महापालिका कर्मचाऱ्यांना बाप्पा पावणार!
: गणेश उत्सवात राज्य सरकार कडून मिळणार सातव्या वेतन आयोगाची भेट
: नगरविकास मंत्री कर्मचारी संघटनांसमोर करणार घोषणा
पुणे: यंदाच्या ही गणेश उत्सवावर जरी कोरोनाचे सावट असले तरी मात्र महापालिका कर्मचाऱ्यांना गणेश बाप्पा पावणार आहे. गणेश उत्सवाच्या काळात कर्मचाऱ्यांना प्रलंबित असलेल्या सातव्या वेतन आयोगाची भेट राज्य सरकार कडून मिळणार आहे. याबाबतचे संकेत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. मंत्री लवकरच महापालिकेच्या कर्मचारी संघटना समोर याबाबतची घोषणा करणार आहेत. त्यासाठी सरकारकडून संघटनांना निमंत्रण देखील देण्यात आले आहे. अशी माहिती वरिष्ठ सूत्रांकडून मिळाली आहे.
: कर्मचारी संघटनांना निमंत्रण
महापालिका मुख्य सभेने 10 मार्च ला वेतन आयोगाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. मात्र त्यांनंतरही बरेच दिवस हा प्रस्ताव राज्य सरकार कडे पाठवला गेला नाही. प्रशासनाच्या उदासीनतेमुळे हा प्रस्ताव महापालिकेतच अडकून पडला होता. त्यावर कर्मचारी संगठनांनी आंदोलनाचे हत्यार हातात घेतले होते. त्यानुसार जून महिन्यात सरकारकडे प्रस्ताव गेला. मात्र तिथे ही प्रस्तावाने वेग घेतला नाही. यामध्ये मग उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्ष घातले. त्यानुसार प्रस्ताव तयार करून तो नगरविकास मंत्र्यापुढे ठेवण्यात आला आहे. मात्र गेल्या महिना भरापासून यावर काही निर्णय होत नाही. त्यामुळे कर्मचारी त्रस्त आहेत. मात्र आता कर्मचाऱ्यांना बाप्पा पावणार आहे. गणेश उत्सव काळातच वेतन आयोगाची भेट सरकार कडून मिळणार आहे. याबाबतचे संकेत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. मंत्री लवकरच महापालिकेच्या कर्मचारी संगठना समोर याबाबतची घोषणा करणार आहेत. त्यासाठी सरकारकडून संगठनांना निमंत्रण देखील देण्यात आले आहे. नुकतीच संघटनेच्या लोकांनी मंत्र्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी कृष्णा जाधव यांची भेट घेतली. जाधव यांनी सांगितले कि, वेतन आयोगाच्या प्रस्तावावर मंत्री महोदयाची सही झाली आहे. त्याची घोषणा कर्मचारी संघटनासमोर येत्या 2-3 दिवसांत केली जाईल. त्यासाठी संघटनांना निमंत्रण देखील देण्यात आले आहे. महापालिकेकडून उपायुक्त शिवाजी दौंडकर, मनपा कर्मचारी संघटनेकडून उदय भट, डॉक्टर असोसिएशन कडून डॉ मनीषा नाईक, अभियंता संघाकडून सुनील कदम तर पीएमसी एम्प्लॉईज कडून प्रदीप महाडिक यांना बोलावले जाईल. या सर्वासमोर वेतन आयोगाची घोषणा मंत्री करतील. यामुळे कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
: शिवसेना घेणार क्रेडिट!
दरम्यान याबाबत सरकारचे लक्ष वेधण्यासाठी कर्मचारी संघटनांनी शिवसेनेचे महापालिका गटनेते पृथ्वीराज सुतार यांच्या सहकार्याने विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांची भेट घेतली होती आणि आयोग लागु करण्यासंदर्भात मागणी केली. उपसभापती नी देखील याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला होता. त्यानंतर सुतार यांनी नुकतीच नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. आयोगाचे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच प्रस्तावावर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची स्वाक्षरी होईल. त्यामुळे कर्मचाऱ्यांना लवकरच याचा लाभ मिळेल अशी माहिती शिवसेना गटनेता पृथ्वीराज सुतार यांनी दिली होती. त्यानुसार आता ही घोषणा होईल. मात्र याचे अंतिम शिवसेनेकडे राहणार असे दिसते आहे. कारण संघटनांसोबत शिवसेनेचे मोजकेच लोक उपस्थित असणार आहेत. यामध्ये विधानपरिषद उपसभापती नीलम गोर्हे, मनपा गटनेता पृथ्वीराज सुतार व मोजके निमंत्रित असतील. या प्रस्तावासाठी भाजप सहित सर्वच पक्ष प्रयत्न करत होते.
COMMENTS
खूप खूप धन्यवाद गणपती बाप्पा मोरया
Welcome.?? गणपती बाप्पा मोरया