1971 नंतर पहिल्यांदाच ओव्हलच्या मैदानावर भारताने इंग्लडला धूळ चारली
: 50 वर्षानंतर या मैदानावर भारताने मारली बाजी
: भारताची 2-1 अशी आघाडी
भारत विरुद्ध इंग्लड 4 थी टेस्ट : ओव्हलच्या मैदानातील चौथ्या कसोटी सामन्यात तोऱ्यात कमबॅक करुन टीम इंडियाने यजमानांना गुडघे टेकायला लावले. 1971 नंतर म्हणजे तब्बल 50 वर्षानंतर या मैदानावर भारताने इंग्लडला हरवले. पहिल्या डावातील 91 धावांची पिछाडी भरुन काढत टीम इंडियाने इंग्लंडसमोर 368 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचा डाव 210 धावांत आटोपला. या सामन्यातील 157 धावांनी विजय नोंदवत टीम इंडियाने 5 सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. तर रोहित शर्मा या सामन्याचा सामनावीर ठरला.
धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या इंग्लंडच्या सलामीच्या जोडीने चांगली सुरुवात केली होती. रॉरी बर्न्स 50 (125) आणि हसीब हमीद 63 (193) यांनी पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. ही जोडी ज्यावेळी मैदानात होती त्यावेळी सामना अनिर्णित राहतोय की काय? असेच वाटत होते. पण शार्दूल ठाकूरने ही जोडी फोडली आणि टीम इंडियाच्या विजयाचे दरवाजे खुले झाले.
शार्दूल ठाकूरनं रॉरी बर्न्सला 50 धावांवर तंबूचा रस्ता दाखवला. त्याची जागा घेण्यासाठी आलेला डेविड मलान अवघ्या 5 धावा काढून धावबाद होऊन परतला. ज्या रविंद्र जडेजाच्या निवडीबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थितीत करण्यात आले त्याने आपल्याला दिलेली संधी योग्य होती हे सिद्ध केले. मोक्याच्या क्षणी त्याने सेट झालेल्या हसीब हमीदला बाद करुन संघाला मोठी विकेट मिळवून दिली.
ओली पोप आणि जॉनी बेयरस्टोला बुमराहने स्वस्तात माघारी धाडले. संघाचा डाव सावरण्याची क्षमता असलेल्या मोईन अलीच्या रुपात रविंद्र जडेजाने आपल्या खात्यात आणखी एक विकेट जमा केली. इंग्लंडचा कर्णधार टीम इंडियाच्या विजायात कुठेतरी अडथळा निर्माण करु शकेल, असे वाटत होते. पण शार्दूलने त्याचाही काटा अगदी व्यवस्थितीत काढला. तो 36 धावा करुन परतला. त्यानंतर उमेश यादवने ‘हम भी किसी से कम नहीं’ शो दाखवत क्रिस वोक्स 18(47) आणि क्रेग ओव्हरटन 10(29) यांना तंबूत धाडले. जीमीला पंतकरवी झेलबाद करत उमेश यादवने टीम इंडियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.
टॉस जिंकल्यानंतर इंग्लंडचा कर्णधार ज्यो रुटने टीम इंडियाला पहिल्यांदा बॅटिंगचे निमंत्रण दिले. इग्लिश गोलंदाजांनी कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवत पहिल्या डावात टीम इंडियाचा डाव अवघ्या 191 धावांत आटोपला. त्यानंतर इंग्लंडने पहिल्या डावात 290 धावा करत सामन्यात 91 धावांची आघाडी घेतली होती. दुसऱ्या डावात रोहित शर्माच्या भात्यातून 127 धावा निघाल्या. त्याच्यासह पुजारा, पंत आणि शार्दूल ठाकूर यांनी अर्धशतकी खेळी केली. भारतीय संघाने दुसऱ्या डावात 466 धावा केल्या होत्या. इंग्लंडला हे आव्हान पेलले नाही.
COMMENTS
Great work
Thank you sir..!