वैद्यकीय महाविद्यालयाला लवकरच अंतिम मान्यता !
– महापौर मोहोळ यांनी घेतली केंद्रीय आरोग्य मंत्र्यांची भेट
– महाविद्यालयाच्या सर्व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण
पुणे महापालिकेच्या माध्यमातून आणि महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या संकल्पनेतून साकारत असलेल्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्या असून लवकरच अंतिम मान्यता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या अंतिम मान्यतेच्या पूर्ततेसाठी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांची नवी दिल्ली येथे भेट घेऊन चर्चा केली.
महापालिकेच्या भारतरत्न वैद्यकीय महाविद्यालयाची सर्व तांत्रिक पूर्ण झाली असून नुकतीच NMC च्या पथकाने दोन दिवस प्रत्यक्ष पाहणी केली होती. यात काही तांत्रिक बाबी पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्याअनुषंगाने तांत्रिक बाबींची पूर्तता करण्यात आली असून यासाठी महापौर मोहोळ यांनी नवी दिल्लीत आरोग्य मंत्री मांडवीय यांची भेट घेतली. यावेळी स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, आयुक्त विक्रम कुमार हेही सोबत होते.
याबाबत माहिती देताना महापौर मोहोळ म्हणाले, ‘महापालिकेचे स्वतःचे वैद्यकीय महाविद्यालय असावे, हे आपले स्वप्न आता पूर्णत्वास जात आहे. पुणे शहराची आरोग्य व्यवस्था सक्षम होण्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे. स्थायी समितीचा अध्यक्ष असताना ही संकल्पना मांडून त्याचा सर्वतोपरी पाठपुरावा केला. ज्याचे यश आता दृष्टीक्षेपात आहे.’
‘नवी दिल्लीतील आरोग्य मंत्र्यांच्या भेटीत तांत्रिक प्रक्रियेबाबत सविस्तर चर्चा झाली असून सर्व बाबी पूर्ण केल्या आहेत. वैद्यकिय महाविद्यालयाच्या अंतिम मान्यतेसाठी आता सर्व प्रक्रिया पूर्ण केली असून आरोग्यमंत्री मांडवीय यांनी अंतिम मान्यतेसाठी सकारात्मकता दाखवली आहे. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून आरोग्यमंत्र्यांची भेट घडून आली. देवेंद्रजींनी आजवर या प्रक्रियेत मोलाची भूमिका सातत्याने बजावली आहे, असेही महापौर मोहोळ म्हणाले.
COMMENTS