बोनस मिळाला; आता वाढीव वेतन कधी?
महापालिका कर्मचाऱ्यांचा प्रशासनाला सवाल
पुणे : महापालिका कर्मचाऱ्याना दिवाळीच्या अगोदर दरवर्षी बोनस दिला जातो. त्यानुसार महापालिका मुख्य सभेने प्रस्ताव पारित केला आहे. महापालिका प्रशासनाने त्यावर अंमल करत गुरुवारी कर्मचाऱ्याच्या खात्यात बोनस जमा केला आहे. मात्र सातव्या वेतन आयोगावर अजूनही प्रशासनाकडून अंमलबजावणी झाली नसल्याचे दिसून येत आहे. याला प्रशासनाची उदासीनता कारणीभूत आहे. कारण वेतन आयोग लागू होऊन दीड महिना झाला तरीही प्रशासनाकडून याबाबतचे कुठलेही परिपत्रक जारी केलेले नाही. त्यामुळे पुणे महापालिका कामगार युनियन ने महापालिका आयुक्तांना मागणी केली आहे कि तत्काळ परिपत्रक जारी करून लवकरात लवकर कर्मचाऱ्याना वेतन आयोगानुसार तत्काळ वाढीव वेतन दिले जावे. महापालिकेच्या सर्व संघटनाकडून ही मागणी करण्यात आली आहे.
: दीड महिना होऊनही परिपत्रक नाही
कामगार युनियन च्या पत्रानुसार महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना ७ व्या वेतन आयोगानुसार सुधारीत वेतनश्रेणी लागू करण्याबाबत राज्य शासनाने दिलेल्या मान्यतेनुसार अंमलबजावणीची कार्यवाही सुरु झाल्याचे समजते. संघटनेने दिलेल्या संदर्भाकित पत्रान्वये सुधारित वेतनश्रेणीनुसार माहे ऑक्टोबर २०२१ चे प्रत्यक्ष बेतन अदा करणेत येईल असे आपण, महापौर, सभागृह नेते व अध्यक्ष, स्थायी समिती यांचेसमवेत झालेल्या चर्चेमध्ये सांगितले आहे. परंतु याबाबत अद्याप प्रशासनाकडून कार्यालय परिपत्रक प्रसृत करण्यात आलेले नाही. तसेच शासन निर्णयानुसार दिनांक १ जानेवारी २०२१ ते ३० सप्टेंबर २०२१ या कालावधीतील फरकाची रक्कम अदा करण्याबाबत देखील कुठलीही कार्यवाही सुरु नसल्याचे समजते. तरी, पुणे महानगरपालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांना माहे ऑक्टोबर पेड इन नोव्हेंबर २०२१ चे वेतन ७ व्या वेतन आयोगानुसार सुधारीत वेतनश्रेणीने अदा करणेबाबत व दिनांक १ जानेवारी २०२१ ते ३० सप्टेंबर २०२१ या कालावधीतील फरकाची रक्कम अदा करणेची कार्यवाही त्वरित सुरु करणेबाबत कार्यालय परिपत्रक लवकरात लवकर प्रसृत करणेबाबत संबधित विभागास आदेश व्हावेत. अशी मागणी युनियन कडून करण्यात आली आहे. आधी देखील आयुक्तांना पत्र देण्यात आले होते. मात्र अजून कार्यवाही झाली नाही. असे पीएमसी एम्प्लोइज युनियन चे अध्यक्ष प्रदीप महाडिक आणि कार्याध्यक्ष आशिष चव्हाण यांनी सांगितले.
COMMENTS