महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा हेमंत रासने यांना पाठिंबा
हिंदुत्व आणि विकास हे दोन्ही मुद्दे प्रभावशाली पद्धतीने पुढे नेणारा एकच घटक सध्या आहे, तो म्हणजे भारतीय जनता पक्ष. म्हणूनच पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाला पूर्ण सक्रिय पाठिंबा देण्याचा निर्णय मी घेत आहे, अशा शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी आज आपली भूमिका व्यक्त केली.
पुण्यातील मनसे नेत्यांनी आज राज ठाकरे यांची मुंबईत भेट घेतली. त्यावेळी राज यांनी ही स्पष्टोक्ती केल्याचे समजते. त्यावेळी पुण्यातील कसबा विधानसभा पोट निवडणुकीसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी बाबू वागस्कर, अजय मोरे, किशोर शिंदे आदी मनसेचे पुण्यातील स्थानिक नेते उपस्थित होते.
कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ताताई टिळक यांचे निधन झाल्यामुळे या मतदारसंघात निवडणूक होत आहे. त्यामध्ये भारतीय जनता पक्ष, बाळासाहेबांची शिवसेना आणि मित्र पक्षाच्या युतीतर्फे हेमंत रासने हे उमेदवार म्हणून रिंगणात आहेत. या संदर्भात मनसेची भूमिका अद्याप स्पष्ट करण्यात आली नव्हती. या पार्श्वभूमीवर पुण्यातील स्थानिक नेत्यांनी राज यांची आज भेट घेतली. हिंदुत्व आणि विकास याच्या बाजूनेच आपला कल असल्याचे राज यांनी यावेळी स्पष्ट केले. त्यामुळे कसबा विधानसभा निवडणुकीत भाजप युतीचे उमेदवार हेमंत रासने यांना आता मोठे बळ मिळाले आहे.
निवडणूक प्रमुख आमदार माधुरी मिसाळ आणि भाजपचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांनी आज मनसेचे प्रवक्ते आणि नेते अनिल शिदोरे प्रदेश, नेते बाबू वागस्कर, उपाध्यक्ष बाळा शेंडगे, प्रदेश सरचिटणीस किशोर शिंदे, शहर अध्यक्ष साईनाथ बाबर आणि कसबा विभागाचे अध्यक्ष गणेश भोकरे यांची भेट घेतली.
यावेळी वागस्कर यांनी पाठिंबा दिल्याचे जाहीर केले.