MLA Laxman Jagtap | आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन | झुंजार लोकप्रतिनिधी, जवळचा सहकारी गमावला | विरोधी पक्षनेते अजित पवार

HomeBreaking Newsपुणे

MLA Laxman Jagtap | आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन | झुंजार लोकप्रतिनिधी, जवळचा सहकारी गमावला | विरोधी पक्षनेते अजित पवार

Ganesh Kumar Mule Jan 03, 2023 8:15 AM

Ajit Pawar Vs Chandrakant Patil | पुण्यात पाटील विरुद्ध पवार चुरस पाहायला मिळणार 
Pune : NCP : सत्तेचा गैरवापर करणाऱ्या भाजपचा शहर राष्ट्रवादीतर्फे निषेध
Chhatrapati Sambhaji Maharaj Balidan Sthal Vikas | छत्रपती संभाजी महाराजांच्या लौकिकाला साजेशी स्मारकस्थळे उभारणार | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन | झुंजार लोकप्रतिनिधी, जवळचा सहकारी गमावला | विरोधी पक्षनेते अजित पवार

पिंपरी चिंचवडमधील आमदार व भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लक्ष्मण पाडुरंग जगताप (वय-५९) (MLA Laxman Jagtap) यांचे आज सकाळी दीर्घ आजाराने बाणेर येथील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी अश्विनी, कन्या एश्वर्या, बंधू माजी नगरसेवक शंकर आणि विजूअण्णा जगताप असा मोठा परिवार आहे. जगताप यांचे अंत्यदर्शन दुपारी 2 ते सायं 6 या वेळी त्यांच्या राहत्या घरी चंद्ररंग… पिंपळे गुरव येथ असेल. तर अंत्यसंस्कार सायं 7 पिंपळे गुरव स्मशानभूमी येथे होणार आहेत.

चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने जनतेच्या प्रश्नासाठी तळमळीने काम करणारा झुंजार लोकप्रतिनिधी, जवळचा सहकारी गमावला असल्याची भावना व्यक्त करत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी (Ajit pawar) त्यांना श्रध्दांजली वाहिली आहे.

शहराच्या राजकारणात गेली ३५ वर्षे चार वेळी नगरसेवक, चार वेळा आमदार राहिलेले आमदार जगताप यांच्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वर्चस्व असलेल्या पिंपरी चिंचवड महापालिकेत २०१७ मध्ये भाजपची एकहाती सत्ता आली होती.

आमदार जगताप हे गेली दोन वर्षांपासून आजारी होते. गेल्या सहा महिन्यांपासून त्यांची तब्बेत खालवत गेली. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात कुटुंबियांनी उपचारासाठी त्यांना अमेरिकेत नेले होते. एप्रिल २०२२ मध्ये ते पुन्हा मायदेशी परतले. अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना बाणेर येथील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आले. नंतरच्या काळात त्यांची तब्येत अधिक चिंताजनक झाली. प्रबळ इच्छाशक्तीमुळे अखेर पर्यंत त्यांनी मृत्युशी दोन हात केले. डॉक्टरांनी अगदी शर्थीचे प्रयत्न केले, पण अखेर सर्व उपाय संपले आणि त्यांची प्राणज्योत मालवली.

विरोधी पक्षनेते अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी तळमळीने काम केले. राजकीय, सामाजिक जीवनात त्यांनी केलेले काम कायम स्मरणात राहील. त्यांच्या निधनाने सर्वसामान्य जनतेचे प्रश्न विधीमंडळात मांडणारा धडाडीचा लोकप्रतिनिधी आपण गमावला आहे. पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासात त्यांचे मोलाचे योगदान होते. सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी तडफेने काम करणाऱ्या लोकप्रतिनिधीची, सहकाऱ्याची उणीव कायमच जाणवेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात त्यांनी केलेले काम पिंपरी-चिंचवड परिसरातील जनता कधीही विसरु शकणार नाही, अशा शद्बात अजित पवार यांनी आमदार लक्ष्मण जगताप यांना श्रध्दांजली वाहिली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आमदार लक्ष्मण जगताप यांना श्रद्धांजली | “तडफदार नेतृत्व काळाने हिरावले”

“नगरसेवक, महापौर ते विधिमंडळातील तडफदार प्रतिनिधी म्हणून आपल्या कामाचा ठसा उमटवणारे नेतृत्व काळाने हिरावून नेले आहे,” अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे, तसेच दिवंगत जगताप यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

आमदार जगताप यांनी स्वकर्तृत्वाने कारकीर्द घडवली. पिंपरी -चिंचवडचा विकास हा त्यांचा ध्यास होता. नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, महापौर म्हणून त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. विधिमंडळातही ते आपला मतदारसंघ आणि परिसरातील समस्या, अडचणी यासाठी हिरीरीने काम करत असत. लोकहिताच्या दृष्टीने अनेकदा त्यांनी संघर्षशील भूमिका घेतली. आजारपणाशीही त्यांचा प्रदीर्घ लढा सुरू होता. यातही त्यांनी आपले कर्तव्य बजावताना कुचराई केली नाही. पण नियतीला हे मान्य नसावे आणि आमदार जगताप यांना काळाने हिरावून नेले. हा त्यांच्या परिवारासह, कार्यकर्ते, चाहत्यांसाठी मोठा आघात आहे. जगताप कुटुंबियांना या आघातातून सावरण्यासाठी बळ मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. लोकप्रिय आमदार लक्ष्मण जगताप यांना भावपूर्ण श्रद्धांजली! असेही मुख्यमंत्र्यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.