गणपती विसर्जन होईपर्यंत लकडी पूलावरील मेट्रो पुलाचे काम बंद ठेवणार
: महापौर महामेट्रोच्या अधिकाऱ्यांसोबत घेणार बैठक
: महापौरांचे मुख्य सभेत आश्वासन
पुणे. पुणे शहरात सार्वजनिक गणेशोत्वस मोठया उत्साहात साजरा होतो. या उत्सवास १२५ हून अधिक वर्ष झाले असून ही परंपरा पुणेकर मनोभावाने जपत आहेत. पुणे शहरात मेट्रोचे काम प्रगतीपथावर असून लकडी पूल, डेक्कन येथून मेट्रो मार्गाच्या पूलाचे काम चालू आहे. हा पूल लकडी पूलापासून ५.४५ ते ६ मीटर इतका उंच आहे. मेट्रोच्या पूलाचा तळ व लकडी पूलाचा रस्ता म्हणजेच अंदाजे २०फुट इतका उंच लकडी पूलावरून मेट्रोचा पूल झाल्यास विसर्जन मिरवणूकीस मोठया प्रमाणात अडथळा होणार आहे. त्यामुळे याबाबत तात्काळ बैठक घेऊन मार्ग काढावा, अशी मागणी मुख्य सभेत महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी केली. त्याअगोदर गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेत आंदोलन करत या विषयाकडे लक्ष वेधले होते. यावर महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आश्वस्त केले की महामेट्रोच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन हे काम थांबवण्यात येईल.
: महाविकास आघाडीच्या नगरसेवकांचे मुख्य सभेत आंदोलन
कोरोना काळात मागील वर्ष व यंदाच्या वर्षात गणेशोत्सव साजरा करणेसाठी शासनाने अटी व शर्ती दिलेल्या असून कोरोनाचा काळ संपल्यानंतर पुन्हा त्याच उत्साहात सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होणार आहे. पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सवात सजावट, देखावे व विसर्जन मिरवणूक यामध्ये विसर्जन मिरवणूकीस अनन्य महत्व आहे. विसर्जन मिरवणूकीमध्ये मोठे आकर्षक रथ, विदयुत रोषणाई, समाजास प्रबोधन व मार्गदर्शन करणारे देखावे, कलाकारांना व्यासपीठ उलब्ध करणारे देखावे अशा प्रकारची सजावट गणेश मंडळाचे कार्यकर्ते मोठया उत्साहाने करून लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, टिळक रस्ता, केळकर रस्ता याठिकाणाहून विसर्जन करणेस अलका चौक येथून मिरवणूक घेवून येतात. अलका चौक येथे मानाचा पहिला कसबा गणपती, मानाचे उर्वरित गणपती व शेकडो गणेश मंडळांच्या मिरवणूका लकडी पूलावरून खंडूजी बाबा चौक येथील विसर्जन घाटावर श्रींच्या मूर्तीचे विसर्जन करतात व कर्वे रस्यावरून एस.एम जोशी पूल मार्गे तसेच गोखले रस्ता व अन्य रस्ते येथून गणेश मंडळे परत जातात. कर्वे रस्त्यावर देखील मेट्रोचे स्टेशन झालेले असून याठिकाणाहून जाताना अडथळा निर्माण होणार आहे. विसर्जन मिरवणूकीतील रथ, रोषणाई यांची उंची साधारण ३५ फुट ते ४५ फुटापर्यंत असते. पुणे शहरातील विसर्जन मिरवणूकीचे थेट प्रक्षेपण जगभरातून बघितले जाते. परदेशातून नागरिक खास पुणे शहराची विसर्जन मिरवणूक बघणेस येतात. पुणे शहरात मेट्रोचे काम प्रगतीपथावर असून लकडी पूल, डेक्कन येथून मेट्रो मार्गाच्या पूलाचे काम चालू आहे. हा पूल लकडी पूलापासून ५.४५ ते ६ मीटर इतका उंच आहे. मेट्रोच्या पूलाचा तळ व लकडी पूलाचा रस्ता म्हणजेच अंदाजे २०फुट इतका उंच लकडी पूलावरून मेट्रोचा पूल झाल्यास विसर्जन मिरवणूकीस मोठया प्रमाणात अडथळा होणार आहे. याला शहरातून विरोध होत आहे. काही नगरसेवकांनी याआधीच काम थांबवायची मागणी केली होती. त्यानंतर बुधवारी गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेत याच मागणीसाठी आंदोलन केले. मुख्य सभागृहात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी देखील मागणी केली की हेकाम थाम्बवले जावे. सभागृहात दीपक मानकर यांनी तशी मागणी केली. त्यांनतर महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आश्वस्त केले की महामेट्रोच्या ब्रिजेश दीक्षित यांच्यासोबत बैठक घेऊन हे काम थांबवण्यात येईल.
शहराच्या गणेश उत्सवाला 129 वर्षाची परंपरा आहे. मी सगळ्या गणेश मंडळांसोबत संवाद साधला आहे. लकडी पुलाच्या कामाचा यास अडथळा होणार नाही. महामेट्रोच्या ब्रिजेश दीक्षित यांच्यासोबत बैठक घेऊन हे काम थांबवण्यात येईल.
मुरलीधर मोहोळ, महापौर
गणपती मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेता घाईघाईत मेट्रोचे काम करणेचा अट्टाहास करू नका, याविषयी आम्ही तोडगा काढणेसाठी बैठक घ्या अशी मागणी केलेली आहे. त्यानुसार महापौरांनी मेट्रोचे प्रमुख यांचेशी चर्चा केलेली आहे. याविषयी तोडगा निघेपर्यंत लकडी पूलावरील मेट्रोच्या पूलाचे काम थांबविले जाईल असे महापौरांनी आश्वासित केले आहे. तसेच सर्व पक्षाचे प्रतिनिधी, गणेश मंडळाचे प्रमुख कार्यकर्ते, मेट्रोचे अधिकारी यांची बैठक बोलाविली जाईल असेही महापौरांनी आश्वासित केलेले आहे.
COMMENTS