पुणे : म्हाडाच्या वतीने तब्बल 4 हजार 222 घरांसाठी सोडत जाहीर केली असून, यासाठी तब्बल 64 हजार 715 लोकांनी अर्ज केले आहेत. या लोकांना आता 7 जानेवारीपर्यंत प्रतिक्षा करावी लागणार असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या इमारत येथे हा सोडतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याची माहिती पुणे म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन माने-पाटील यांनी दिली.
कोरोनाच्या संकटात समाजातील गरीब व सर्वसामान्य कुटुंबाचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुणे म्हाडाच्या वतीने दीड वर्षांत हजारो घरांची तीन वेळा सोडत जाहीर करत नवीन विक्रम केला. म्हाडाचे मुख्य अधिकारी नितीन माने-पाटील यांनी पुढाकार घेऊन खाजगी व मोठ्या बांधकाम व्यावसायिकांकडून 20 टक्क्यांतील फ्लॅट उपलब्ध करून घेतले. यामुळे शहरातील नामांकित व मोठ्या बिल्डरांच्या प्रकल्पांमध्ये देखील सर्वसामान्य व गरीब कुटुंबातील लोकांना घरे मिळू लागली आहेत.
पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ (म्हाडा) पुणे अंतर्गत ८ वी ऑनलाईन सोडत असून, म्हाडाच्या विविध योजनतील २८२३ सदनिका व २०% सर्वसमावेशक योजनअंतर्गत १३९९ सदनिका असे एकूण ४२२२ नवीन सदनिकांच्या सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज नोंदनिचा शुभारंभाचा कार्यक्रम उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले होते. सदर सोडतीमधील ४२२२ सदनिकांसाठी आतापर्यंत 64 हजार 715 इतके विक्रमी अर्ज प्राप्त झाले आहेत. ही सोडत यापूर्वी ठरल्या प्रमाणेच 7 जानेवारी रोजी काढण्यात येणार आहे.
COMMENTS