वडगाव शेरी मतदारसंघासाठी 50 कोटींचा विकास निधी
– आमदार सुनिल टिंगरे यांचा दावा
पुणे : वडगाव शेरी मतदारसंघातील विविध विकास कामांसाठी मी राज्य शासनाच्या माध्यमातून तब्बल 50 कोटींचा निधी मंजूर करून आणला आहे. या मधील अनेक विकासकामांना सुरवात झाली असून काही कामे मंजुरीच्या प्रक्रियेत आहे. शहरातील आठ विधानसभा मतदारसंघापैकीं सर्वाधिक विशेष निधी मी मिळविला आहे. असा दावा आमदार सुनील टिंगरे यांनी केला आहे.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. पुण्यात आघाडी सरकारचे दोन आमदार आहेत. त्यामुळे आमदार टिंगरे यांनी राज्य शासनाच्या माध्यमातून पुण्यात सर्वाधिक निधी त्यांच्या मतदारसंघातील विकासकामांसाठी आणला आहे. या मध्ये नगरविकास खात्याच्या माध्यमातून 20 कोटींचा सर्वाधिक निधी मिळाला आहे. त्यात 17 कोटींचा निधी हा रस्ते आणि ड्रेनेजच्या कामांसाठी तर 3 कोटींचा निधी विद्युत कामांसाठी मिळाला आहे. तर जिल्हा वार्षीक योजनेच्या माध्यमातून चालू आणि गत आर्थिक वर्षातील अशी एकूण 7 कोटी 72 लाखांची कामे मंजूर झाली आहेत. ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून मतदारसंघात मांजरी, वडगाव शिंदे आणि निरगुडी या तीन गावांसाठी 1 कोटीचा स्वतंत्र निधी मंजूर झाला आहे. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सुधारणा योजनेंतर्गत 1 कोटींचा निधी मिळाला आहे.
या शिवाय नाबार्ड योजनेंतर्गत लोहगाव – वडगाव शिंदे पूल बांधण्यासाठी दीड कोटी, लोहगाव-वाघोली रस्त्यासाठी साडेचार कोटी, मांजरी- कोलवडी रस्त्यासाठी 1 कोटी 80 लाख , प्रमुख जिल्हा मार्ग योजनेंतर्गत हडपसर – मांजरी रस्त्यासाठी 2 कोटी आणि राष्ट्रीय मार्ग योजनेंतर्गत मुंढवा- केशवंनगर – कोलवयांचा डी रस्त्यासाठी चार कोटींचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार टिंगरे यांनी दिली.
सर्वाधिक निधी लोहगावला
लोहगावचा पुणे महापालिकेत समावेश झाला असला तरी या गावांसाठी पुरेसा निधी महापालिकेने दिलेला नाही. त्यामुळे आमदार टिंगरे यांनी 7 कोटींचा सर्वाधिक निधी लोहगावला दिला आहे. तर मांजरी खुर्दला 4 कोटी 75 लाख, निरगुडी गावाला 2 कोटी 25 लाख आणि वडगाव शिंदे 2 कोटी 68 लाख इतका निधी विविध विकासकांमासाठी दिला असून उर्वरित 35 हुन अधिक कोटींचा निधी वडगाव शेरीतील मतदारसंघातील पालिका हद्दीतील कामांसाठी दिला आहे.
COMMENTS