Lokmanya Tilak National Award | सुधा मूर्ती यांना यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार!

HomeBreaking Newsपुणे

Lokmanya Tilak National Award | सुधा मूर्ती यांना यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार!

गणेश मुळे Jul 27, 2024 12:45 PM

Lokmanya Tilak National Award | डॉ. टेसी थॉमस यांना यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार
Lokmanya Tilak National Award 2023 | यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना जाहीर  | शरद पवार यांच्या उपस्थितीत दिला जाणार पुरस्कार
The prestigious Lokmanya Tilak National Award has been announced to Ms. Sudha Murty

Lokmanya Tilak National Award | सुधा मूर्ती यांना यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार!

Lokmanya Tilak National Award 2024 – (The Karbhari News Service) – ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, सिद्धहस्त लेखिका व राज्यसभेच्या सदस्या सुधा मूर्ती (Sudha Murthy) यांना लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या (Lokmanya Tilak Smarak Trust)  (टिळक स्वराज्य संघ) वतीने लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने (Lokmanya Tilak National Award) गौरविले जाणार आहे. मूर्ती यांनी ग्रामीण भागातील विकास तसेच साहित्य व सामाजिक क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे. लोकमान्यांच्या चतु:सूत्रीतील स्वदेशीच्या अनुषंगाने त्यांनी मानवी व सामाजिक विकासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. ग्रामीण विकास, साहित्य व सामाजिक क्षेत्रातील त्यांचे कार्य अधोरेखित करण्यासाठी टिळक स्मारक ट्रस्टच्या विश्‍वस्तांनी सुधा मूर्ती यांची यंदाच्या लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारासाठी एकमताने निवड केली आहे. (Sudha Murthy Nominated Rajyasabha MP)

लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टचे विश्‍वस्त डॉ. रोहित टिळक यांनी आज पत्रकार परिषदेत या पुरस्काराची घोषणा केली. गुरूवार दि. 1 ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक यांची 104 वी पुण्यतिथी आहे. यानिमित्त नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात सायंकाळी 6 वाजता होणार्‍या सोहळ्यात सुधा मूर्ती यांना पुरस्काराने गौरविले जाणार आहे. टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा होईल. ज्येष्ठ नेते व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार) अध्यक्ष शरद पवार, खासदार डॉ. शाहू छत्रपती महाराज, केरळचे माजी गृहमंत्री रमेश चेन्निथला या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे आहेत. डॉ. गीताली टिळक, डॉ. प्रणति रोहित टिळक यांच्यासह ट्रस्टचे अन्य विश्‍वस्त यावेळी उपस्थित असतील. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराचे यंदाचे 42 वे वर्ष आहे. स्मृतिचिन्ह आणि एक लाख रूपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

