PMC Deputy Commissioner Avinash Sakpal | उपायुक्त अविनाश सकपाळ यांच्या बदलीचा फेरविचार करण्याची मागणी
| राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, कमर्चारी वर्गाकडून बदली रद्द करण्याची मागणी
PMC Property Tax Department – (The Karbhari News Service) – महापालिका उपायुक्त अविनाश सकपाळ यांची महापालिका आयुक्त यांनी बदली केली आहे. सकपाळ यांच्याकडे कर आकारणी आणि कर संकलन विभागाचा पदभार होता. मात्र तो पदभार आता उपायुक्त रवी पवार यांच्याकडे देण्यात आला आहे. मात्र सकपाळ यांच्या कामा बाबत कुठलीही तक्रार नसताना अवघ्या ५ महिन्यात त्यांची बदली का करण्यात आली, असा सवाल करण्यात आला आहे. सकपाळ यांची बदली रद्द करण्याची मागणी राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, कमर्चारी वर्गाकडून करण्यात आली आहे. यावर महापालिका आयुक्त काय निर्णय घेणार, याकडे लक्ष लागून राहिले आहे. (Pune PMC News)
कर्मचारी वर्गाकडून मागणी
उपायुक्त सकपाळ यांची बदली झाल्या नंतर कर संकलन खात्यातील सर्व कर्मचारी एकजूट झालेले पाहायला मिळाले. या सर्व कर्मचाऱ्यांनी उपायुक्त सकपाळ यांची भेट घेत बदली रद्द करण्याबाबत आपले समर्थन दर्शवले. सर्व कर्मचाऱ्यांनी मागणी केली कि असा अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली आम्ही नेटाने काम करू शकतो. त्यामुळे असे अधिकारी खात्याला हवे आहेत.
तसेच काही सामाजिक संघटनांनी देखील महापालिका आयुक्त यांची भेट घेत आणि त्यांना पत्र देत बदली रद्द करण्याची मागणी केली.
| ३१ मार्च पर्यंत कायम ठेवण्याची माजी नगरसेवकांची मागणी
माजी नगरसेवक उज्वल केसकर, प्रशांत बधे आणि सुहास कुलकर्णी यांनी देखील महापालिका आयुक्त यांना निवेदन दिले. त्यात त्यांनी म्हटले आहे कि, अविनाश सकपाळ कर आकारणी व कर संकलन प्रमुख यांची खात्याच्या अंतर्गत आपल्या अधिकारामध्ये बदली केली, तो आपला अधिकार आहे त्याबाबत आमचे काही म्हणणे नाही. मुळात सरकारकडून डेपुटेशनवर जे अधिकारी येतात ते मुंबई प्रांतिक अधिनियम कलम 45 B या अंतर्गत येणे अपेक्षित आहे. तशी नेमणूक आणि पाठवणूक होत नाही ही वस्तुस्थिती आहे.
गतवर्षीच्या मालमत्ता मूल्यमापन वर्षभरात 39 हजार इतके झाले तर गेल्या पाच महिन्यांमध्ये 43 हजार 566 इतक्या नवीन मिळकती या आपल्या कराच्या रचनेमध्ये आल्या.
अभय योजना असू नये ही आमची भूमिका परंतु आपण विकासासाठी पैसे कमी पडतात म्हणून जाहीर केली. आम्ही जी सूचना केली होती की ज्यांनी एकदा अभय योजनेमध्ये लाभ घेतला आहे त्यांना पुन्हा सवलत देऊ नये. हे देखील आपण मान्य केले. यापूर्वीच्या सर्व अभय योजनांना आम्ही विरोध केला होता. महानगरपालिकेचे भय हवे अभय नको ही आमची भूमिका होती आणि आहे. अविनाश सकपाळ यांनी पाच महिन्यापूर्वीच आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला होता. त्यांचे काम देखील चालू होते. अभय योजनेचा प्रस्ताव त्यांनी मांडला होता. नवीन नियुक्त रवी पवार यांना खाते समजून घेण्यासाठी पुढची दोन-तीन महिने नक्की जातील. त्यामुळे 31 मार्च 2026 पर्यंत विद्यमान उपायुक्त यांना त्यांच्या जागेवर कायम ठेवून त्यांच्याकडून योजना राबवून नवीन आर्थिक वर्षात म्हणजे एक एप्रिल 2026 नंतर नवीन रचना करावी. असे माजी नगरसेवकांनी म्हटले आहे.
आता महापालिका आयुक्त काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

COMMENTS