शहरात स्थिर गणपती विसर्जन हौदाची सुविधा करा
: नगरसेवक प्रवीण चोरबेले यांची आयुक्तांकडे मागणी
: मनपाद्वारे व्हावे योग्य नियोजन
पुणे: सध्यःस्थितीमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध भागांतील नागरिकांची गणपती विसर्जन करणेकरिता नदी पात्र, तलाव इ. ठिकाणी गर्दी न होण्यासाठी संपुर्ण पुणे शहरामध्ये पुणे महानगरपालिकेमार्फत विविध ठिकाणी फक्त फिरत्या गणपती विसर्जन हौदाचे आयोजन करण्यात आलेले आहे. मात्र महानगरपालिकेमार्फत पुर्वीप्रमाणे गणपती विसर्जनाकरिता पुणे शहरामध्ये ठिकठिकाणी स्थिर गणपती विसर्जन हौद, मुर्ती संकलन व निर्माल्य केंद्राचे नियोजन करण्यात यावे, जेणेकरुन नागरिकांचा त्याचा लाभ घेता येईल. अशी मागणी नगरसेवक प्रवीण चोरबेले यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
नागरिकांना करावी लागेल प्रतीक्षा
चोरबेले यांच्या पत्रानुसार पुणे शहरामधील विविध वस्ती, सोसायटी भाग यामधील गणपती विसर्जनाची संख्या मोठया प्रमाणावर (प्रत्येक परिसराप्रमाणे अंदाजे प्रति वस्ती ७ ते ८ हजार गणपती) असल्याने नागरिकांना गणपती विसर्जन करणेकरिता फिरत्या विसर्जन हौदाची प्रतिक्षा करावी लागणार आहे. यामुळे अनेक गणपती विसर्जन होणे शक्य होणार नाही. यामुळे अनेक नागरिकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जावून याचा नाहक त्रास त्यांना सहन करावा लागणार आहे. तसेच पुढील दोन दिवसांवर गणेशोस्तव आलेला असल्याने त्याचे योग्य नियोजन पुणे मनपामार्फत त्वरीत करणे अत्यंत गरजेचे आहे. तरी पुणे महानगरपालिकेमार्फत पुर्वीप्रमाणे गणपती विसर्जनाकरिता पुणे शहरामध्ये ठिकठिकाणी स्थिर गणपती विसर्जन हौद, मुर्ती संकलन व निर्माल्य केंद्राचे नियोजन करण्यात यावे. जेणेकरुन नागरिकांचा त्याचा लाभ घेता येईल व गणपती विसर्जन सु-नियोजीत पार पडेल. असेही चोरबेले यांनी म्हटले आहे.
COMMENTS