Pune PMC News | महिला दिना निमित्त पुणे महानगरपालिका सांस्कृतिक विभागाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन
| ॲड. निशा चव्हाण लिखित ‘भिडे वाडा द लीगल बैटल’ पुस्तकाच्या मुखपृष्ठाचे प्रकाशन
PMC Cultural Department – (The Karbhari News Service) – ‘पुणे महानगरपालिका’ यंदाच्या वर्षी अमृत महोत्सव साजरा करीत आहे. त्या अनुषंगाने विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये ‘जागतिक महिला दिनानिमित्त’, पुणे महानगरपालिका, ‘जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, पुणे’ व ‘निवेदिता प्रतिष्ठान पुणे’ यांच्या संयुक्त विद्यमाने दोन वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती सांस्कृतिक विभागाच्या वतीने देण्यात आली. (Pune Municipal Corporation – PMC)
८ मार्च रोजी दुपारी १२ वा, काही अजरामर मराठी भावगीतांच्या माध्यमातून, ‘स्त्रियांवर होणारे अत्याचार व त्याबाबतचे कायदे, अशाप्रकारे भारतीय ‘स्त्री’ चे भाव विश्व उलगडून दाखवणारा’ ‘स्वप्नात रंगले मी’ हा कार्यक्रम सादर होणार आहे. या कार्यक्रमास बाल न्याय मंडळ मुख्य न्याय दंडाधिकारी, गरिमा नारायण बागरोडिया, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्याचप्रमाणे आयुक्त पुणे महानगरपालिका यांच्या पत्नी, दिपाली राजेंद्र भोसले यांची विशेष पाहुणे म्हणून उपस्थिती लाभणार आहे. त्याचप्रमाणे प्रिन्सिपल डिस्ट्रिक्ट जज्ज महेंद्र महाजन, अध्यक्ष DLSA सोनाली पाटील यांचेही कार्यक्रमास मार्गदर्शन लाभले आहे.
कार्यक्रमा अंतर्गत मुख्य विधी अधिकारी पुणे मनपा, ॲडव्होकेट निशा चव्हाण, महिलांबाबत विविध कायद्यांची ओळख करून देणार आहेत.
कार्यक्रमाची संकल्पना व सूत्रसंचालन ॲडव्होकेट अनुराधा भारती (संचालिका निवेदिता प्रतिष्ठान) करणार आहेत.
त्याच दरम्यान मान्यवरांच्या हस्ते ‘क्रांती सूर्य जोतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेली भारतातील पहिली मुलांची शाळा भिडे वाडा येथे राष्ट्रीय स्मारक उभारण्या साठी मे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने मार्ग मोकळा झाला आहे.’ त्याबाबतचे अनुभव सांगणार्या, पुणे महानगरपालिकेच्या मुख्य कायदे सल्लागार ॲड. निशा चव्हाण लिखित ‘भिडे वाडा द लीगल बैटल’ पुस्तकाच्या मुखपृष्ठाचे प्रकाशन होणार आहे.
कार्यक्रम हे सर्वांसाठी विनामूल्य असून कार्यक्रमा सर्व पुणेकरांनी उपस्थिती लावावी. असे आवाहन करण्यात आले आहे.
त्याचबरोबर ११ मार्च रोजी सकाळी ११ वा. ‘निवेदिता प्रतिष्ठान’च्या ‘आकृती’ ग्रुप तर्फे महिला चित्रकारांच्या चित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे.
‘महिलांवरील होणारे अत्याचार’ व ‘महिला सबलीकरण’ अशा विषयावर संपूर्ण भारतातील वेगवेगळ्या ठिकाणाहून येणाऱ्या ‘महिला चित्रकारांची’ चित्रे मांडण्यात येणार आहेत. सदरील चित्रकला प्रदर्शन ११, १२,१३ मार्च दरम्यान बालगंधर्व कलादालन येथे सकाळी १० ते सायंकाळी आठ वाजेपर्यंत सर्वांना बघण्यासाठी मोफत ठेवण्यात येणार आहे.
विधी सेवा प्राधिकरणाच्या न्यायाधीश सोनल पाटील , महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले आणि व अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी पी यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील सोहळा संपन्न होत आहे .
तरी समस्त पुणेकरांनी ‘पुणे महानगरपालिकेच्या’ अमृत महोत्सवाच्या निमित्ताने खास ‘जागतिक महिला दिन’ साजरा करण्यासाठी आयोजित केलेल्या या कार्यक्रमांस जास्तीत जास्त संख्येने उपस्थिती लावावी. असे आवाहन पुणे महानगरपालिका सांस्कृतिक विभागच्या वतीने करण्यात आले आहे.
COMMENTS