याच सोहळ्यात टिळक स्मारक ट्रस्टच्या विश्‍वस्त डॉ. प्रणति रोहित टिळक यांनी लिहिलेल्या ‘लिजेंडरी लोकमान्य’ या कॉफीटेबल बुकचे प्रकाशन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते होईल. लोकमान्यांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटना आणि दुर्मिळ छायाचित्रे याचा समावेश या कॉफीटेबल बुकमध्ये आहे.
देशहितासाठी नि:स्वार्थ बुद्धीने कार्यरत असलेल्या व्यक्तींना 1983 पासून या पुरस्काराने गौरविण्यात येते. आतापर्यंत एस.एम. जोशी, इंदिरा गांधी, अटल बिहारी वाजपेयी, डॉ. मनमोहन सिंग, प्रणव मुखर्जी, शंकरदयाळ शर्मा, बाळासाहेब देवरस, खान अब्दुल गफारखान, शरदचंद्र पवार, एन. आर. नारायणमूर्ती, जी. माधवन नायर, डॉ. कोटा हरिनारायण, राहुल बजाज, बाबा कल्याणी, ई. श्रीधरन, प्रा. एम.एस. स्वामीनाथन, डॉ. वर्गीस कुरियन यांच्यासह विविध क्षेत्रांतील दिग्गजांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. मागील वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले.
स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण आणि बहिष्कार ही लोकमान्यांची चतु:सूत्री आजही तितकीच महत्त्वाची आहे, असे नमूद करून डॉ. रोहित टिळक म्हणाले, इन्फोसिस फाऊंडेशन या सामाजिक कार्य करणार्‍या संस्थेच्या निर्मितीमध्ये सुधा मूर्ती यांचा सक्रिय सहभाग आहे. या संस्थेच्या त्या सह-संस्थापिका आहेत. इन्फोसिस फाऊंडेशनच्या माध्यमातून मूर्ती यांनी समाजाच्या विविध क्षेत्रांत विकासकामांना प्रोत्साहन दिले. ग्रामीण भागाच्या विकासासाठी त्यांनी केलेले कार्य देशाच्या विकासाला चालना देणारे ठरले आहे. साहित्य क्षेत्रातील त्यांचे योगदान देखील समाजात जागृती करणारे ठरले. सुधा मूर्ती या मराठी, कन्नड आणि इंग्रजी भाषेमधून लिखाण करतात. कर्नाटक सरकारच्या सर्व शाळांत त्यांनी संगणक आणि ग्रंथालये उपलब्ध करून दिली आहेत. त्यांनी हार्वर्ड विद्यापीठात ‘मूर्ती क्लासिकल लायब्ररी ऑफ इंडिया’ या नावाचे ग्रंथालय सुरू केले आहे. कर्नाटकातील ग्रामीण भागांत आणि बंगळुरू शहर व परिसरात त्यांनी सुमारे 10,000 स्वच्छतागृहे संस्थेच्या माध्यमातून उभारली. तामिळनाडू आणि अंदमान येथे त्सुनामीच्या काळात त्यांनी विशेष सेवाकार्य केले. महाराष्ट्रातील दुष्काळी भागातील रहिवाशांनाही संस्थेने मदत दिलेली असल्याचे डॉ. टिळक यांनी नमूद केले.
सुधा कुलकर्णी-मूर्ती यांचा जन्म कर्नाटकातील शिगगाव येथे 19 ऑगस्ट 1950 रोजी झाला. विमल कुलकर्णी आणि डॉ. आर. एच. कुलकर्णी हे त्यांचे आई-वडील. सुधा मूर्ती या संगणक क्षेत्रातील व्यावसायिक आणि इन्फोसिस या प्रसिद्ध संस्थेचे सहसंस्थापक एन. आर. नारायणमूर्ती यांच्या पत्नी होत. सुधा मूर्ती यांनी बी.ई. परीक्षेत सर्वोच्च गुण मिळवून सुवर्णपदक पटकावले. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स येथून त्यांनी संगणक शास्त्रात पदव्युत्तर पदवी मिळवली.

सुधा मूर्तींनी अभियंता म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली. टेल्को कंपनीत निवड झालेल्या त्या पहिल्या महिला अभियंत्या होत्या. टाटा कंपन्यांसाठी त्यांनी पुणे, मुंबई आणि जमशेदपूर येथे काम केले आहे. शिवाय, पुण्याच्या ख्राईस्ट कॉलेजात त्या प्राध्यापक होत्या. बंगळुरु विद्यापीठात त्या अभ्यागत प्राध्यापिका आहेत.

सुधा मूर्ती यांनी नऊहून अधिक कादंबर्‍या लिहिल्या आहेत. त्यांच्या नावावर अनेक कथासंग्रहही आहेत. द ओल्ड मॅन अँड हिज गॉड, कल्पवृक्षाची कन्या, गोष्टी माणसांच्या, जेन्टली फॉल्स द बकुला, 10 डॉलर बहू, तीन हजार टाके, थैलीभर गोष्टी, परीघ, पितृऋण, पुण्यभूमी भारत, बकुळ, द मॅजिक ड्रम अँड द अदर फेव्हरिट स्टोरीज, महाश्वेता, वाइज अँड अदरवाइज, सामान्यांतले असामान्य, सुकेशिनी, हाऊ आय टॉट माय ग्रँडमदर टु रीड अँड अदर स्टोरीज आदी त्यांची पुस्तके गाजली. उत्तम शिक्षक पुरस्कार, ओजस्विनी पुरस्कार, केंद्र सरकारकडून पद्मश्री आणि पद्भूषण किताब, साहित्य क्षेत्रातील योगदानासाठी आर. के. नारायण पुरस्कार, राजलक्ष्मी पुरस्कार, साहित्य व सामाजिक कार्यासाठी कर्नाटक राज्याचा राज्योत्सव पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे. आयआयटी कानपूरने डॉक्टर ऑफ सायन्स या पदवीने त्यांना गौरविले आहे. गुलबर्गा विद्यापीठातर्फेही त्यांना सन्माननीय डॉक्टरेट प्रदान करण्यात आली.