Ring Road | पुणे चक्राकार रस्त्यांसाठी (Ring Road) भूसंपादन प्रक्रियेला वेग

HomeपुणेBreaking News

Ring Road | पुणे चक्राकार रस्त्यांसाठी (Ring Road) भूसंपादन प्रक्रियेला वेग

Ganesh Kumar Mule Jan 20, 2023 2:11 PM

NCP Vs Governor | राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या वतीने राज्यपाल कोश्यारींच्या विरोधात आंदोलन 
DCM Eknath Shinde | नवीन गृहनिर्माण धोरणामध्ये विकसकांच्या सूचनांचा अंतर्भाव करू- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे | राज्यात 35 लाख घरे बांधण्याचे नियोजन
DCM Eknath Shinde | विविध विकासकामांच्या भूमिपूजनासाठी उपमुख्यमंत्री पुण्यात येणार – शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे | उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस अनोख्या सामाजिक उपक्रमांनी साजरा होणार

पुणे चक्राकार रस्त्यांसाठी (Ring Road) भूसंपादन प्रक्रियेला वेग

| पुणे पश्चिम चक्राकार रस्त्यासाठी भूसंपादन होणाऱ्या ३२ गावातील ६१८ हेक्टर जमिनीचे अंतिम दर निश्चित

पुणे | पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील वाहतुकीचा ताण कमी करण्याच्यादृष्टीने प्रस्तावित चक्राकार रस्त्यांच्या (रिंग रोड) भूसंपादन प्रक्रियेला जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या पुढाकारामुळे वेग आला आहे. पुणे (पश्चिम) रिंगरोडसाठी आवश्यक ४ तालुक्यात ३२ गावातील ६१८.८० हेक्टर आर जमिनीचे अंतिम दर निश्चित करण्यात आले असून २ हजार ३४८ कोटी रुपयांपर्यंत मोबदला जमीनधारकांना मिळणार आहे. (Pune Ring Road)

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून पुणे (पश्चिम) चक्राकार मार्ग आणि पुणे (पूर्व) चक्राकार मार्ग असे दोन मार्ग होणार आहेत.

पश्चिम रिंगरोडसाठी मावळ तालुक्यातील परंदवाडी, धामणे, उर्से, पाचाणे, बेबडओहोळ, चांदखेड या ६ गावातील, मुळशी तालुक्यातील कासारआंबोली, अंबडवेट, कातवडी, घोटवडे, मोतेरेवाडी, जवळ, रिहे, पिंपळोली, केमेसेवाडी, उरावडे, पडळघरवाडी, आंबेगाव, मारणेवाडी, मुठे या १४ गावातील, हवेली तालुक्यातील बहुली, भगतवाडी, मोरदरवाडी, मांडवी बु., सांगरूण, खामगाव मावळ, कल्याण, वरदाडे, रहाटवडे, थोपटेवाडी या १० तर भोर तालुक्यातील रांजे व कुसगाव या २ अशा ३२ गावातील खासगी जमीनीचे संपादन करण्यात येणार आहे.

विशेष बाब म्हणजे कोविड कालावधी असतानाही या सर्व ३२ गावात सबंधित उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, तालुका उप अधीक्षक भूमी अभिलेख, मोजणी निरीक्षक यांनी संबंधित तलाठी तसेच ग्रामस्थांच्या उपस्थितीत प्रकल्पासाठी आवश्यक जमिनीची संयुक्त मोजणी केली. त्यानुसार नगररचना विभागाने प्राथमिक मूल्यांकन केले.

सदर जमिनीवर प्रत्यक्षात असलेले निवासी, व्यवसायीक बांधकामे, झाडे यांची माहिती घेऊन याबाबतची माहिती जिल्हाधिकारी अध्यक्ष असलेल्या जिल्हास्तरीय मूल्यांकन निश्चिती समितीसमोर ठेवण्यात आली. त्यानुसार समितीने सर्व तरतुदी लक्षात घेत अंतिम दर निश्चित केले आहेत.

अंतिम दर जाहीर केल्यानुसार ६१८.८० हे. आर जमिनीची संमती निवाड्याची एकूण रक्कम २ हजार ३४८ कोटी ९२ लाख रुपये इतकी होते.

आता पुढील टप्प्यात उपविभागीय अधिकाऱ्यांना या गावांमध्ये शिबिरे आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. त्यावेळी शेतकऱ्यांकडून संमतीपत्रे घेण्यात येणार असून करारनामे करण्यात येणार आहेत. त्यानुसार निवाडे जाहीर करून जमीन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला हस्तांतरित करण्यात येईल.

———————-
डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी: कायद्यातील सर्व तरतुदी लक्षात घेऊन बाधित शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळेल याची खात्री करुन अंतिम दर निश्चित करण्यात आलेले आहेत. प्रकल्पासाठी जमीन देण्यास संमतीपत्रे देणाऱ्या खातेदारांना २५ टक्के अधिक रक्कम मिळणार असल्याने खातेदारांनी संमतीपत्रे देऊन प्रकल्पाला गती देण्यासाठी सहकार्य करावे.

डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी