PMC NUHM Employees | राष्ट्रीय स्वास्थ अभियानाच्या कर्मचाऱ्यांसाठी पुणे मनपात एच.आर. पॉलिसीची अंमलबजावणी!
PMC Health Department – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेत राष्ट्रीय स्वास्थ अभियान (NUHM) अंतर्गत कार्यरत सुमारे साडेपाचशे कर्मचाऱ्यांना अखेर एच.आर. पॉलिसीचे लाभ मिळणार आहेत.या निर्णयामुळे डॉक्टर्स, नर्सेस, डेटा एन्ट्री ऑपरेटर्स यांसह विविध पदांवरील कर्मचाऱ्यांना आता 30 दिवसांची रजा, पालकत्व रजा, मातृत्व रजा, दुर्धर आजार झाल्यास 3 महिन्यांची विशेष रजा तसेच इतर अनेक सुविधा उपलब्ध होणार आहेत. (Pune Municipal Corporation – PMC)
महाराष्ट्र शासनाने ही पॉलिसी राज्यभर लागू केली होती, मात्र पुणे महानगरपालिकेतील राष्ट्रीय स्वास्थ अभियानातील कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळत नव्हता. या अन्यायकारक परिस्थितीविरोधात राष्ट्रीय मजदूर संघ (RMS) अध्यक्ष तथा कामगार नेते सुनील शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सातत्याने आवाज उठवण्यात आला.
याच संदर्भात ऑगस्ट महिन्यात पुणे महानगरपालिकेचे आयुक्त मा. नवल किशोर राम यांच्या दालनात संघटनेची बैठक झाली होती. त्या वेळी आयुक्तांनी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाला सकारात्मक प्रतिसाद देत तातडीने एच.आर. पॉलिसी लागू करण्याचे आश्वासन दिले होते.
आज त्यानुसार पुणे महानगरपालिकेच्या डॉ. नीना बोराडे (मुख्य आरोग्य अधिकारी), डॉ. मनीषा नाईक (सहाय्यक आरोग्य अधिकारी), डॉ. गणेश जगदाळे यांनी एच.आर. पॉलिसीचे अधिकृत परिपत्रक राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष कामगार नेते सुनील शिंदे यांना सुपूर्द केले. या प्रसंगी संघटनेचे उपाध्यक्ष सिताराम चव्हाण, सरचिटणीस एस. के. पळसे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
या निर्णयामुळे पुणे मनपाच्या राष्ट्रीय स्वास्थ अभियानातील सुमारे साडेपाचशे कर्मचारी — डॉक्टर्स, नर्सेस, डेटा एन्ट्री ऑपरेटर्स आणि इतर कर्मचारीवर्ग — यांना मोठा दिलासा मिळणार असून, ही संघटित ताकदीचा विजय असल्याची भावना व्यक्त होत आहे.

COMMENTS