G 23 चे नेते गुलाम नबी आझाद यांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) हे आज दिवसभर काँग्रेस (Congress) नेत्यांच्या भेटीगाठी घेताना दिसून आले. आज त्यांनी 10, जनपथ येथील पक्षाध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्या घरी जाऊन त्यांची देखील भेट घेतली. G-23 गटाने पाच राज्यांतील पराभवानंतर घेतलेली भुमिका आणि त्यानंतर निर्माण झालेल्या गृहकलहादरम्यान, ही भेट महत्वाची मानली जातेय. आझाद यांच्या या भेटीगाठी नेमक्या कोणत्या हेतूनं सुरु आहेत, याबद्दल कोणतीही माहिती मिळालेली नसल्याने चर्चांना उधाण आलं होतं. मात्र आता त्यानंतर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
सोनिया गांधी आणि गुलाम नबी आझाद यांच्यात काही दिवसांपूर्वीच फोनवर चर्चा झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. G-23 नेत्यांच्या गटाने पाच राज्यांमध्ये झालेल्या काँग्रेसच्या पराभवानंतर पक्षात संघटनात्मक बदल करण्याची भावना व्यक्त करत अनेक बैठका घेतल्या. तसंच काँग्रेस वर्कींग कमिटीची बैठक देखील काही दिवसांपूर्वी झाली होती. ही बैठक म्हणजे, आझाद यांच्या माध्यमातून, G-23 नेत्यांपर्यंत पोहोचण्याचा गांधी परिवाराचा प्रयत्न असल्याचं देखील बोललं जातंय. इंडिया टुडेनं याबद्दलचं वृत्त दिलं आहे. या बैठकीनंतर गुलाम नबी आझाद यांनी अध्यक्षपदाबाबत बैठकीत झालेल्या चर्चेबद्दल माहिती दिली.
दरम्यान, या बैठकीनंतर गुलाम नबी आझाद म्हणाले की, नेतृत्व बदलाबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. त्याबद्दलची चर्चा रविवारी झालेल्या काँग्रेस वर्कींग कमिटीच्या बैठकीत झाली होती. “नेतृत्वाबद्दल बोलायचे झाल्यास, श्रीमती सोनिया गांधी यांनीच हा पदभार सांभाळावा असं वर्कींग कमिटीच्या बैठकीत आधीच ठरलेलं होतं. नेतृत्व हा मुद्दा नाही, श्रीमती गांधींनी अध्यक्षपद सोडावं असं कोणीही म्हटलेलं नाही. आमच्याकडे फक्त काही सूचना होत्या, त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या” असं आझाद म्हणाले.G-23 चे नेते म्हणून आपण सोनिया गांधींना कोणते बदल सुचवले? असा प्रश्न विचारला असता, आझाद म्हणाले, “काँग्रेस हा एक पक्ष आहे आणि सोनिया गांधी या पक्षाच्या अध्यक्ष आहेत, बाकीचे आम्ही सर्वजण नेते आहोत. अंतर्गतरित्या केलेल्या शिफारसी सार्वजनिकरित्या सांगता येणार नाही.”
COMMENTS