विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे महानगरपालिका, प्रादेशिक परिवहन कार्यालय यांचा समावेश आहे. या बाबतचे आदेश उप प्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील भोसले यांनी जारी केले आहेत. (Helmet Mandatory)
शासकीय कार्यालयामध्ये कामानिमित्त येणारे बहुतांशी नागरिक तसेच कार्यालयातील कर्मचारी, अधिकारी हे विना हेल्मेट दुचाकी वाहन चालवित असल्याचे निदर्शनास आले आहे. वाहन चालविताना हेल्मेटचा वापर करणे हे रस्ता सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचे आहे. बहुतांशी दुचाकी वाहनांच्या अपघातांमध्ये जखमी होणारे अथवा मृत पावणारे वाहनस्वार हे हेल्मेटशिवाय प्रवास करणारे असतात असे दिसून आले आहे. यास्तव हेल्मेट वापरण्यासंबंधी प्रबोधनात्मक व अंमलबजावणी संबंधी व्यापक मोहीम राबविण्याबाबत विभागीय आयुक्त यांनी आदेश दिले होते. त्यानुसार मोहीमेसंबंधी जिल्हा प्रशासनाच्या मदतीने हेल्मेटचा वापर करण्याबाबत नागरिकांचे प्रबोधन करावे. असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.
नोव्हेंबर २०२५ मध्ये सर्व शासकीय कार्यालयात वायुवेग पथक व रस्ता सुरक्षा पथकातील मोटार वाहन निरीक्षक व सहा. मोटार वाहन निरीक्षक यांनी चक्रकार पध्दतीने विना हेल्मेट दुचाकी वाहन चालविताना आढळून येणाऱ्या अधिकारी/कर्मचारी/नागरिक यांचेवर मोटार वाहन कायदा व त्यामधील तरतुदींनुसार कारवाई करुन त्याचा अहवाल सादर करावा. यामध्ये विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे महानगरपालिका, प्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्या कार्यालयांचा समावेश आहे.

COMMENTS