मनपा शिक्षण विभागातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आंदोलन
पुणे महानगरपालिकेतील शिक्षण विभागाच्या चतुर्थ श्रेणी कामगार, बालवाडी शिक्षिका सेविका, रोजंदारी कर्मचारी यांच्या अनेक समस्या पालिकेच्या निदर्शनास आणून देखील सोडवल्या जात नाहीत. पगारातील वेतन वाढ असेल, दिवाळीचा बोनस जाहीर होऊन अजून देखील अनेक बालवाडी शिक्षिका- सेविकांना तो मिळालेला नाही. वारंवार पुणे महानगर पालिका कामगार युनियन (मान्यताप्राप्त) च्या वतीने अधिकाऱ्यांसमोर प्रश्न मांडून देखील त्यांची सोडवणूक होत नसल्याने आज पुणे महानगर पालिकेच्या बाहेर आंदोलन करण्यात आले.
शिक्षेतर कर्मचाऱ्यांना ७ व्या वेतन आयोगाचा हप्ता तात्काळ मिळावा, कर्मचाऱ्यांचे वेतन १५ तारखेनंतर करण्यात येते, तरी तो ५ तारखे पर्यंत करण्यात यावा. बालवाडी शिक्षिका व सेविकांना वेतनपावती देण्यात यावी, कोणत्याही खाजगी संस्थांचा बालवाडीमधील हस्तक्षेप थांबवा, तसेच बालवाडी शिक्षिका व सेविका यांना पुणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे वैद्यकीय अंशदायी सहायय योजनेचे लाभ मिळावेत, शिपाई व रखवालदार यांना पदोन्नती देण्यात यावी या मागण्यांकरिता आज आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनामध्ये युनियन अध्यक्ष कॉ. उदय भट, जॉईंट सेक्रेटरी रोहिणी जाधव, जॉईंट सेक्रेटरी मधुकर नरसिंगे, झोन अध्यक्ष अजित मेंगे, सचिव ओंकार काळे, प्रकाश हुरकुडली, उपाध्यक्ष शोभा बनसोडे, भरत ठोंबरे, प्रकाश चव्हाण, दिलीप कांबळे, सिदार्थ प्रभुणे व बालवाडी शिक्षिका- सेविका व चतुर्थ श्रेणी कर्मचारी व कार्यकर्ते उपस्थित होते.