बायोमेट्रिक हजेरीसाठी महापालिका कर्मचाऱ्यांना लावाव्या लागताहेत रांगा |मशीन अचानक बंद पडत असल्याने कर्मचारी त्रस्त
पुणे | महापालिका प्रशासनाकडून महापालिका कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरी अनिवार्य करण्यात आली आहे. बायोमेट्रिक हजेरी नसेल तर १५ तारखेपासून वेतन अदा न करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्तांनी जारी केले आहेत. यामुळे महापालिका कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. त्यामुळे कर्मचारी सकाळी कार्यालयात आल्यावर आणि सायंकाळी बाहेर पडताना बायोमेट्रिक मशीन वर थंब करूनच बाहेर पडत आहेत. मात्र सकाळी आणि सायंकाळी देखील थंब करताना मशीन अचानक बंद पडत आहेत. यात कर्मचाऱ्यांचा वेळ वाया जात आहे. तर सायंकाळी कार्यालयातून बाहेर पडताना देखील खूप उशीर होत आहे. यामुळे कर्मचारी त्रस्त झाले आहेत. शिस्त लावत असताना सुविधा देखील देण्याची मागणी कर्मचारी वर्गातून होत आहे.
Aadhar Enabled Bio-Metric Attendance System” ची प्रणाली पुणे महानगरपालिकेमध्ये सूरू करण्यात आलेली आहे. त्यानुसार सर्व संबंधित खातेप्रमुख यांनी आपल्या विभागातील सर्व अधिकारी/सेवकांचे बायोमेट्रिक्स होते याबाबतची खात्री करणे आवश्यक आहे. तथापि, अनेक विभागामध्ये अद्याप अधिकारी/सेवक बायोमेट्रिक्स हजेरी प्रणालीमध्ये हजेरी लावत नाही असे निदर्शनास आले आहे. ज्या कर्मचाऱ्यांची बायोमेट्रिक हजेरी नसेल, त्यांचे 15 नोव्हेंबर पासून वेतन अदा करू नये. असे आदेश महापालिका अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे यांनी जारी केले आहेत. यामुळे कर्मचारी हवालदिल झाले आहेत.
या आदेशामुळे महापालिका कर्मचारी बायोमेट्रिक हजेरी लावण्याबाबत गंभीर झाले आहेत. त्यानुसार कर्मचारी सकाळी कार्यालयात आल्यावर आणि सायंकाळी बाहेर पडताना बायोमेट्रिक मशीन वर थंब करूनच बाहेर पडत आहेत. मात्र सकाळी आणि सायंकाळी देखील थंब करताना मशीन अचानक बंद पडत आहेत. गेल्या दोन दिवसापासून हीच स्थिती आहे. जुन्या इमरती मधील मशीन बंद होत आहेत. त्यामुळे सर्व कर्मचारी नवीन इमारतीकडे धाव घेत आहेत. यामुळे कर्मचाऱ्यांना लांबच लांब रांगा लावाव्या लागत आहेत. सायंकाळी कार्यालयातून बाहेर पडताना देखील खूप उशीर होत आहे. यामुळे कर्मचारी त्रस्त झाले आहेत. याबाबत प्रशासनाला विचारले असता सांगण्यात आले कि लवकरच मशीन दुरुस्त करण्यात येतील.